* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक)

'एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो.एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं,'असं म्हटलंय गौतम बुद्धानं ! 


गौतम बुद्धाची विचारधारा अंतर्भूत असलेला 'त्रिपिटक' हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्राचीन असा ग्रंथ आहे.हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेला असून बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंतची सगळी प्रवचनं यात संग्रहित केली गेली आहेत.या ग्रंथाची रचना इ.स.पूर्व ५०० ते इ.स.पूर्व १०० मध्ये केली गेली असून हा ग्रंथ कोणा एका व्यक्तीनं लिहिला नसून या ग्रंथनिर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.दुःख, समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुद्धाने सांगितली आहेत.

'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,

कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' 

असं बुद्धाने म्हटलंय.

पाली भाषेत धर्म या शब्दाला धम्म,भिक्षू शब्दाला भिक्खू,गौतमाला 'गोतम' आणि ' त्रिपिटक या शब्दाला 'तिपिटक' असं संबोधलं गेलंय आणि त्यामुळेच बौद्ध धर्म न म्हणता 'बौद्धधम्मीय' अशा पाली भाषेतल्या शब्दांचाच प्रयोग करतात.'त्रिपिटक' या ग्रंथानुसार धम्म म्हणजे परस्परसापेक्ष आणि परस्परनिरपेक्ष यांच्यामध्ये योग्य असं संतुलन ठेवून व्यक्ती,कुटुंब आणि समाज यांचं सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना निकोप आनंद देणारी जीवन

शैली म्हणजे तथागतांचा धम्म ! ज्यानं यथार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला पाली भाषेत 'तथागत' असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच गौतम बुद्धाला

देखील 'तथागत' या नावानंही संबोधलं जातं.


गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ.हा सिद्धार्थ होता तरी कोण ?


फार फार पूर्वी भारत देश जंबुद्वीप या नावानं ओळखला जायचा.महासागरांनी वेढलेल्या प्रदेशाला जंबुद्वीप असं म्हणत.जंबुद्वीपात भारत,पाकिस्तान,श्रीलंका,

अफगाणिस्तान,नेपाळ, तिबेट,भूतान,बांगलादेश,ब्रह्मदेश (आजचं म्यानम्यार) हे देश समाविष्ट होते.भारताच्या ईशान्य कोपऱ्यात त्या काळी शाक्य वंशाच्या राजांची सत्ता होती.राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स.पूर्व ५६३ मध्ये राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी इथे झाला होता.सिद्धार्थचा जन्म होताच सातव्या दिवशीच त्याच्या आईचं निधन झालं आणि राजा शुद्धोधनानं बाळ सिद्धार्थचं संगोपन चांगलं व्हावं म्हणून महामायाची बहीण गौतमी हिच्याशी विवाह केला.वयाच्या १९ व्या वर्षी सिद्धार्थचा विवाह राजकुमारी यशोधरा हिच्याशी झाला.सिद्धार्थ ते गौतम बुद्ध या प्रवासाची गोष्ट सांगताना अनेक दंतकथांचा वापर करण्यात आला आहे.


या दंतकथांमधली एक कथा म्हणजे : लहानपणापासून सिद्धार्थचं जीवन खूप लाडाकोडात गेलं होतं.दुःख म्हणजे काय असतं याची यत्किंचितही कल्पना सिद्धार्थला नव्हती.एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ राज्यातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असताना त्याला रस्त्यात जराजर्जर अवस्थेतला एक वृद्ध, रोगानं ग्रस्त एक मनुष्य,मृत व्यक्ती आणि एक संन्यासी अशा चार व्यक्ती दिसल्या.त्यांना पाहून सिद्धार्थला खूपच धक्का बसला.

जसा माणसाचा जन्म होतो,तसाच त्याचा मृत्यूही अटळपणे होतोच;या जन्ममरणाचा फेरा कुणालाच चुकलेला नाही,ही गोष्ट आपल्या बरोबर असलेल्या सैनिकांशी बोलताना त्याला कळली. सिद्धार्थला त्याच वेळी यशोधरेला राहुल नावाचा पुत्र झाल्याची बातमी कळली.एकीकडे तो मृत्यूचं दृश्य बघत होता,तर दुसरीकडे जन्माचा आनंद साजरा होत होता.हे सगळं बघून सांसारिक गोष्टींमधली निरर्थकता त्याच्या लक्षात आली.राजपुत्र सिद्धार्थच्या मनात जीवनाबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी एके दिवशी तो आपली राजवस्त्रं आणि सगळ्या सुखसुविधा यांचा त्याग करून बाहेर पडला.


बुद्धाच्या जन्माची आणखी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.जगाला वाचवण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा मुलाचा जन्म झाला आहे,अशी घोषणा करण्यासाठी सगळे देव एकत्र झाले. त्या वेळी महामाया राणीनं एक आठवडाभर चाललेल्या मेजवानीत भाग घेतला होता.

 नंतर ती आपल्या देखण्या वेशात रथात बसलेली असताना तिला झोप लागली.त्या वेळी तिला हिमालयात नेलं गेलं आहे,असं स्वप्न पडलं.तिथे एका सोन्याच्या महालात एका पांढऱ्या हत्तीच्या रूपात तिला भावी बुद्ध स्वप्नात दिसला.त्यानंतर तिथल्या विद्वानांनी आता बुद्धाचा जन्म होईल आणि तोच जगातल्या पापांचं शालन करेल,

अशी भविष्यवाणी केली. त्याप्रमाणे बुद्ध जन्मला,अशी ही दंतकथा सांगितली जाते.


या आणि अशा अनेक दंतकथांवर बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक डॉ.धर्मानंद कोसंबी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.आ. ह.साळुंखे यांसारख्या अनेक विचारवंतांनी अशा दंतकथांची चिकित्सा करून त्यांचं खंडन केलं आहे.


काही कथांप्रमाणे आपल्या शिक्षणातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सिद्धार्थ काही विद्वान ब्राह्मणांकडे गेला.त्यांनी सिद्धार्थला हिंदू धर्मातल्या काही गोष्टी शिकवल्या.त्यातून त्याला त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली,पण त्याचं पूर्ण समाधान झालं नाही.त्यानं आपल्या वैभवशाली आयुष्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलं.स्वतःला शिक्षा म्हणून अत्यंत साधं आणि काटकसरीनं राहणं आणि कंदमुळे आणि फळ हाच आहार ठेवणं,फरशीवर झोपणं आणि अन्य शारीरिक कष्ट उपसणं यात आनंद मानणं असं सगळं सुरू ठेवलं.या काळात त्याला काही शिष्यही मिळाले,पण अद्याप त्याच्या कल्पना परिपक्व झाल्या नसल्यानं त्यातले काही जण निघून गेले.


एका कथेप्रमाणे सहा वर्षे भटकल्यानंतर सिद्धार्थ

गया शहराजवळच्या एका भल्यामोठ्या वृक्षाखाली (बोधिवृक्ष) काहीही अन्नपाणी घेता चक्क ४९ दिवस आणि ४९ रात्री बसून स्वतः चा शोध घेत राहिला,त्या जंगलात काढलेल्या सात आठवडयांच्या कालावधीत त्याच्यात पूर्ण कायापालट झाला आणि सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला.


आपल्याला आता काय करायचंय कळल्यानंतर सिद्धार्थ आनंदित झाला.त्यान आता आपले पूर्वीचे अनुयायी गोळा केले.त्यानंतर त्यानं आपलं पहिलं प्रवचन दिलं माणसाला आयुष्यात तीनच पर्याय असतात असं त्यानं सांगितलं.


 पहिला म्हणजे जगातल्या भौतिक सुखाच्या मागे धावणं,सिद्धार्थ आत्तापर्यंत याच स्वार्थी आणि निरर्थक मार्गानंन चालला होता.दुसरा म्हणजे स्वत:तलं चैतन्य नष्ट करणं आणि पूर्वी केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून स्वत: अपराध्यासारखं वागणं,सिद्धार्थ याही अवस्थेतून गेला होता,पण या अवस्थेतही आत्मक्लेश केल्यानंतरही त्याला आत्मशांती मिळाली नव्हतीच.बुद्धाच्या मते तिसरा पर्याय किंवा तिसरा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग.या मार्गावरून चालल्यानं सुख आणि शांततामय आयुष्य जगता येणार होतं.


