* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/११/२३

भातुकलीच्या खेळामधला... In the game of Bhatukali...

आटपाट नगरातली ही कहाणी !


याच आटपाट नगरीत,नगरातल्या एका महामार्गावर एका बाजुला दिमाखदार महालही आहेत आणि दुस-या बाजुला याचना करत जगणारे याचकही आहेत !


नदीचे दोन काठ जणु...


एका काठावर गरीबी... एका काठावर श्रीमंती.... दोन काठांच्या मध्ये वहात असतो मध्यमवर्गीय, खुळावल्यासारखायाच नगरीत,एका ठिकाणी याचकांचा अर्थात् भिक्षेक-यांचा डाॕक्टर म्हणुन,काम करत असतांना,पन्नाशीची एक मावशी आणि तिच्या शेजारी पडलेले एक बाबा दिसले.मावशी धडधाकट होती,पण तीच्या बाजुला पडलेल्या बाबांची अवस्था अत्यंत वाईट होती. मावशीला म्हटलं,'मावशी,भीक मागण्याच्या ऐवजी काहीतरी काम करा की... '  


मावशीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं,माझ्याकडं बघत तोंड मुरडलं.पदर तोंडावर घेवुन तीने तोंड फिरवलं होतं.माझा फुकटचा सल्ला तीला आवडला नव्हता.फुकट मिळणाऱ्या गोष्टीं आवडतात.... सल्ले नाही ! 


मी बोलत असतांनाच,बाबांनी त्या मावशीला खोकत खोकत पाणी मागितलं,तीने त्यांना चार शिव्या हासडुन पाणी दिले... देतांना म्हणाली, 'मर की मुडद्या आता,आजुन किती तरास देनार हायेस ?' 


ते खुप कष्टाने उठुन बसले,पाणी पिवुन,हाताच्या पालथ्या मुठीनं तोंड पुसत,तोंड कसनुसं करत  परत पडून राहिले.जणु त्यांनी तीच्या शिव्या ऐकल्याच नव्हत्या.... बोलायला,त्यांच्या अंगात त्राणही नव्हतं... ! 


ते एका कुशीवर झोपले होते.अंगावर कुणीतरी दिलेला फुल बाह्यांचा स्वेटर होता,फाटका


पँटही ब-यापैकी फाटलेली होती.... दाढी पुर्ण पांढरी,छातीपर्यंत वाढलेली,न बोलतांही त्यांना धाप लागत होती... डोळे खोल गेलेले... जशा कवटीतल्या खोबण्या... 


बघतांना असं वाटत होतं की हाडाच्या सापळ्याला कुणीतरी कपडे घातले असावेत !  


एकूण अवस्था अत्यंत वाईट ! 

मी मावशीला म्हटलं,'बाबा,कोण आहेत तुझे मावशी ?'


माझे वडिल आहेत,असं ती मला सांगेल असं मला वाटलं... कारण दोघांच्या वयातला फरक  खुप होता... !

पण, ती वैतागुन म्हणाली,'नवरा हाय ह्यो माजा.... ! मरंना पन...' मला आवडलं नाही तीचं हे बोलणं...


मी बाबांकडे वळलो,त्यांची चौकशी करु लागलो, हे त्या मावशीला आवडलं नाही.


माझं लक्ष बाबांकडे होतं. 


'खुप त्रास होतोय का ?अॕडमिट करू का बाबा?' 


असं मी विचारलं नुसतं आणि बाबांच्या डोळ्यातनं पाणी ओघळु लागलं,त्यांनी माझ्याकडं बघत फक्त हात जोडले... ते उचलणंही त्यांना जड जात होतं... ! 


यावरुन मी काय ते समजलो !


बाबांचं वय असेल ६५/७० आणि वजन असेल २५/२७ किलो ! 


" म्हयन्याच्या पेपराची रद्दी याहुन जास्त भरते.!"


माणुस म्हातारा झाला,दुस-यांच्या नजरेतली किंमत संपली की त्याची किंमत रद्दी पेक्षाही कमी होते... ! असो....


यानंतर मी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.सर्व तपासण्या केल्या.जगातले सर्व काही आजार जणू या बाबांनाच झाले होते.डायबेटीस,टीबी, हाय बी.पी.किडनी फेल्युअर,काविळ,पायामध्ये जखम होऊन सेप्टीक,आणि भरीत भर म्हणून अंतिम टप्प्याताला एड्स ! 


सीनियर डाॕक्टर्सनी  प्राथमिक उपचार केले आणि मला बोलावून सांगितलं, 'अभिजित या केस मध्ये फार काही करता येणार नाही.तरीही आपण काहीतरी प्रयत्न करू.' 