बुद्ध हा मूर्तिपूजेच्या विरुद्ध होता.धार्मिक विधी आणि सण यांच्यावरही त्याचा विश्वास नव्हता. माणूस हाच त्याच्या केंद्रस्थानी होता.आपणच आपलं भविष्य घडवू शकतो.देव नाही.तसंच तो आपल्याच कृत्यानं आणि वागणुकीनं मोक्षापर्यंत जाऊ शकतो,कुठल्याही धार्मिक विधींमुळे नाही, असं तो म्हणे.सिद्धार्थनं केलेली अथक भ्रमंती आणि त्या प्रवासातले अनुभव आणि तपश्चर्या यांनी सिद्धार्थला बिहारमधल्या बुद्धगया या स्थानावर ज्ञानप्राप्ती झाली.राजपुत्र सिद्धार्थचं आता गौतम

बुद्धामध्ये रूपांतर झालं होतं आणि त्यानं जो धम्म स्थापन केला,त्याचं नाव बौद्ध धम्म ! हा बौद्ध धम्म पुढे जगभर पसरला. आपला पहिला उपदेश वाराणसीजवळच्या सारनाथ या ठिकाणी बुद्धानं दिला.या पहिल्या उपदेशपर प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन असं संबोधलं जातं.बौद्ध धम्माचे नीतिनियम,बुद्धानं सांगितलेले विचार एका ग्रंथात समाविष्ट आहेत.आणि या ग्रंथाचं नाव आहे 'त्रिपिटक' किंवा 'तिपिटक' संपूर्ण आयुष्य बुद्ध आपली शिकवण देत राहिला.त्याचं वय ८० पेक्षा जास्त झालं होतं आणि त्याला आपला मृत्यू समोर दिसायला लागला होता.त्याचे शिष्य त्याच्याभोवती जमून रडायला लागले होते. 


'तुमच्यानंतर तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही,'असं ते त्याला म्हणाले,तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाला, 'माझी जागा कोणी घेण्याची गरजच नाही.माझे विचारच आता जगाला दिशा दाखवतील!'


ज्या वेळी गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, त्या वेळी सुभद्र नावाच्या भिक्खूनं आता आपल्याला बुद्धानं सांगितलेले विचार पाळायची काही आवश्यकता नाही,असं इतरांना म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून इतर बौद्ध भिक्खू खूपच चिंतित झाले.कुठलेही नीतिनियम न पाळता सुभद्रच्या ( जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन ) म्हणण्याप्रमाणे स्वैरपणे जगायचं हे या इतर भिक्खूंना मान्य नव्हतं.त्यामुळे ५०० भिक्खूंनी एकत्र येऊन बुद्धाचे विचार आणि बुद्धानं केलेला उपदेश हे सगळं काही संग्रहित करायचं ठरवलं.सगळ्यांनी एकत्र येऊन सहा ते सात महिने अहोरात्र काम करून 'पहिली बुद्ध धम्मसंगती' तयार केली.म्हणजेच त्रिपिटक या ग्रंथाची निर्मिती केली.यानंतर १०० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ७०० बौद्ध भिक्खू एकत्र आले आणि त्यांनी सहा महिने काम करून 'दुसरी धम्मसंगती' तयार केली.या दुसऱ्या धम्मसंगतीत पहिल्या धम्मसंगतीचं मजबूत करण्याचं काम केलं गेलं होतं.थोडक्यात, पहिल्यापेक्षा दुसरी धम्मसंगती जास्त अपडेटेड व्हर्जनमध्ये होती. त्यानंतर २३६ वर्षांनी 'तिसरी धम्मसंगती' तयार करण्यात आली आणि ही तयार करण्यात सम्राट अशोकानं पुढाकार घेतला होता.सम्राट अशोकानं १००० भिक्खूंना एकत्रित करून ही धम्मसंगती तयार केली.हिला तयार करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर श्रीलंकेचा राजा वटगामणी यानं 'चवथी धम्मसंगती' ५०० भिक्खूंना घेऊन सहा महिन्यांच्या कालावधीत तयार केली. यानंतर १८७१ साली बर्मा (आणि आताचं म्यानम्यार) देशाच्या राजान 'पाचवी धम्मसंगती' तयार करण्यात पुढाकार घेतला आणि ही धम्मसंगती मंडाले पर्वतावर तयार झाली.यानंतर 'सहावी धम्मसंगती' पुन्हा बर्मा देशाचे तत्कालीन पंतप्रधान बुनो यानं अपडेट केली.बुनोनं भारत, चीन,जपान,थायलंड अशा जगभरातल्या देशांमधल्या २५०० बौद्ध भिक्खूंना निमंत्रित केलं आणि दोन वर्षांच्या कालावधीत पहिल्या पाच धम्मसंगतीपेक्षाही ही 'सहावी धम्मसंगती' आणखीनच बळकट केली.इतकंच नाही तर बुनोनं 'त्रिपिटक' ग्रंथाची छपाईदेखील केली.

आणि त्यानंतर मात्र ही सहावी धम्मसंगती किंवा 'त्रिपिटक' हा ग्रंथ सर्वत्र वापरला गेला.'त्रिपिटक' या ग्रंथात एकूण १७ ग्रंथांचा समावेश आहे. म्हणजेच बुद्धधम्माच्या 'त्रिपिटक'ची निर्मितीची सुरुवात ५०० भिक्खूंपासून सुरू झाली आणि त्यात पुढे अनेक जण सामील झाले.


… अपूर्ण 


१८/४/२३

शोधायचं आहे प्रत्येकाला आपल्यापुरतं उत्तर - " तत्वमसि "

परवा पुण्याला नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाचे लेखक संजय बापट यांना खास भेटण्यासाठी गेलो.छान गप्पा झाल्या,सोबत खाणं झालं.नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाच्या निर्मिती बद्दल उत्कंठावर्धक माहिती मिळाली.

त्याचबरोबर त्यांनी काही आपल्या कविता म्हणून दाखवल्या.येताना सोबत त्यांचं भरपूर प्रेम व काही पुस्तक त्यांनी भेट म्हणून दिली.जी त्यांनी माझ्यासाठी राखीव ठेवली होती.त्यातीलच एक पुस्तक परवा वाचून हाता वेगळे केलं.हे मूळ पुस्तक गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांचे आहे.मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलेला आहे तर मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशक आहेत.


प्रोफेस ररुडॉल्फ,सुपरिया,ल्युसी,जिमी,गुप्ताजी,

बित्तबुंगा,पार्वती माँ,कालेवाली,माँ,पुरिया,झुरको,

वनिता,नारदी अशा व्यक्ती आहेत.ज्या आपले जीवन सहजपणे सांगत आहेत.


भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणाऱ्या,एकत्र बांधणाऱ्या,उभयान्वयी, भुवनमोहिनी महानदी नर्मदेला हे पुस्तक समर्पित केलेले आहे.


नदी काठावर झुकलेली झाड रंगीबेरंगी रत्नासारखे गोल दगड पसरलेला किनारा आणि सृष्टीच्या निर्मितीपासून अबोल असलेल्या टेकड्यांमधून अखंड वाहत राहिलेले हे स्वच्छ निर्मळ पाणी (पाणी हेच जीवन या सिध्दांताची ओळख करुण देणारे सतिश खाडे यांची या ठिकाणी प्रखरतेने याद आली.) या सर्वाच्या साक्षीने ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही अशा एखाद्या महाकाव्यासारखे हे शब्द दे आणि घे ही अनंत म्हणून इथं एवढ्यातच कुठेतरी वाहत असतात.प्रोफेसर रुडॉल्फ यांनी आदिवासींमध्ये मिसळून त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी निवडलेला तरुण व त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव जो जागोजागी इथे मिळतो.

गंगा,यमुना,ब्रह्मपुत्रा या भारतातल्या मोठ्या नद्या आहेत.त्या नद्या कुठे उगम पावतात ते ठाऊक असलं,तरी कुठून वाहत जाऊन,किती अंतर कापून मग समुद्राला मिळतात,याबद्दल माहिती नाहीच.तेव्हा आता भारतातल्या मोठ्या,लांब नद्यांच्या यादीत,या तीन नद्यांशिवाय आणखी एक नाव आज नवं आलं - नर्मदा ! नर्मदा परिक्रमणा समजावून सांगण्याचे कार्य हे पुस्तक करतं.फिजिक्सचा एखादा सिद्धांत समजावून सांगत असताना.ल्युसी म्हणते


एवढं मोठं हे अनंत विश्व एकाच मूलतत्त्वातून उत्पन्न झाले हा विचार किती रोमांचकारी आहे नाही?


गुप्ता,हीच गोष्ट विचार करण्यासारखी आहे.ज्या कोणी हा देश,ही संस्कृती जिवंत ठेवली आहे, त्यांनी धर्माला जीवनाचा पाया मानलेला नाही !"

शास्त्रीजी बोलता बोलता थांबले.नर्मदेकडे बघत राहिले.त्यांना काय म्हणायचं होतं ते मला समजत नव्हतं.शिवाय रोज न चुकता टिळा लावणारा हा ब्राह्मणच हे बोलतोय,याचंही आश्चर्य वाटत होतं.'श्रीहरि' म्हणून गुप्ताजी गप्प बसून राहिले.शास्त्रीजी गंभीर स्वरात पुढे म्हणाले,"बिहारी,ते काय किंवा मी काय,आपण ईश्वराचे भक्त आहोत,धर्माचे नाही आणि हा सारा देशही त्याचप्रमाणे जगतो." दूरच्या एका खडकाकडे बोट दाखवत मग ते पुढे म्हणाले, "तो समोर खडक दिसतोय ना? जा,त्याच्यावर शेंदूर लाव आणि देऊन टाक त्याला कुठलंही देवाचं नाव आणि कर एक नवा संप्रदाय सुरू! तुला कोणी अडवलं किंवा तुला अनुयायी नाही मिळाले,

तर मग येऊन सांग मला,माझं चूक होतं म्हणून!"


स्तब्ध होऊन ऐकत असताना पुढील विचार ऐकून थोडावेळ मी थांबलो.


दिवसातून दोनदा संध्या आणि पूजा करणारा एकांतात राहणारा हा ब्राह्मण आज मला काही वेगळाच वाटला.शास्त्रीजी पुढे म्हणाले, "हे बघ बिहारी,मी काय विचारतोय ते नीट ऐक आपल्या ऋषीमुनींनी जर धर्माला आपल्या आयुष्याशीच जोडलं असतं,तर आपण आपल्याच धर्मामध्ये इतके सगळे संप्रदाय उभे होऊ दिले असते का?"

एवढं विचारून शास्त्री थांबले आणि नंतर ते जे म्हणाले, ते बोलणं मला एक नवीच दिशा दाखवून गेलं! शास्त्री म्हणाले, "धर्म एकत्र आणतो.आज्ञा देतो,असं करा,असं करू नका, यावर श्रद्धा ठेवा,यावर श्रद्धा ठेवू नका वगैरे शिकवतो बिहारी,तुम्ही सगळी तर मुक्तीची लेकरं आहात,परम मुक्तीची;आणि जी मुक्तीची संतानं आहेत,ती बंधनं आणि आज्ञा,यांना जीवनाचं मूलभूत ज्ञान समजून वागतील,असं कसं होईल? शास्त्री पुन्हा थांबले.

गुप्ताजींच्या विचारात गढलेल्या चेहऱ्याकडे बघितलं; शेजारच्या कळशीतून थोडं पाणी घेऊन प्यायले आणि पुढे म्हणाले, "अरे, जी संस्कृती तुम्हांला इतकं स्वातंत्र्य देते, ती संस्कृती धर्माला जीवनाचा पाया मानते, असं कसं म्हणता येईल ?"

मला त्यांचं बोलणं ऐकण्यात खूप गोडी वाटत होती. गुप्ताजी जरा वेळ विचारात मग्न राहिले. मग म्हणाले, "गणेश, तू जो कहे सो.भाई, में तो धरम तू ध्याननो आदमी लागुं हुं. बीजा मन्त्रे समज ना आवे." ("गणेश, तू काही म्हण.बाबा रे, मी आपला पूजाअर्चा मानणारा माणूस, मला हे दुसरं काही समजत नाही.")

"तू तर येता जाता 'श्रीहरि' म्हणत असतोस की! तेच तर कळत नाही,की तुझा तर रोजच त्याच्याशी संबंध आहेच की! एक गोष्ट लक्षात घे बिहारी,आपला या देशातल्या प्रत्येकाचा संबंध सरळ ब्राह्मतत्त्वाशी आहे.मघाशी मी म्हटलं, तशी मुक्तीची लेकरं आहोत आपण.हा देश टिकून आहे ना,तो अध्यात्मावर,धर्मावर नाही." गुप्ताजींचा हात हातात घेऊन शास्त्री पुढे म्हणाले, "अरे, तुझा श्रीहरीही ब्रह्माचंच स्वरूप आहे. ईश्वराला जन्म घ्यावा लागलाय या देशात, आपल्याबरोबर,आपल्यामध्येच राहून आपली सुखदुःखं अनुभवावी लागली आहेत.

आईची अंगाई गीतं ऐकत ईश्वर इथं लहानाचा मोठा झाला आहे.ज्या देशातल्या आया मुलाच्या रक्तात परमब्रह्माच्या संदेशाचंच सिंचन करत असतील,

त्या देशाला धर्म आणि निषेधाचा देश म्हणायचंय कसं? ऐक बिहारी,तू तर व्यापारी आहेस,शिकलेला आहेस.जरा विचार करून बघितलंस,तर तुझ्या लक्षात येईल,की या देशातल्या अडाणी आणि लहानातल्या लहान माणसाला हे उपजतच माहीत असतं की हे जग ब्रम्हांडातून उत्पन्न झालं आहे आणि त्याच्यामध्ये लय पावणार आहे.आपल्या रक्तातच ही उमज आहे.गुप्ताजी व शास्त्रीजी यांच्यातील संवाद विचार करायला लावणारा आहे.


साऱ्या जगा व प्रेम करायला शिकलेली माणसं स्वतःच आपल्याच माणसांबद्दल इतका तिरस्कार मनात कसा ठेवू शकत असतील हे एक न उलघडलेलं कोडं आहे.


अगदी स्वच्छ समजलं,की या भोळ्याभाबड्या आदिवासींनी जे गहाण टाकलेलं असतं,ते घर नसतंच.घर हे आपलं नावापुरतंच.हे लोक गहाण टाकतात स्वतःलाच! कर्जदार घर नसतं,कर्जदार असतं गुप्ताजींकडे पैसे,धान्य,कापड असं काहीतरी आणायला,आपल्या पायांनी चालत आलेलं त्या आदिवासीचं अस्तित्व आणि त्याचं नाव.ते अस्तित्व आणि ते नाव,हे बंधन मानतं,की त्यानं स्वत:ला असलेलं कर्ज आणि व्याज दोन्ही फेडायचं आहे! पौर्णिमेच्या दिवशी जंगलं तुडवत चालत येऊन रस्त्याच्या कडेला थांबण्याची आज्ञा त्यांना त्यांच्या अंतरात्म्यातूनच मिळत असते; दुसरं कोणी सांगत नाही.


"सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मी एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला आलो 'होतो.तिथल्या एका बँकेत मी गेलो आणि सही करून चेक दिला." - प्रोफेसर हळूहळू बोलत होते,मी ऐकत होतो.

"बँकेच्या कारकुनानं चेक मला परत देत म्हटलं, 'बॉलपेननं केलेली सही चालत नाही,तुम्हांला शाईनं सही करावी लागेल." बिचारे प्रोफेसर रूडॉल्फ! त्याचं काय मत झालं असेल असं माझ्या मनात येत होतं,तेवढ्यात त्यांचे पुढचे शब्द ऐकू आले.


"ते ऐकून मला आनंद झाला.जगातली एक तरी प्रजा अशी आहे, की जे काही नवं येईल, ते डोळे मिटून स्वीकारत नाही.सुरुवातीला विरोध करेल,मग ज्ञान पारखून बघेल,विचारपूर्वक समजून घेईल,आणि मग स्वीकारण्यायोग्य वाटलं,तर आवडीनं स्वीकारेल."


बोलताना प्रोफेसर जरा थांबले असावेत.टेप जराशी नुसतीच पुढे गेली आणि मग पुन्हा त्यांचा आवाज आला - "आज पुन्हा इथं आलो आहे, तेव्हा बघतो तर तुम्ही सगळेच बॉलपेन वापरायला लागले आहात.पूर्ण विचारांती आता तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. इथल्या प्रजेच्या या गुणानं मला नतमस्तक करून विचारात टाकलं आहे."अशा प्रजेचीच संस्कृती हजारो वर्षांची असू शकते.'ती स्वत:ची परंपरा टिकवून धरू शकते. इथून पुढे संपूर्ण जगामध्ये खूप वेगानं परिवर्तन होत जाईल.संस्कृत लोप होण्याची भीती फक्त येथेच उभी होईल असं नाही, सर्वत्रच तसं होणार आहे."


"जे आर्थिकदृष्ट्या निर्बल आहेत,त्यांना ही भीती जास्त आहे.कदाचित मजूर म्हणून किंवा माणूस म्हणून असे लोक टिकून राहतील,पण एक प्रजा म्हणून त्यांची संस्कृती टिकून राहील किंवा नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.म्हणून तुम्हा तरुणांना माझी अशी सूचना आहे,की अशा या प्रजेच्या संस्कृतीला अनुरूप असे उद्योग तुम्ही शोधा.असे काही तुम्ही जर करू शकलात, तर ते तुम्ही स्वतःसाठीच काहीतरी केलंत असं म्हणता येईल.

आफ्रिकेत आम्ही अशी कामं हाती घेतली आहेत आणि तिथल्या तरुण पिढीलाच या कामात गोवलं आहे.बदल हेच जीवन आहे हे यातून समजले.


बित्तबुंगा हे एक व्यक्तीचे नाव नाही तर ते दोघा व्यक्तींची नावे आहेत.ही जरा कडमडी आहेत.म्हणजे त्यांनी शिकुन वेगळपण जपल आहे.व्याध ग्रह व दोन ठिपके या अकल्पित,आश्चर्यकारक आकृत्या या दोघांनीच काढल्या होत्या.त्यांच्याबाबतीत एक गमतीशीर प्रसंग आहे.