बाबा २७  दिवस अॕडमिट होते.आता  बर्‍यापैकी ते माणसात आले होते.या २७ दिवसात त्यांची बायको एकदाही दवाखान्यात फिरकली नव्हती. 

दवाखान्यातच बाहेरची मेस लावुन जेवणाचा डबा आणि चहापाणी,जेवण,नाश्ता सर्व सुरू केलं.या दिवसांत बाबांची तब्येत सुधारत गेली, वजन बऱ्यापैकी वाढलं, चेहर्‍यावर तरतरी आली.परंतु बाबांना जे आजार झाले होते, त्यातले बरेच आजार कधीही बरे न होणारे असे होते.या आजारा बरोबरच त्यांना जगायचे होतं, मरेपर्यंत ! 

याच आठवड्यात म्हणजे १४ सप्टेंबर २०२०, सोमवारी, डॉक्टरांनी मला फोनवर सांगितले डिस्चार्ज देत आहोत,आता यांना घरी घेऊन जा... 


घरी ? 


घर कुठं होतं बाबांचं ? 


त्यांच्या बायकोचा तर पत्ताच नव्हता. 


डिस्चार्ज देतांना डॉक्टर म्हणाले,'अभिजीत,तुला तर माहीतच आहे,त्यांना आपण संपूर्णपणे बरं करू शकत नाही.येत्या काही दिवसांचे ते सोबती आहेत,जाताना त्यांना फार काही त्रास होऊ नये एवढंच आपल्या हातात आहे,आपण जास्त काही करू शकत नाही. देतोय त्या गोळ्या कायम सुरू ठेव..कमी त्रासात होईल मृत्यु होईल इतकंच आपल्या हातात  !'


एक डाॕक्टर त्याच्या आयुष्यात पेशंटचे अनेक मृत्यु पाहतो...पण स्वतःच्या घरातला मृत्यु पचवु शकत नाही !


माझंही तसंच झालं होतं... हा माणुस ... यांना बाबा - बाबा म्हणता म्हणता,जेवु खावु घालता घालता,माझ्याच घरातला कधी होवुन गेला कळलं नाही... ! यांच्या मृत्युच्या अपशकुनी बातमीने मी हेलावलो...आत्ता मी डाॕक्टर नव्हतोच,मी झालो होतो त्या बाबांचं पोर ! 


बाबांना मुलबाळ काही नव्हतंच ! 


हातातली गोळ्यांची चिठ्ठी घेऊन मी बाबांजवळ आलो. 


बाबा म्हणाले ,'काय म्हणाले डाॕक्टर?' 


मी आता त्यांना काय सांगणार होतो ? 


तरीही हसत म्हणालो,'सगळे भारी भारी आजार आहेत तुम्हाला बाबा,हलकं सलकं काही नाहीच झालेलं तुम्हाला... सगळे आजार मौल्यवान ....! 


बाकी काही मिळो की न मिळो,आजार मात्र लाखातले निघालेत ! 


मला नेहमीच वाटतं,असावं तर सगळंच मोठं आणि भव्य दिव्य... ! छोटं छोटं आणि चुटुक मुटुक काही असूच नये... ! 


मरावं तर देशासाठी युद्ध करुन,शत्रुवर मोठ्ठा बाॕम्ब टाकुन मरावं ...आणि त्यात शहीद व्हावं..! बसच्या सीटवरून भांडून मारामारी करुन मरण्यात काय मजा असते ?


पडलो तर हिमालयाच्या टोकावरून पडावं, रस्त्यानं चालतांना ठेच लागून पडण्यात काय मजा ? 


बुडलो तर समुद्राच्या तळाशी जावं..दहा फुटाच्या डबक्याचा तळ गाठुन बुडुन मरण्यात कसलं आलंय थ्रील? पाळावे तर वाघ - सिंह, मांजर काय कुणी पण पाळतं ! सायकल चालवतांना अॕक्सीडेंट झाला.... ? 

अरे हॕट...विमान चालवतांना अॕक्सीडेंट होण्यात चार्म आहे ! रस्त्यावरच्या कुत्र्यावर कुणीही हाड् म्हणुन दगड भिरकावतं.... पण... आपण असा दगड भिरकवावा आकाशात....आणि सुर्यानं जरा बाजुला सरकून म्हणावं... अरे हळु...लागला असता ना यार दगड मला !


ध्येय मोठं असावं... ! 

सर्वच काही भव्य दिव्यच असावं ! 


थोडी पत असलेला माणुस गेला की लोक म्हणतात "ते गेले..." 


अजुन थोडी पत असलेला माणुस गेला की लोक म्हणतात "ते देवाघरी गेले.... "


त्याहुन थोडी पत असलेला माणुस गेला की म्हणतात... "ते कैलासवासी झाले...स्वर्गवासी झाले !" 