या दोघांना एक डॅम तयार करायचा होता.या डॅमसाठीची सर्व सामग्री ही अरण्यं विनामूल्यच पुरवतील ! पण तो लोखंडाचा दरवाजा तर इथं कोणी बनवू शकणार नाही.!त्यासाठी हे दोघं चौदा किलोमीटर चालत शहरात जातील आणि पैसे तर दरवाजासाठी द्यावेच लागतील.लक्षात

घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही होती,की डॅमसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं नाव बित्तुबंगाला माहीत होतं,पण त्या वरखाली होणाऱ्या दरवाजाला काय म्हणायचं,ते ठाऊक नव्हतं!आणि ते कोणाला जाऊन विचारलं,तर ते बित्तुबंगा कसले? स्वत:च त्याचं नाव ठेवून दिलं - 'गलसंटा !' अशा तऱ्हेनं सारं जग ज्याला डॅमचा दरवाजा म्हणतं त्या रचनेला नवं नाव मिळालं 'गलसंटा'!


यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक पत्र महत्त्वाचे आहे.


प्रिय ल्यूसी,

आपण एकमेकांना विसरून गेलो आहोतसं वाटावे,इतक्या दिवसांत तुला मी पत्र लिहिले नाहीये,तुझ्या मनांनाही मी उत्तर पाठवली नव्हती.आज अचानक त्यांची उत्तरं मिळाली, म्हणून पत्र लिहायला घेतलंय,गेले

कित्येक महिने मी इथे बित्तबुंगाच्या गावात आहे.आज त्यांच्या घरी राहणार आहे.बित्तुची बायको तिचं छोटंसं शेणामातीचं घर स्वच्छ करत होती.तिथे सामानात मला एक लांबट आकाराची लाकडाची पेटी दिसली.त्या पेटीवर ते मृगनक्षत्र आणि व्याध असे कोरलेले आहे.पेटीमध्ये सुतारकामाची,कोरीव कामाची आणि अशीच काही आणखी हत्यार आहेत,जी नेहमी सगळ्यांच्या वापरात असतात,त्याहून काहीशी वेगळी आहेत.जोगाला ती त्या पेटीबद्दल विचारलं,तर तिनं सांगितलं,की साठसाली

जातीच्या आदिवासींनी ही पेटी बित्तुची आई नारदी हिला तिच्या लग्नात माहेरून येणाऱ्या स्त्रीधनासारखी भेट म्हणून दिली होती.नारदी तर आता हयात नाही,पण जोगानं काही खूपच महत्त्वाची माहिती सांगितली.


खूप वर्षांपूर्वी,जेव्हा नारदी लहान होती तेव्हा,तिनं साठसाली जातीच्या एका लहान मुलाला,लांडग्याच्या तोंडून वाचवला होता.त्याच्या जखमा बांधून मग स्वत: जाऊन ती मुलाला त्याच्या आईबापांकडे सोपवून आली.आता तुला तर साहजिकच वाटेल,की यात काय मोठंसं? पण इथली ही माणसं,जातीजातींमधले भेदभाव, त्यांचे संशय, शंका आणि अंधश्रद्धा यांच्या जाळ्यांमध्ये अशी काही गुंतलेली आहेत,की दुसऱ्या जातीच्या जखमी झालेल्या लहान मुलाला थेट त्यांच्याच वस्तीत पोचतं करायला एकटं जाण्यात नारदीनं जी हिंमत दाखवली,ती खरोखरच प्रशंसनीय आहे.पुरियाचं काय झालं, ते तू वाचलं असलंस,तर नारदीच्या या साहसाचं तुला नक्कीच कौतुक वाटेल.तेव्हापासूनच नारदीला साठसाली आदिवासींच्या प्रमुखानं स्वत:ची मुलगी मानली.

सणावारांना नारदी साठसालींकडे राहायलाही जायची आणि मग नारदीचं लग्न झालं,तेव्हा साठसालींनी तिला ही पेटी भेट म्हणून दिली होती.जोगा म्हणते,की साठसाली लोकांचे रीतिरिवाज खूप वेगळे असतात,असं नारदी सांगायची.मी जोगाला विचारलं,की ही अशी चित्राकृती साठसाली लोक काढतात का,त्यावर ती 'होव' म्हणाली.

जोगाला अगदी संपूर्ण माहिती नाही, पण नारदीनं तिला सांगितलं होतं,की आकाशातला कुठला तरी एक तारा,हा साठसाली लोकांचा देव आहे.त्या ताऱ्याचं नावही साठसाली आहे आणि साठसालींचा प्रमुख तीनदा वीस-वीस,एवढ्या (म्हणजे साठ) वर्षांचा झाला,की तो या देवाच्या नावानं उत्सव करतो.


ल्सूसी,मला वाटायचं,की 'साठसाली' या शब्दाला काही अर्थ असा नसेल.पण आता एवढं ठाऊक झालं आहे,की साठ वर्षांच्या कालावधीचा या जातीच्या नावाशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. जोगाला सगळं ठाऊक नाही,

त्यामुळं तिला आणखी काही विचारलं, की लगेच म्हणते, 'मुं नीं जाणुं हुं' म्हणजे I do not know ! मी साठसालींच्या जंगलात जाणार आहे,तिथे जे काही समजेल,ते नक्की कळवेन.हे एवढं मला समजलं.ते तुला कळवलं.बित्तुबंगांमध्ये जे कलाकुसरीचं कसब आहे,ते त्यांची आई नारदी हिच्याकडून मिळालेलं आहे,हेही आता लक्षात आलं आहे.लहानपणापासून या पेटीतल्या लहान मोठ्या अवजारांशी खेळून त्यांच्यातला तो गुण विकास पावला असणार."


पुढील प्रसंग प्रार्थना समजावून सांगणारा आहे.


सुपरिया क्रॉसजवळ गेली आणि गुडघ्यावर बसून,पदर पसरून तिनं डोकं टेकवलं.तिला अशी प्रार्थना करताना मी प्रथमच बघत होतो. चर्चमध्ये प्रार्थना करण्याची पद्धतही अशी नसते, पण या घटकेला आम्ही सर्वचजण प्रणाम आणि प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन पोचलो होतो.एक सुजाण,

समंजस हिंदू स्त्री प्रभू येशूचे आशीर्वाद मागेल,तेव्हा धर्म आपोआप मार्ग दाखवेल हे स्वाभाविक होतं.अशा वेळी कोण कुठल्या धर्माचं आहे,याची कुंपणं नसतात,धर्मांच्या व्याख्या नसतातशकसल्याही सीमा नसतात.असते फक्त एक इच्छा,अशा कुठल्यातरी दैवी शक्तीच्या आशीर्वादाची,

जी घायाळ आणि आर्त मनानं प्रार्थना करणाऱ्या माणसाला त्याच्या दुःखामध्ये शांती देईल आणि त्याला हिंमत देईल.ती शक्ती मग ईश्वराची असो,कुठल्या जिंदा सागबानच्या सावलीची असो,एखाद्या डॉक्टरच्या हाताची असो,मित्राच्या हृदयातून आलेली असो की अश्वमेधपुन्या नर्मदेच्या पाण्याची असो कुठूनही मिळत असो.


अरण्यात वणवा पेटतो.अशाच पेटलेल्या वणव्याचे वर्णन मनाला वेदना देवून गेले.


पेटलेली अरण्यं भडभडणाऱ्या ज्वाळांच्या आवाजात स्वतःचा विनाशकारी आवाजही मिसळतात.

गवत,पानं,फांद्या आणि कोण जाणे आणखी काय काय,पेट घेण्यापूर्वी स्वतःच्या अस्तित्वाची अखेरची ओळख दिल्यासारखी एक भयानक किंचाळी फोडतात.

प्रचंड आग तिच्या नुसत्या पेटण्याच्या आवाजानंही भीती उत्पन्न करते.आत्ता या मध्यरात्री तिचं असं दर्शन आणि श्रवण किती भयानक वाटतंय,ते मी शब्दांमध्ये कधीही पूर्णपणे वर्णन करू शकणार नाही!


वेड्या फकिरानं सुरुवात केली.


मैं हूं बंदा तेरा, मैं हूं आशिक तेरा 

मैं तो दीवाना हूं मेरे सिजदों का क्या ? 

मैं नमाजी बनूं, या शराबी बनूं 

बंदगी मेरे घरसे कहां जायेगी ?


(भक्त-भगवान, सेवक-स्वामी, पामर-परम या सर्व नात्यांना छेद देणाऱ्या अशा मस्तीपूर्ण साध्या,सरळ मैत्री संबंधात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं.या देशाच्या संस्कृतीचा पाया कशात आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातला एक महत्त्वाचा दुवा त्याला सापडला असता.ब्रह्म या संकल्पनेशी असा साधा,सरळ प्रेम करण्याचा,भांडायचा,रुसण्या-मनवण्याचा, अंगाई गीत गाऊन पाळण्यात झोके देण्याचा संबंध,हा या प्रजेला एका दोरीनं बांधून ठेवणाऱ्या अदृश्य धाग्याचा एक तंतू आहे,हे त्याच्या लक्षात आलं असतं. 'बंदगी मेरे घरसे कहां जायेगी'च्या मस्तीत हिंडणारे सुफी संत,'ना मैं कोई क्रिया करम में'चा संदेश हातमागावर विणणारे महामानव, 'अंते तो हेमनुं हेस' म्हणत सर्व भेदभाव विसरून सर्व चराचराकडे एकाच भावनेनं बघणारी मानवरत्नं - या सर्वांचे या प्रजेवर अनंत उपकार आहेत. हजारो वर्षांची संस्कृती जिवंत ठेवण्याची कुवत या प्रजेत आणण्याचं काम अशा ज्ञात आणि अज्ञात अनेकांनी केलं आहे.)