रस्त्यावर बेवारशासारखा कुणी गेला तर लोक म्हणतात "हे सालं मेलंय.... !" 


मेलंय..पासुन कैलासवासी झाले..स्वर्गवासी झाले या शब्दांपर्यंत भिक्षेक-यांना ओढुन आणणं हाच माझा ध्यास! असो ! बाबांकडे मोठं काही ध्येय नव्हतं,पण आमच्या या बाबाला आजार मात्र मोठे मोठे झाले होते.. !


बाबांशी मी काहीतरी बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.त्यांनी कुबडी उचलत सहज विचारलं, 'माझे अजून किती दिवस शिल्लक आहेत डॉक्टर ? खोटं नका बोलू !'


मी हादरलो... म्हणजे यांना माहीत आहे तर.... !


तरी उसनं अवसान आणुन म्हणालो,'अहो बाबा, असं काहीच नाही...या अगोदर आजारांवर वेळीच लक्ष दिलं नाही म्हणून ते वाढले आहेत इतकंच... आपण करतोच आहोत उपचार तुमच्यावर,काळजी करू नका.'


ते म्हणाले, 'जाऊ द्या हो डॉक्टर,नका एवढा विचार करू. मला आता जाऊ दे वरच्या घरी...नाहीतरी पितृपंधरवडा सुरू आहे..कामात काम होऊन जाईल,काय म्हणता ? पुढल्या वर्षी माझ्या जागेवर घास ठेवा म्हणजे झालं.... हा..हा...हा...' असं म्हणून... क्षीण पणाने हसत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. 


मरणा-या माणसाच्या तोंडुन एवढा करूण विनोद मी याआधी कधी ऐकला नव्हता... ! 


'जाऊ दे बाबा,बघू आपण पुढच्या पुढे,आता कुठं सोडू तुम्हाला ? ' मी बॕग भरत म्हणालो. 


ते खाटेवरुन उठत म्हणाले,ज्या गटाराजवळुन तुम्ही मला आणलं होतं, तिथेच मला सोडा... मी तिथेच पडून राहिन...


का... ? आणि तुमची बायको ? ती तर आलीच नाही म्हणा एवढ्या दिवसात ...ते हसत म्हणाले,'ती आली नाही,आणि आता येणार सुद्धा नाही ...'

'म्हणजे ?' 

'अहो गेली ती मला सोडुन ! 

तीला मी नकोच होतो,कधी एकदा माझी ब्याद टळते असं तिला झालं होतं.दर वेळी ती मला हाकलून द्यायची,परंतु मीच तिला मुंगळ्यासारखा चिकटलो होतो.... काय करणार ?  माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता !


आता तिला चांगली संधी आली,म्हणून ती मला सोडून गेली.' मला त्या मावशीचा भयंकर राग आला.या बाबांना माझ्या गळ्यात टाकून ती स्वतः पसार झाली होती. 


माझा राग रंग बघून बाबा म्हणाले, 'तुम्ही त्रास नका करून घेऊ डॉक्टर,गेली तर जाऊ दे.तुम्ही चिंता नका करू,मला तुम्ही जिथून आणलं होतं तिथेच सोडून द्या,मी पडून राहिन,मी गेल्यावर कळेलच तुम्हाला... !' 


मला बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं पण त्या बाईचा खरोखर राग आला होता, 'मी बाबांना म्हणालो तुम्हाला राग नाही येत तीचा ? म्हणाले ,'नाही डॉक्टर,ती तरी आजारी मढं किती दिवस सांभाळणार ? 


तीच्या मते,माझ्याबरोबर संसार करून तीला कधीच काही मी देऊ शकलो नाही.तीची कोणतीही हौस मी कधीही भागवू शकलो नाही.पूर्वी मी भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असे,परंतु या आजारपणांमुळे माझा धंदा बसला, लोकांनी माझ्या उधा-या बुडवल्या आणि ज्यांचा मी देणेकरी होतो,त्यांनी वाजवुन पैशे नेले माझ्याकडुन,

आणि शेवटी आम्ही रस्त्यावर आलो... ! आमच्या दोघांच्या वयात सुद्धा खूप अंतर आहे,आमचं लग्न म्हणजे एक तडजोड होती डाॕक्टर.तीला आधीपासुनच मी नको होतो... आता संधी मिळाली,गेली सोडुन....!'


'जगू दे बिचारीला तीच्या मनासारखं....मनमोकळेपणाने...' 


बाबा हात जोडत वर पहात म्हणाले...! 


'ती गेली,यापेक्षा तीला मी जातानाही काही देऊ शकलो नाही याच गोष्टीचा पश्चाताप मला जास्त होतोय....' 


बाबांच्या या विचारांवर मी काय बोलणार ? 


आम्ही यांत्रिकपणे हॉस्पिटल च्या खाली उतरलो. बाबांच्या हातात कुबड्या दिल्या. 


मावशीच्या नावानं माझी धुसफुस सुरुच होती. बाबा म्हणाले,'जावु द्या हो डाॕक्टर .... गेली ती, खरंतर या वेळी मला तीची खुप गरज होती, पण,आता ती परत भेटणार नाही,पण मी मेल्यावर भेटली तर तीला नक्की सांगा,मी जाताना तीची खुप आठवण काढली म्हणुन... आणि हो,माझा,तीच्यावर कसलाही राग नाही म्हणावं...अजुन एक सांगा,तुला मी आवडलो नाही कधी..पण तु मला तेव्हाही आवडायचीस आणि आत्ताही आवडतेस... 


तुझ्यात मी बाई नाही,आई पाहिली गं,म्हणावं. ! 


बाबांच्या डोळ्यात आता पाणी तरळलं...!

ते पुढं चालु लागले,कुबड्या घेवुन ...

कुबड्यांवर चालतांना खट्क खट्क होणारा आवाज हा बाबांच्या हृदयातुन येत असावा का ?

स्टेथोस्कोप मधुन येणारा हृदयातला आवाज लब् - डब् असा असतो... 


मी विना स्टेथोस्कोप आज हा नविनच आवाज ऐकत होतो,खट्क खट्क !


हा कुबड्यांचा आवाज होता की...आयुष्यंभरात "खटकलेल्या" काही गोष्टी ... ?  


बाबांनी आभाळाकडं बघत,कुबडीवरचे दोन्ही पंजे आभाळाकडं नेत जोडले नी म्हणाले,'सुखी रहा माई...!'


प्रतिकुल परिस्थितीतही सोडुन गेलेल्या बायकोला "माई" म्हणणारा बाबा मला आभाळाएव्हढा उंच जाणवला ! 


तरीही मी बाबांना छेडलं... 'बाबा, म्हणजे तीला माफ केलंत तुम्ही... ? माफी दिलीत... ? 


यावर प्रसन्नपणे हसत म्हणाले,'माझ्याकडं या क्षणाला तीला देण्यासारखं एव्हढंच आहे... "माफी" ! तीच्या चुकांचं ओझं मी कशाला बाळगु डाॕक्टर ? मी तीला माफ केलं,आता जाताना मला कसलंही ओझं नकोय...आत्ता तीला देण्यासारखी एकच गोष्ट माझ्याकडं होती ती म्हणजे... माफी ! 


काय बोलावं या बाबांशी कळेना ! 


या क्षणाला मला एकच वाटलं,या बाबांचे पाय धरावे.अनेक चुका करुनही तीच्या पदरात त्यांनी  माफी नावाचं सर्वात मोठं दान टाकलं होतं ! 


आपण आपल्यासाठी काही मागतो,तेव्हा ते शब्द असतात... दुस-या साठी काही मागतो तेव्हाच ते शब्द,वाणी होतात... !


बाबांचा साधा शब्द आज वाणी झाला...! 

किंमत आणि मोल यातही फरक असतोच ... !

किंमत आली की व्यवहार आला... पण,व्यवहार सोडून जो कुणाचं मोल जाणायला लागतो... तेव्हा तो स्वतःच मौल्यवान होवुन जातो !

"भाव" त्यालाच मिळतो ! 


माझा बाबा आज माफी देवुन मौल्यवान झाला... लय भाव खावुन गेला... !'


बाबांच्या विचारांनी माझ्याही मनात विचार दाटले.... कफल्लक असुनही जगातला सर्वात श्रीमंत माणुस वाटला तो मला !


बाबांच्या डोळ्यातले अश्रु आता कुबड्यांवर सांडत होते.... ! 


या अश्रुंना कसलाही रंग नव्हता... ! 


कसा असेल ? 


अपेक्षांचा "भंग" झाला की, माणसं "संग" सोडुन देतात...आयुष्यच "बेरंग" होतं .... गळणा-या आसवांना आता "रंग" कसा उरेल  मग ...? 


'निघायचं ?'  बाबांच्या या वाक्यानं  मी तंद्रीवर आलो.  


चालत चालत आम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलो,बाबा म्हणत होते,मला त्या  गटाराजवळ सोडा.... पण कसा सोडू परत यांना त्याच गटाराजवळ ? 


आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असतांना या बाबांना तीथे कसा सोडणार होतो मी  ?


डोकं काही केल्या चालेना. 