निसर्ग व मानवाचं अनादी आहे.


निसर्गाच्या मांडीवरच बागडत मोठ्या होणाऱ्या या माणसांना निसर्गानं मुक्त आनंदाचं महान दान दिलं आहे.देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा,या आनंदाची मुळं सापडतीलच.निसर्गाशी असलेला हा तादात्म्य भाव प्रत्येक भारतीयाला,प्रत्येक पिढीत,वारशातच मिळत आला आहे.

कदाचित या अशा मनाच्या गाभ्यात असणाऱ्या आनंदालाच आध्यात्मिकता म्हणत असतील? तसंही असेल,पण एवढं खरं,की प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच.कुठेतरी एखाद्या मनुष्यात हा आनंद त्याच्या परम स्वरूपात प्रकट होतो,तेव्हा तो मनुष्य दैवत्व घेऊन उभा होतो आणि म्हणतो, "अहं ब्रह्मास्मि!" असा माणूस पूजा,धर्म, विधी,कर्मकांड या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोचतो.तो स्वत:ही निसर्गासारखाच निर्मल आणि श्रद्धावान होऊन जातो. मग तो नमाज पढो,किंवा न पढो,बंदगी त्याला सोडून जाऊच शकत नाही! 'अहं ब्रह्मास्मि' समजावतानाच हेही समजतं,की खरोखर 'अहं' असं काही अस्तित्वातच नाही! जे काही आहे,ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!


 "तुम्ही जर झाडाचे पान झालात तर झाड तुम्ही होईल."


जाता.. जाता.. निरोप घेण्यापूर्वी शेवटचा घटना प्रसंग


 " 'Beautiful!" ल्यूसी म्हणाली आणि तिनं नकाशा उघडला.लक्षपूर्वक नर्मदेचं स्थान बघत ती म्हणाली, "सबंध भारताचे बरोबर मध्यावर दोन भाग करते नर्मदा." "माझं मत वेगळं आहे." शास्त्री म्हणाले,"ही या देशाला जोडते.उत्तराखंड आणि दक्षिणपथाला जोडून एकत्र ठेवते रेवा." शास्त्री जरा थांबले आणि दूरवर बघत पुढे म्हणाले, "बेटा,अमरकंटकहून निघून समुद्राला जाऊन मिळते,

तोपर्यंत ही नदी किती श्रद्धा, किती सांत्वना,किती प्रेम, किती आदर,किती पुण्यं आणि अगणित दंतकथांचं सर्जन करते. सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या घरात बसून स्नान करणारे लोकही या नदीचं नाव घेत अंगावर पाणी ओतत असतात.


माणसाचं आयुष्य ही एक मूल्यवान गोष्ट आहे.हीच गोष्ट हे पुस्तक शेवट पणे सांगत आहे.

१६/४/२३

आपली प्राचीन खाद्य संस्कृती..

जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही,पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा,

कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ला जात होता.हे फार महत्त्वाचं आहे.भारतीय संस्कृतीच्या संपन्नतेमध्ये फक्त वास्तु- निर्माण शास्त्रच नव्हतं,कला आणि नाट्य क्षेत्रच नव्हतं,फक्त विज्ञान नव्हतं,फक्त अध्यात्म नव्हतं,तर संपन्न अशी खाद्य संस्कृतीही होती.अर्थात जीवनाच्या सर्व अंगांची परिपूर्णता होती.खाद्य संस्कृतीच्या बाबतीत आपल्या पूर्वजांनी खूप बारीक विचार करून ठेवलाय.

आजचे आहारशास्त्र ज्या गोष्टींना ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करते,त्या सर्व गोष्टी भारतीय आहारशास्त्राने काही हजार वर्षांपूर्वीच मांडलेल्या आहेत.'आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा,आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो' हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय.हे अद्भुत आहे.त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक,इजिप्शियन किंवा चिनी संस्कृतीत असा उल्लेख दूरान्वयानंही आढळत नाही.

दुर्दैवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार

प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही.

'भगवद्गीता'हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षं प्राचीन असावा असा अंदाज आहे.अगदी पाश्चात्त्य विद्वानांच्या हवाल्यावरून बघितलं तरी 'गीता' ही किमान ,अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे हे निश्चित.या गीतेतल्या १७ व्या अध्यायात ८,९ आणि १० हे तीन श्लोक आहेत,जे आहाराचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य करतात.सात्त्विक,राजसी आणि तामसी असे तीन प्रकारचे स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये शरीरपोषण करण्यासाठी तीन प्रकारचे आहार घेण्याची प्रवृत्ती दिसून येते.आणि या तीन मानसिक वृत्तींना अनुसरून त्यांची कर्मे देखील तीन प्रकारची असतात असे दिसून येते.


वानगीदाखल आठवा श्लोक बघू या -


आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः,रस्याः

स्निग्धाः,स्थिराः,हृद्याः,आहाराः,सात्त्विकप्रियाः

॥८॥

आयुष्य,बुद्धी,बल,आरोग्य,सुख आणि प्रसन्नता यांची वृद्धी करणारे,रसयुक्त,स्निग्ध,बराच काळ राहणारे आणि मनाला प्रिय वाटणारे असे आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात.एक परिपूर्ण, वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे.अगदी ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांमध्ये आहार - शास्त्राचे उल्लेख सापडतात. 'यजस्वम तत्रं त्वस्वाम..'

(आपल्या शरीराचे पोषण करून त्याचा सत्कार करा)असे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत.भोजनात गहू, जव,दूध यांचा समावेश असावाअसंही वर्णन येतं.

अथर्ववेदाच्या सहाव्या अध्यायातील १४०/२ या सूक्तात म्हटलंय,'तांदूळ,जव,उडीद आणि तिळापासून बनवलेले पदार्थ हा योग्य आहार आहे.' ह्या लिहिलेल्या ग्रंथांना समर्थन देणारे अनेक पुरावे मेहेरगढ,हडप्पा आणि मोहन-जो-दारोच्या उत्खननात सापडले आहेत.त्यानुसार सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज गहू,जव,दूध इत्यादींनी बनलेल्या वस्तू खात होते हे निश्चित. विशेष म्हणजे भोजनात मसाले वापरण्याचेही पुरावे उत्खननात मिळाले आहेत.दालचिनी, काळे मिरे यांचा उपयोग भारतीय भोजनामध्ये काही हजार वर्षांपासून होतोय.मेहेरगढ हे पाकिस्तानातील,बलुचिस्तानमधील लहानसे गाव,१९७४ साली तेथे सर्वप्रथम 'जीन- फ्रान्कोइस जरीगे' ह्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने उत्खनन सुरू केले आणि त्याला इसवी सनाच्या सात हजार वर्षांपूर्वीच्या गावाचे अवशेष मिळाले. महत्त्वाचे म्हणजे,ह्या उत्खननात जगातील सर्वांत प्राचीन असे शेती करण्याचे भरभक्कम पुरावे मिळाले.अर्थात 


आज तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे ठामपणे म्हणता येते की,जगात 'शेती' ही संकल्पना सर्वप्रथम भारतीय उपमहाद्वीपात सुरू झाली.

वेगवेगळ्या डाळी (मसूर,तूर वगैरे) उगवणं,गहू पिकवणं,त्या गव्हावर प्रक्रिया करून(अर्थात गव्हाला दळून) त्याच्यापासून कणिक तयार करणं आणि त्या कणकेचे वेगवेगळे पदार्थ बनविणं,हे सारं आठ-नऊ हजार वर्षांआधीपासून होत आलंय.जागतिक खाद्य संस्कृतीत भारताचं सर्वांत मोठं योगदान कोणतं..? तर ते मसाल्यांचं..! आजपासून किमान दोन-तीन हजार वर्षांपूर्वी भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात व्हायचे,याचे प्रत्यक्ष पुरावे मिळाले आहेत.


याच पुस्तकातील 'भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणा १'ह्या - लेखात इजिप्तमधील बेरेनाईक या पुरातत्त्व उत्खनन प्रकल्पाचा उल्लेख आहे.या बेरनाईक बंदरात एका बंद पेटीमध्ये आठ किलो काळी मिरी सापडली.कार्बन डेटिंगप्रमाणे ती पहिल्या शतकाच्या इसवी सन ३० ते इसवी सन ७० च्या मधील निघाली.भारतातून मसाले निर्यात होत होते याचा हा खणखणीत पुरावा आहे.