कुठं ठेवावं या बाबांना ???


अशा विचित्र परिस्थितीत कोणताही वृद्धाश्रम त्यांना स्वीकारणार नाही याची मला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे कुठे फोनाफोनी करायचा प्रश्नच नव्हता. 


पुढं काय करता येईल ? 

डोकं चालेना ! 

विचार करत रस्त्यावरच्या फुटपाथ वर बसलो.

समोरच एक शाॕप होतं ! 

या शॉपला मी कधीही उघडलेलं पाहिलं नाही, वर्षानुवर्षे ते बंदच आहे. 


या शॉप च्या पुढे पाय-या पाय-यांचा एक कट्टा आहे आणि याच कट्ट्यावर एक शेडसुद्धा आहे. 

एक माणूस आरामात इथं झोपला तर त्याला ऊन वारा आणि पाऊस लागणार सुद्धा नाही.


माझे डोळे चमकले ! 


तात्पुरतं इथेच त्यांना ठेवलं तर ?

माझ्या डोक्यात चक्रं सुरु झालं... ! 

गटाराशेजारी ठेवण्यापेक्षा या शेड असलेल्या कट्ट्यावर बाबांना ठेवलेलं केव्हाही चांगलंच. 


पण या दुकानाचे मालक काय म्हणतील ? 


बघू,विचारतील तेव्हा सांगु,त्यांच्या पाया पडु... दिल्या शिव्या तर खावु... असा विचार करून उठलो. 


पहिल्यांदा कट्टा झाडुन साफ केला,घरातून अंथरूण पांघरून आणून कट्ट्यावर अंथरलं. बाबांसाठी कपडे घेतले.आता याच कट्ट्यावर बाबांची सोय केली आहे, १४ सप्टेंबर २०२० रोजी सोमवारी,त्यांना हे तात्पुरतं घर करुन दिलंय... !


कट्टा कुणाचा ? देतंय कोण ? राहतंय कोण ? 


आयजीच्या जीवावर बायजी उदार !


आसो,बाबांचं तात्पुरतं घर तरी तयार झालं... !


आता रोजच्या जेवणाचं काय ? 


मग एका खानावळीत जाऊन बाबांसाठी दोन वेळचा जेवणाचा डब्बा घरपोच द्यायला सांगितला.समोरच्या चहाच्या टपरीवर  दोन वेळच्या चहाची सोय केली.

खानावळ वाल्यांनी विचारलं किती दिवसांसाठी हवा आहे डब्बा ? 


दुरून बाबा झोपलेल्या ठिकाणी कट्ट्याकडे बोट दाखवत म्हणालो, ते बाबा जोपर्यंत तुम्हाला तिथे दिसत आहेत तोपर्यंत डबा द्यायचा !


'आणि दिसणार नाहीत तेव्हा ?' खानावळीच्या मालकानं तोंडाचा चंबु करत विचारलं. 


'तेव्हा मला सांगा,तुमचा डब्बा मी कावळ्याला खाऊ घालेन...पिंडावरचा समजुन.... असं सांगून बाहेर पडलो.'


खरंतर डॉक्टरांनी या बाबांचं आयुष्य काही दिवसांपुरतंच आहे,असं स्पष्ट सांगितलं आहे.


पण बघु,आम्ही प्रयत्न करतोय,बाबांचं पोर म्हणुन,बाबांचा शेवटचा प्रवास तरी सुखाचा व्हावा... ! शॉप चे मालक आलेच कधी मला विचारायला तर पाया पडून त्यांना सांगेन, 'आयुष्यात सगळ्याच ठिकाणी हरलेले हे बाबा आहेत.कुटुंबाने यांना नाकारलंय,काही दिवसांचे ते सोबती आहेत,आपणच यांचं कुटुंब होवुया का थोडे दिवस ? 


भातुकलीचा आपण एक खेळ खेळुया का ...?  


तुम्ही त्यांचे भाऊ व्हा,मी मुलगा,मनिषा सुन आणि सोहम नातु होईल ! 


तुमचं हे शेड म्हणजे आपलं छोटं घर आहे, आपण नात्यांचा इथं खेळ मांडु... बाप,सासरा, भाऊ आणि आजोबा म्हणुन बाबा भुमिका निभावतील ! तुमच्या या घरातुन दुस-या कायमच्या घरी जाईपर्यंत आपण हा भातुकलीचा डाव मांडुया का ? प्लीज सर... 


माहित नाही यावर ते काय म्हणतील....?


आज आम्ही जे केलंय.... मला माहित नाही... बरोबर की चुक ? योग्य की अयोग्य ? 


प्राप्त परिस्थितीत सद्सद्विवेक बुद्धीला जे पटलंय ते केलंय... ! निरोप घेत म्हणालो... '  बाबा, जाऊ आता परत भेटुच !'