काळी मिरी,दालचिनी,तमालपत्र,धणे इत्यादी मसाल्यांच्या पदार्थांचा शोध भारतीयांनी हजारो वर्षं आधीच लावला होता.नंतर ह्या मसाल्यांच्या मदतीने भारतात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ तयार झाले. हे पदार्थ अत्यंत चविष्ट होते.म्हणून काही हजार वर्षांपूर्वीच्या काळातही आपल्या ह्या भारतीय पदार्थांची भुरळ विदेशी यात्रेकरूंना पडली होती.

मुळात ब्रिटिश असलेले 'प्रोफेसर अंगस मेडिसन' हे हॉलंडच्या ग्रोनिंगेन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिलाय,'द वर्ल्ड इकॉनॉमी - ए मिलेनियम पस्पेंक्टीव',अनेक विद्यापीठांत हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.ह्या ग्रंथात त्यांनी लिहिलंय की,आजपासून सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी भारताचा जो माल युरोपात जायचा,तो प्रामुख्यानं इटलीच्या दोन शहरांमधून जायचा-जीनोआ आणि व्हेनिस

आणि ह्या व्यापाराच्या आधाराने ही दोन्ही शहरं,त्या काळातील युरोपातील सर्वांत श्रीमंत शहरांत गणली जायची. ज्या वस्तूंमुळे ह्या शहरांना ही श्रीमंती लाभली होती,त्यांत प्रामुख्यानं होते - भारतीय मसाले..!

मात्र युरोपात भारतीय मसाले मुख्यतः वापरले जात होते ते जनावरांचे मांस शिजवून बनविण्याच्या पदार्थांमधेच,

शाकाहारी पदार्थांचे तंत्र पाश्चात्त्यांना फार काही जमलेले नव्हते. त्याची दोन कारणं होती एक तर हवामानाच्या - विषमतेमुळे तिथे वनस्पतींची पैदास तुलनेने कमी होती.तर दुसरं म्हणजे त्या लोकांना शाकाहारी पदार्थांचे वैविध्यच माहीत नव्हते.सुमारे दहा वर्षांपूर्वी मी माझ्या क्लायंटला भेटायला झुरिकला गेलो होतो.आमच्या भेटीनंतर तो मला तिथल्या भारतीय रेस्टॉरंटमधे घेऊन गेला.तिथे गप्पा मारताना तो मला म्हणाला की, काही दिवसांपूर्वी त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.अन् सुरुवात म्हणून किमान तीस दिवस पूर्णपणे शाकाहार करायचा असं ठरवलं.पण पाच-सहा दिवसांतच त्याचा कंटाळा येऊ लागला.मग पुढचे दहा-पंधरा दिवस कसेबसे काढले. शेवटी तीन आठवड्यांनंतरच आपला निश्चय मोडीत काढत त्याने मांसाहार परत सुरू केला.

मी विचारले, "असे का..?"

तर तो म्हणाला,"रोज हे असे घास-फूस खाऊन कंटाळा आला यार,रोज कच्च्या भाज्या, उकडलेल्या भाज्या अन् त्यांचे सलाद माणूस किती दिवस खाणार..?"

मी म्हटले, "अरे बाबा,नुसत्या कच्च्या अन् उकडलेल्या भाज्याच का?अक्षरशः हजारो पदार्थ आहेत आमच्या शाकाहारात,आता इथे,रेस्टॉरंट मध्ये बघ की..' - 

तो म्हणाला, "खरंय.पण हे आधी कुठं माहीत होतं..? आम्हाला वाटतं- शाकाहार म्हणजे कच्च्या किंवा उकडलेल्या भाज्याच..! त्यात मसाले वगैरे टाकून,पावाबरोबर खाता येण्यासारखे चविष्ट पदार्थ बनवता येतात,हे आम्हाला कुठे माहीत होतं..?"

मात्र भारताने अत्यंत रुचकर,चविष्ट,स्वादिष्ट आणि पोषक अशी खाद्य संस्कृती संपूर्ण जगाला दिली.आज जगाच्या पाठीवर जिथेही पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे,तिथे भारतीय रेस्टॉरंट असणारच..! चिनी आणि इटालियन खाद्य संस्कृतीप्रमाणेच,किंबहुना काही बाबतीत कांकणभर जास्तच,भारतीय खाद्य संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. इटालियन पिझ्झा आणि पास्ता डॉमिनोज

सारख्यांनी जगभर नेला.मात्र आपले दुर्दैव हे आहे की,इडली,डोसा,वडा-पाव,छोले-भटुरे यासारख्या पदार्थांना विश्वव्यापी बनवणाऱ्या उपाहारगृहांच्या साखळ्या आपल्याला निर्माण करता आल्या नाहीत.आणि आपलं वैविध्य तरी किती..? नुसतं दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ म्हणून होत नाही.त्यात आंध्र प्रदेशाचे,तामिळनाडूचे,

कर्नाटकचे,केरळचे पदार्थ वेगवेगळे आहेत.डोसा आणि वडे हे दोन-अडीच हजार वर्षांपासून 'भारतात प्रचलित आहेत.मात्र इडली ही भारतातली नाही.भारतीयांची आहे,पण भारताबाहेरची,जावा सुमात्रा (इंडोनेशिया) च्या भारतीय राजांच्या आचाऱ्यांनी, हजार-बाराशे वर्षांपूर्वी फर्मेंटेशन पद्धतीने तयार केलेला पदार्थ म्हणजे इडली..! तो जावा-सुमात्राकडून दक्षिण भारतात आला अन् पुढे जगभरात प्रसिद्ध झाला.बेल्लारी जिल्ह्यातील 'शिवकोटीचार्यांनी' इसवी सन ९२० मधे कन्नड भाषेत लिहिलेल्या 'वड्डराधने' ह्या पुस्तकात सर्वप्रथम "इडलीगे' असा इडलीचा उल्लेख आढळतो.

'इंडियन करी' हा प्रकार जगभरात अतिप्रसिद्ध आहे.

जगातील अनेक 'सेलिब्रिटीज'ना या 'करी'ची चटक लागलेली आहे.'करी' म्हणजे भारतीय मसाल्यांनी बनलेली ग्रेव्ही.ही शाकाहारी आणि मांसाहारी,अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांत वापरता येते.या 'करी'चा इतिहास मनोरंजक आणि प्राचीन आहे.हा शब्द तामिळ भाषेच्या 'कैकारी' ह्या शब्दावरून तयार झाला आहे. कैकारी म्हणजे वेगवेगळ्या मसाल्यांबरोबर शिजवलेली भाजी.जगाच्या वेगवेगळ्या भागात भोजनापूर्वी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. ख्रिश्चन,ज्यू वगैरे लोकंही विशेषत्वानं पाळतात.भारतीयांमध्ये या पद्धतीचं महत्त्व आहे.पण भोजनापूर्वीची भारतीय प्रार्थना फार परिपूर्ण आणि अर्थगर्भित आहे.अन्नाला आपण पूर्णब्रम्ह मानले आहे.'भोजन' ह्या शब्दाच्या सिद्धीसाठी पाणिनीने धातुसूत्र लिहिले आहे - 'भुज पालन अयवहारयो',याच्याच पुढे जाऊन, भोजनापूर्वी आपण जे मंत्र म्हणतो,ते आहेत-


ॐ अन्नपतेऽन्नस्य नो देह्यनमीवस्य शुष्मिणः।

प्र प्र दातारं तारिषऽऊर्जं नो धेहि द्विपदे चतुष्पदे ।।

किंवा -

ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।

ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ।।

ॐ सहनाववतुसहनौ भुनक्तु

सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तुम मा विद्विषा वहै ॐ शांतिः शांतिः शांतिः


एकुणात काय,तर एका परिपूर्ण,वैज्ञानिक आणि पोषक अशा प्राचीन खाद्य संस्कृतीचे आपण संवाहक आहोत.या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यात गैर काहीच नाही,उलट अशी ही समृद्ध खाद्य संस्कृती जगासमोर आणणे हे आवश्यक आहे..!


२५ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

१४/४/२३

गोष्ट चांगुलपणा सांगणारी..

फार जुनी गोष्ट नाहीये.ज्युलिओ डियाझ हा तरुण समाजसेवक कामावरून घरी सबवेने न्यू यॉर्कमधील ब्रॉक्स येथे चालला होता.तो दररोज एक स्थानक आधी उतरायचा आणि त्याच्या आवडत्या हॉटेलात जेवून घरी जायचा.परंतु आजची रात्र नेहमीसारखी नव्हती.

सबवेच्या निर्मनुष्य स्थानकावरून तो हॉटलकडे जाऊ लागला,तेव्हा सावल्यांत दडलेली एक व्यक्ती बाहेर आली.तो हातात चाकू घेतलेला किशोरवयीन मुलगा होता.नंतर ज्युलिओने एका पत्रकाराला सांगितलं की,मी त्याला लगेचच पाकीट देऊन टाकलं.'चोरी फत्ते झाल्यामुळे मुलगा पळून जात होता तेवढ्यात ज्युलिओनं एक अनपेक्षित गोष्ट केली.