'डाॕक्टर जातो म्हणु नये,येतो म्हणावं...!' 

'बरं बाबा, येतो मी ...!' 

गाडीला किक मारत हसत मी निरोप घेतला.


निघतांना लगबगीने जवळ येत म्हणाले.... 'डाॕक्टर मी गेल्यावर मला बघायला याल ना ? 

नाही म्हणजे....' 


ते अडखळले.... माझा हात हातात घेवुन डोळ्यात पाणी आणुन भावुक होत कमरेत वाकले... अजुन बोलायचं होतं त्यांना...


पण..पुढची वाक्यं बोललीच गेली नाहीत त्यांच्याकडुन ..


कुबड्या घेवुन,वाकलेला तो ३० किलोचा हाडांचा सांगाडा,त्यांच्या मृतदेहाला बघायला यायचं आमंत्रण देत होता ... झुकुन आणि वाकुन...  किती ही अगतिकता ?


हजारो आमंत्रणं आजपर्यंत आली असतील मला पण मी मेल्यावर मला बघायला या,अग्नी द्यायला या... हे असलं पहिलंच आमंत्रण मला आलं होतं ! यावेळी डोळ्यातनं पाणी काढायचं नाही असं खुप ठरवलं होतं मी,पण रडवलंच या बाबांनी मला शेवटी ...! 


डोळ्यातलं पाणी पुसत गाडीवरुन पुन्हा उतरलो. 


बाबांना जवळ घेवुन म्हणालो,बाबा, 'तुम्हाला काही होणार नाही...पण मरण कुणाला चुकलंही नाही.... 


'माझ्या अभिजीत नावापुढं मी तुमचं नाव जोडलंय,तुम्ही जर माझ्या आधी गेलात तर मुलगा म्हणुन मीच तुमच्यावर अंत्यसंस्कार करणार ... !'


माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना...आणि त्यांच्याही....


आता बाबांच्या चेह-यावर समाधान दाटलं... डोळ्यांत ते स्पष्ट दिसले...तोंडातल्या तोंडात ते पुटपुटले,'चला म्हणजे मरतांना तरी मी बेवारस म्हणुन नाही मरणार....' 


असं म्हणुन अंताला टेकलेला हा बाबा हमसुन हमसुन रडायला लागला,म्हणाला मला पोर नाही आणि बाळ नाही,पण आज या वयात बाप झालो मी...या  वयातही बाप झालो मी... !


पालथ्या मुठीनं डोळे पुसत बाबा कुबड्या टेकत टेकत रडत कट्ट्याजवळ निघाले...जातांना चारदा मागे बघुन हात हलवत होते,हात जोडुन नमस्कार करत होते... !


भातुकलीच्या खेळामधल्या माझ्या या बापाला मी मनोमन नमस्कार केला...! 


सहज शेडकडे नजर गेली...या शेडवर एक कावळा काव -काव करत खाली बघत होता... ! 


मी मनोमन हात जोडले...'हे काकराजा, भातुकलीचा आमचा हा खेळ...!  मला एव्हढ्यात मोडायचा नाही...कहाणी ही अधुरी ठेवायची नाही...


एक विचारु काकराजा ? 

सांग का जीव असे जोडावे ? 

का दैवाने फुलण्याआधीच फुल असे तोडावे ? 

या प्रश्नावर ऊत्तर नव्हते.... !


काकराजाच्या डोळा तेव्हा दाटुन आले पाणी... आणि वदला,मला समजली शब्दांवाचुन भाषा...भातुकलीचा हा खेळ अखंड चालु दे,मीच उडुन जातो दूर देशा... !' 


शेडवरला कावळा उडुन गेला... 

बाबा आता निवांत झोपले होते... निर्धास्त ... निश्चिंत... !


भातुकलीच्या खेळामधल्या बापाची ही जिंदगानी... 

अर्ध्यावरचा डाव जोडला...अशी ही गोड कहाणी... !!!

१५ सप्टेंबर २०२० मंगळवार !


डॉ. अभिजीत सोनवणे

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर 




६/११/२३

टीका करा; पण हळुवार.. criticize; But slowly..