त्याला हाक मारून तो म्हणाला,"ए,थांबरे,मुला,

तू रात्रभर लोकांना लुटत राहणार असशील तर माझा कोटही घे म्हणजे थंडी वाजणार नाही." मुलगा मागे वळून ज्युलिओकडे अविश्वासाने पाहू लागला आणि म्हणाला,"पण तुम्ही असं का करत आहात?" त्यावर ज्युलिओ म्हणाला,"काही डॉलर्ससाठी तू तुझं स्वातंत्र्य गमवायला तयार आहेस, याचा अर्थ तुला पैशांची नक्कीच फार गरज आहे.मी काय म्हणतोय की,मला आत्ता फक्त जेवायचं आहे. तुला माझ्यासोबत जेवायला यायचंय का? तर जरूर ये.'मुलगा तयार झाला.त्यानंतर काही क्षणांत ज्युलिओ आणि त्याचा हल्लेखोर असे दोघं त्या रेस्टॉरंटमधील टेबलाशी बसलेले होते. वेटर्सनी त्यांचं आपुलकीने स्वागत केलं. मॅनेजरही गप्पा मारायला थांबला.अगदी भांडी घासणाऱ्यांनीही येऊन 'हॅलो' म्हटलं.


तेव्हा मुलगा आश्चर्याने म्हणाला,"तुम्ही इथं सर्वांना ओळखता? तुमच्या मालकीच आहे का हे हॉटेल ?" 


"नाही रे बाबा,मी इथं पुष्कळ वेळा जेवतो म्हणून ओळखतात ते मला.' "पण तुम्ही त्या भांडी घासणाऱ्यांशीही किती चांगलं बोललात?" 


"पण सर्वांशी चांगलंच वागायचं असतं हे शिकवलेलं नाही का तुला कुणी ?" "शिकवलेलं तर आहे," मुलगा म्हणाला, "परंतु लोक प्रत्यक्ष तसं वागतात कुठं?"


ज्युलिओ आणि हल्लेखोरांचं खाऊन झाल्यावर बिल आलं;परंतु पाकीट नव्हतं.त्यानं मुलाला म्हटलं,"हे बघ,तुलाच हे बिल भरावं लागेल कारण माझे पैसे तुझ्याकडे आहेत.त्यामुळे मला तर हे बिल भरता येणार नाही;पण पाकीट परत दिलंस तर मी आनंदाने दोघांचं बिल देईन.' मुलाने पाकीट परत दिल,ज्युलिओने बिल भरलं आणि त्याला २० डॉलर्सही दिले.मात्र एका अटीवर,ती म्हणजे त्याने चाकू ज्युलिओला कायमचा द्यायचा.पत्रकाराने नंतर ज्युलिओला विचारल की,तू त्या चोरट्याला जेवायला का घातलस? तेव्हा किंचितही न अडखळता तो म्हणाला,

"मला वाटलं की तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल.आपण लोकांना चांगलं वागवलं तर तेही आपल्याशी चांगलेच वागतील अशी आशा धरायला काहीच हरकत नसते.या गुंतागुंतीच्या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट हीच असेल."


मी ज्युलिओच्या चांगुलपणाची गोष्ट एका मित्राला सांगितली तेव्हा तो पटकन म्हणाला, "थांब जरा,मी उलटी करून येतो,एवढं सौजन्य झेपत नाही मला.' ठीक आहे,ही कहाणी वाजवीपेक्षा जास्तच गोड आहे,ती ऐकताना लहानपणी चर्चमध्ये ऐकलेल्या आणि घासून घासून गुळगुळीत झालेल्या धड्यांची आठवण येते.हे खरंय,


मॅथ्यू ५ मधील 'सर्मन ऑन माऊंट मध्ये असंच काहीसं सांगितलं आहे.'डोळ्याचा बदला डोळ्याने आणि दाताचा बदला दाताने घ्या'असं म्हटलेल तुम्ही ऐकलं असेल; परंतु मी आपणास सांगतो,दुष्टपणे वागणाऱ्यांचा बदला घेऊ नका.कुणी उजव्या गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा.कुणी जबरदस्तीने तुमचा अंगरखा काढून घेतला तर त्याला आतली बंडीही काढून द्या.कुणी एक मैल चालायची जबरदस्ती केली तर त्याच्याबरोबर दोन मैल चाला.


तुम्हाला नक्कीच वाटेल की,येशू हे सांगतोय तरी काय?असं वागायला आपण साधुसंत आहोत की काय ? प्रश्न असा आहे की आपण सगळे माणसं आहोत आणि खऱ्या जगात दुसरा गाल पुढे करणं म्हणजे भोळसटपणाची परिसीमा गणली जाईल,हो ना?परंतु अगदी हल्लीच मला कळलं की,येशू एक अत्यंत तर्कशुद्ध तत्त्व मांडत होता.

आधुनिक मानसशास्त्रज्ञ त्या वर्तनास 'जशास तसे' छापाचं किंवा पूरक नसलेलं (नॉन कॉप्लिमेंटरी) वर्तन म्हणतात.मी अगोदर उल्लेख केल्यानुसार,माणसांच्या मनात एकमेकांच्या भावनांची प्रतिबिंबे पडत असतात.

कुणीतरी तुमचं कौतुक केलं की तुम्हीही त्याचं उलट कौतुक करता.कुणीतरी तुम्हाला वेडावाकडा टोमणा मारतं,तेव्हा तुम्हालाही त्याला खणखणीत सुनवायची इच्छा होते.आधीच्या प्रकरणांत आपण पाहिलं की, शाळांत,कंपन्यांत आणि लोकशाही व्यवस्थांत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसादाचे बंध किती सामर्थ्यशाली असतात.तुमच्याशी लोक प्रेमानं वागतात तेव्हा योग्य वागणं सोपं असतं; परंतु सोपं असलं तरी ते पुरेसं नसतं.येशूच्या शब्दांत सांगायचं तर जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुम्हीही प्रेम केलंत तर त्याचं बक्षीस काय मिळणार ? कर गोळा करणारे लोकही तेच करतात की,तुम्ही फक्त तुमच्या भावाबहिणींचंच प्रेमानं स्वागत केलंत तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काय वागलात ?' प्रश्न असा आहे की,आपण त्याहून एक पाऊल पुढे जाऊ शकतो का?आपण फक्त आपली मुलं,सहकर्मचारी,शेजारी यांचंच भलं न चिंतता आपल्या शत्रूचंही भलं चिंतू शकतो का? ते कठीण असतं आणि आपल्या सहजप्रेरणेच्या विरुद्धही असतं. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याकडे पाहा.विसाव्या शतकातले हे दोन महानायकच आहेत.समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर न देण्याच्या बाजूने ते असले तरी ते असामान्य व्यक्ती होते हेही तितकंच खरं आहे.पण मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांचं काय? एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करायला आपल्याला जमणार का ?तसंच मोठ्या स्तरावर म्हणजे तुरुंगात आणि पोलीस ठाण्यांत दहशतवादी हल्ले झाल्यावर आणि युद्धकाळात तसं वागायला जमणार का? हा प्रश्नच आहे.


'एखाद्या माणसाला त्याच्या अपराधाचा दंड द्यायचा असल्यास त्याला शिक्षा करावीच लागते. त्याच्यात परिवर्तन घडवून आणायचं असल्यास त्याच्यात सुधारणा करावी लागते आणि मारून मुटकून कुणीही सुधारत नसतं.'


जॉर्ज बर्नार्ड शॉ (१८५६-१९५०)


ह्युमनकाइंड मधून..

१२/४/२३

भगवद्गीता - व्यास 

(इसपू चौथं ते पाचवं शतक)


भगवद्गीतेला सर्वसामान्य लोकांसमोर आणणारे ग्रंथकार म्हणून तसंच महाभारताचे रचेते म्हणून महर्षी व्यास यांच्याकडे बघितलं जातं. महाभारतामध्ये व्यासांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.महाभारताच्या मूळ ग्रंथाचं नाव 'जय' असल्याचं मानण्यात येतं.व्यासांनी हा ग्रंथ आपला मुलगा शुक आणि आपले पाच शिष्य यांना सांगितला.पुढे 

त्याचं 'भारत' हे नामकरण झालं आणि त्यानंतर तो अनेक ऋषींनी पुढे कथन करत गेल्यानंतर त्याचं नाव 'महाभारत' झालं असंही मानण्यात येत.महर्षी व्यास यांचं 'कृष्णद्वैपायन' हेही नाव होतं,असं म्हटलं जातं. मात्र याबाबत मतमतांतरं आहेत.पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला.सत्यवती ही कोळीकन्या असून ती कुमारिका असतानाच तिनं व्यासांना जन्म दिला. व्यासाच्या जन्माची कथा विलक्षण आहे.सत्यवतीच्या वडिलांचा व्यवसाय नदीपात्रातून होडीतून लोकांना एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवणं असा होता.एकदा सत्यवती पराशर ऋषींना होडीतून दुसऱ्या किनारी पोहोचवण्यासाठी निघाली असताना, तिच्या सौंदर्यावर पराशर ऋषी लुब्ध झाले त्यांनी तिच्याबरोबर समागम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सत्यवतीनं त्यांना होकार दिला.याच समागमातून व्यासांचा जन्म झाला.पुढे सत्यवतीचं लग्न हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्याशी झालं,सत्यवती आणि शंतनू यांचा पुत्र म्हणजे भीष्म! त्या अर्थान भीष्म आणि व्यास हे सावत्र भाऊ झाले अशा रीतीनं व्यासांचा महाभारताशीदेखील प्रत्यक्ष संबंध होताच.तसंच पूर्वी एकच वेद होता.या वेदाचे चार भाग व्यासांनी केले असं मानलं जातं.तसंच व्यासांनी महाभारताची रचना करून नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र याविषयी या ग्रंथात भाष्य केल्यानं भारतीय संस्कृतीचा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो.

आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असंही संबोधल जातं आणि या दिवशी गुरूची पूजा केली जाते. यालाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं.

'व्यासोचिछष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्ट करून सोडलं आहे असा समज सर्वत्र आहे.याचं कारण भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या एकूणएक पैलूंना स्पर्श केला आहे.केवळ स्पर्शच नाही तर त्या त्या विषयांचं सखोल विवेचनही केलं आहे.

खरं तर हजारो वर्षांपासून भगवद्गीता वाचून अनेक जण प्रभावित झाले आणि वेगवेगळ्या कालखंडांत या ग्रंथानं वेगवेगळ रूप धारण केलं.

भगवद्गीतेपासून अष्टावक्रगीता,ईश्वरगीता,

कपिलगीता,गणेशगीता,पराशरगीता,

भिक्षुगीता,व्यासंगीता,रामगीता,शिवगीता,

सूर्यगीता,हंसगीता आणि यमगीता लिहिल्या गेल्या.मूळ भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून संत ज्ञानेश्वरांनी हीच संस्कृतमधली भगद्गीता सुलभ भाषेत मराठीतून आणली.विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचं मराठीत ओव्यांच्या रूपात 'गीताई' या नावानं भाषांतर केलं आहे.भगवद्गीतेवर मराठीतून, हिंदीतून आणि संस्कृतसह अनेक भाषांमधून अनेक ग्रंथ लिहिले गेले.महात्मा गांधी यांनी 'अनासक्ती योग',परमहंस योगानंदांनी 'ईश्वरार्जुन संवाद',अरविंद घोष यांनी 'एसेज ऑन गीता', इस्कॉनच्या प्रभुपादस्वामी यांनी 'गीता आहे तशी´,ज.स.करंदीकर यांनी 'तत्त्वमंजरी' अर्थात 'निर्लेप कर्मशास्त्र',जयदयाल गोयंका यांनी 'गीतातत्त्व विवेचनी टीका',दासोपंत यांनी 'गीतार्णव',कृ.ह. देशपांडे यांनी 'श्रीगीतार्थबोध', आदि शंकराचार्य यांनी 'गीताभाष्य',

रामानुज यांनी 'गीताभाष्य',टिळक मंडाले इथे तुरुंगवासात असताना त्यांनी अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. नारायण वासुदेव गोखले यांनी भगवद्गीतेचा इंग्रजीतून अनुवाद केला,तसंच त्यांनी 'गीतेमध्ये काय आहे?' या ग्रंथातून भगवद्गीतेची मांडणी केली.देवदत्त पटनायक यांनी 'माझी गीता' हा ग्रंथ इंग्रजीतून लिहिला.याशिवाय अनेक अभ्यासकांनी अनेक भाषांमधून भगवद्गीता सर्वसामान्य लोकां- समोर आणली.'भगवद्गीता' हा इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे,की अनेक धर्मातल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं.आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या वेळी आणि मोहाच्या वेळी काय करावं यासाठी महात्मा गांधींनी संस्कृत शिकून भगवद्गीतेचा अभ्यास केला.

आपल्या आईची जागा या ग्रंथानं घेतली,असं महात्मा गांधींनी म्हटलंय. मला आत्मिक समाधान केवळ 'भगवद्गीता' वाचून मिळतं आणि असा ग्रंथ झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही,अशा रीतीनं महात्मा गांधींनी भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलं.


 "मी जेव्हा भगवद्गीता वाचतो आणि त्याच वेळी विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो त्या वेळी मला सगळं काही निरर्थक भासतं,असं भगवद्गीतेविषयी बोलताना विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यानं म्हटलं.


'भगवद्गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा सगळ्यात सरळ आणि सुलभ सारांश आहे.म्हणून केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे.आहे,' असं विख्यात विचारवंत आणि साहित्यिक असलेल्या अँल्डस हक्स्ली यानं म्हटलं. 


मॅनहटन प्रकल्पाचा प्रमुख रॉबर्ट जे. ओपेनहायमर या शास्त्रज्ञावर तर भगवद्गीतेचा खूप मोठा प्रभाव होता. तो नेहमी आपल्या- जवळ भगवद्गीतेची प्रत बाळगत असे.


योगी अरविंद,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर,जर्मन विचारवंत रुडॉल्फ स्टिनर,हेन्री डेव्हिड थोरो,राल्फ वाल्डो इर्मसन, स्वामी विवेकानंद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यावरदेखील भगवद्गीतेनं खूप मोठा प्रभाव पाडला होता..


१९८५ साली अमेरिकेतल्या पीटर ब्रुक यानं महाभारतानं प्रभावित होऊन नऊ तासांचं नाटक 'महाभारत' याच नावानं प्रत्यक्ष सादर केलं. या नाटकाचे त्यानं चार वर्ष जगभर प्रयोग केले. त्यानंतर पीटर ब्रुकन याची लांबी कमी करून १९८९ साली दूरदर्शनसाठी सहा तासांची फिल्म बनवली.त्यानंतर डीव्हीडी ही तीन तासांची तयार केली.या फिल्मची पटकथा पीटर ब्रुकन स्वतःच लिहून ती फिल्म स्वतःच दिग्दर्शित केली होती. या फिल्मचं संगीत नोबेल पुरस्कारप्राप्त रवींद्रनाथ टागोर यांचं होतं.

'महाभारत' ही फिल्म तयार करण्यासाठी पीटर ब्रुकनं आठ वर्षं परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता.या फिल्मनं अनेक पुरस्कार प्राप्त केले.इतकंच नाही तर या फिल्मन फ्रान्स,यूके,जपान,डेन्मार्क,बेल्जियम, स्वीडन,पोर्तुगाल,

नॉर्वे,नेदरलँड आणि फिनलँड इथे प्रदर्शित होऊन भरभरून यश मिळवलं. यू ट्यूबवर ही फिल्म उपलब्ध आहे.महाभारताच्या कथानकावर अनेकांनी चित्रपट काढले असले तरी शशी कपूर निर्मित 'कलयुग' हा चित्रपट खूप गाजला होता. १९८८ ते १९९० या काळात बी.आर.चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा दिग्दर्शित भारतात 'महाभारत' ही दूरदर्शन मालिका प्रसारित झाली.

या मालिकेवर एकूण ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जगातली सगळ्यात जास्त बघितली गेलेली ही मालिका होती.९४ भागांत असलेल्या मालिकेचा प्रत्येक भाग हा ४५ मिनिटांचा असून ब्रिटनमध्ये बीबीसीद्वारा याचं प्रसारण केलं तेव्हा प्रेक्षकांची संख्या ५० लाखांच्यावर गेली होती.ही मालिका सुरू असताना अघोषित संचारबंदी लागल्या प्रमाणे संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट असे. ज्यांच्याकडे टीव्ही संच नाही.असे अनेक जण शेजाऱ्यांच्या घरी विनासंकोच मालिका बघण्यासाठी जात आणि गंमत म्हणजे येणाऱ्याला कोणीही 'नाही' म्हणत नसे. भीष्माची भूमिका करणारा मुकेश खन्ना हा अभिनेता तर इतका लोकप्रिय झाला की,त्यानं आपल्या कंपनीला भीष्म हेच नाव दिलं,तर श्रीकृष्णाची भूमिका करणारा नितीश भारद्वाज या अभिनेत्याला रस्त्यावर लोकांनी बघितलं तर ते चक्क त्याच्या पाया पडत.तसंच महाभारताचं शीर्षकगीत विख्यात गायक महेंद्र कपूरच्या धीरगंभीर आवाजातलं होतं.


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।७।। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।८।।


'भगवद्गीता' अनेक भाषांत भाषांतरित झाली; आजवर तिच्या हजारो / लाखो प्रती विकल्या गेल्या; तेव्हा एकच सत्य समोर येतं आणि ते म्हणजे 'भगवद्गीता' आणि तिचा निर्माता महर्षी व्यास यांनी समस्त मानवजातीला अचंबित व्हावं असं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान दिलं हेच खरं!


अति झोप,भीती,कमकुवत मन,आळस आणि दिरंगाई या पाच गोष्टींपासून माणसानं मुक्त झालं पाहिजे. - महर्षी व्यास


४ एप्रिल २०२३ या लेखातील शेवटचा भाग


समाप्त..