चार्ल्स स्क्वॅब एक दिवस आपल्या स्टील मिलमध्ये फिरत होते,तेव्हा त्यांनी काही कर्मचाऱ्यांना सिगारेट पिताना बघितलं.त्यांच्या डोक्यावरच पाटी लागली होती,'धूम्रपान वर्जितक्षेत्र' हे बघून स्क्वॅब पाटीकडे बोट दाखवून म्हणू शकला असता,'तुम्ही हे वाचू शकत नाही का?' पण ही स्क्वॅबची पध्दत नव्हती.स्क्वॅब त्या लोकांपाशी गेले.त्यांनी त्यांना एक एक सिगार दिली आणि म्हटलं,"हे बघा,मला तुम्ही ही सिगार बाहेर जाऊन प्यायलात तर खूप आवडेल." कर्मचाऱ्यांना माहित होतं,की स्क्वॅबनं त्यांना नियम तोडताना पाहिलं होतं.पण त्यांच्यावर स्क्वॅबचा वेगळाच प्रभाव पडला.कारण त्यांनी त्यांना एक लहानसा उपहार दिला होता.त्यांना रागावले नव्हते आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली होती. अशा व्यक्तीला कोण पसंत करणार नाही ?


जॉन वानामेकरनेसुद्धा याच तंत्राचा अवलंब केला.

वानामेकर फिलाडेल्फीयातल्या आपल्या मोठ्या दुकानात दिवसातून अनेक वेळा चक्कर मारीत असत.एकदा त्यांनी दुकानात एक ग्राहक काही वेळ काउंटरवर वाट पाहताना बघितलं. कोणताच विक्रेता आणि कारकून तिच्याकडे लक्ष देत नव्हता.विक्रेते एका कोपऱ्यात उभे राहून गप्पा आणि गंमत करीत होते.वानामेकरने कुणाला काहीच म्हटलं नाही.त्यांनी गुपचुप काउंटरच्या मागे जाऊन या महिलेला सामान दिले आणि जाताना सेल्समनला ते सामान बांधून द्यायला सांगितलं.


सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणं सर्वसाधारण लोकांना सोपं नसतं.ते लोक व्यग्र असतात आणि अनेकदा तर अतिउत्साही कर्मचारी आपल्या साहेबांना व्यग्र बघून लोकांना त्यांच्या भेटीपासून रोखतात.ऑरलँडो फुगेरिडाचे मेयर कार्ल लँगफोर्ड यांनी अनेक वर्षे आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन ठेवले होते की जनतेला त्यांना भेटण्यापासून रोखू नये.त्यांची पध्दत 'उघड्या दरवाज्याच्या' नीतीची होती. याउपर सचिव आणि प्रशासक लोक नागरिकांना त्यांना भेटू देत नसत..


कार्लला हे समजले,तेव्हा त्यावर त्याने आणखी एक जालीम उपाय शोधला.त्याच्या ऑफिसचा दरवाजाच त्याने काढून कवाडे खुली केली. या रीतीने प्रतिकात्मकरीत्या महापौराने दार काढून टाकले म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा राज्यकारभार पारदर्शक होता,याची लोकांना जाणीव झाली.शिवाय त्याच्या हाताखालच्या लोकांनाही कार्लला काय म्हणायचे आहे ते कळले.


एक तीन अक्षरी शब्द.त्याचा उच्चार टाळल्यास समोरचा माणूस चिडणार नाही किंवा जास्ती आक्रमकसुद्धा होणार नाही.. यश आणि अपयश यांच्यातील ही सीमारेषाच म्हणा ना.हा शब्द कोणता ? तो म्हणजे 'परंतु बऱ्याच लोकांना एक अशी सवय असते की,ते प्रथमतः समोरच्या व्यक्तीची स्तुती करतात आणि नंतर 'परंतु' असे म्हणून कडक टीकासुद्धा करतात.एक उदाहरण पाहू.एखाद्या विद्यार्थ्याचा त्याच्या अभ्यासाविषयीचा दृष्टिकोन बदलायचा आहे,तर आपण म्हणतो की,'उत्तम!! खरेच आम्हाला तुझा अभिमान वाटतो.अभ्यासात तुझी प्रगती चांगली आहे;परंतु तू जर बीजगणिताचा थोडा जास्त

अभ्यास करू शकला असतास,तर तुला यापेक्षा अधिक मोठे यश मिळाले असते.'


आता या उदाहरणामध्ये त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत तो 'परंतु ' हा शब्द ऐकू येत नाही, तोपर्यंत खूप उत्साह वाटेल;पण त्यानंतर आधी केले गेलेले त्याचे कौतुक खरे का खोटे अशी शंका त्याच्या मनामध्ये येईल.त्याला असे जाणवेल की,खरेतर यांना कौतुक करायचेच नव्हते.टीका करायला एक कळ किंवा स्टार्टर म्हणून हे कौतुकाचे नाटक ! या वागण्यामुळे बोलणाऱ्यांची विश्वासार्हता ही धोक्यात येते अणि मग मुख्य हेतू साध्य होणे अवघड होऊन जाते. याबरोबरच आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाविषयीचा दृष्टिकोन बदलताना कष्ट पडू शकतात.

खरेतर आपल्याला हे टाळता येते;पण कसे?तर फक्त एक करायचे.ते म्हणजे 'परंतु' या शब्दाचा वापर न करता 'आणि' हा शब्द वापरायचा.आता आधी आपण पाहिलेले वाक्य कसे होईल ते बघू - 'उत्तम! खरेच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. अभ्यासात तुझी प्रगती चांगली आहे आणि तू जर बीजगणिताचा थोडा जास्त अभ्यास करू लागलास, तर खात्रीने तुला यापेक्षा अधिक मोठे यश मिळेल.'


अशी केलेली स्तुती त्याला जास्त आवडेल, कारण यामध्ये त्याच्या बीजगणितातील अपयशाचा उल्लेखसुद्धा नाही.

आपण आता त्याच्या वागणुकीकडे लक्ष वळविलेले आहे आणि अप्रत्यक्षरीत्या त्याची वागणूक बदलावी, अशी आपल्याला अपेक्षा आहे.यामुळे परिस्थितीमध्ये काही बदल घडण्याची शक्यता आहे.याबरोबरच तुमच्या बीजगणिताबद्दलच्या अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण होण्याचीसुद्धा शक्यता आपणच निर्माण करीत आहोत.


अप्रत्यक्षपणे आपण चुकांकडे लक्ष वेधले,तर संवेदनशील व्यक्तींच्या बाबतीत याचा सकारात्मक परिणाम दिसतो;

परंतु याउलट जर आपण खुलेपणाने टीका केली,तर ते मात्र मनात कडवटपणा निर्माण करणारे ठरते.टोडे आयलंड येथील मार्गी जेकब हिने तिच्या क्लासमधील बांधकाम सुरू असताना तिथे असणाऱ्या मजुरांकडून अंगणातील पसारा कशा पद्धतीने आवरून घेतला हे आपण पाहू.


जेव्हा तिच्याकडे बांधकाम सुरू झाले,तेव्हा ज्या वेळी ती ऑफिसमधून घरी परत येई तेव्हा तिच्या असे लक्षात येत असे की,समोरील अंगणामध्ये सर्व साहित्य जसे लाकडाचे तुकडे,सिमेंटची पोती वगैरे अस्ताव्यस्त पसरलेले आहे.त्या कामगारांना बोलण्याची किंवा त्यांचा अपमान करायची तिची इच्छा नव्हती,कारण त्यांचे मुख्य काम ते उत्तमरीत्या करीत होते.एक दिवस सर्व कामगार निघून गेल्यानंतर तिने आणि तिच्या मुलांनी मिळून सगळे साहित्य आणि दगड,विटा,इत्यादी एकत्र करून अंगणाच्या एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवून दिले.


दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यातील मुकादमाला तिने जरा बाजूला बोलावून सांगितले की,काल परत जाताना तुम्ही लॉनवरील सर्व वस्तू आणि पसारा आवरून ठेवल्याने खचप बरे झाले.लॉन स्वच्छ व नीटनेटका करून परत गेल्यामुळे आता बाजूच्या लोकांनी कोणत्याच प्रकारचा आक्षेप घेतला नाही आणि खूप बरे ते आता तसे करणारसुद्धा नाहीत.गंमत म्हणजे त्या दिवसापासून कामगारांनी सर्व पसारा उचलून अंगणाच्या कोपऱ्यात नीटनेटका रचून ठेवायला सुरुवात केली आणि तो मुकादम स्वतः काम संपले की,दिवसाच्या शेवटी सर्व काही ठीकठाक केले आहे की नाही हे जातीने बघायला लागला.


एक वादाचा पण महत्त्वाचा मुद्दा; सैन्यातील राखीव दलाची शिकाऊ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्यामध्ये सहसा असतो.ते म्हणजे कॅडेट्सची हजामत! राखीव दलातील मुलांना वाटते की,ते सिव्हिलियन्स आहेत.

यामुळे त्यांना बारीक केस कापून घेणे किंवा केस बारीक ठेवणे हे मान्य नसते.


सार्जंट हालें कैसर हा ५४२ यूएसएसआर येथे प्रशिक्षक म्हणून ड्युटीवर होता.त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी आलेली राखीव दलाची एक तुकडी होती.जर तो जुन्या विचारांचा सार्जंट असता,तर तो त्या कॅडेट्सवर बरसला असता, त्यांना धमक्या दिल्या असत्या.याऐवजी त्याने 'हजामतीचा' मुद्दा हा अप्रत्यक्ष रीतीने हाताळायचे ठरवले.त्याने त्याच्या तुकडीस सांगितले की,माझ्या मित्रांनो,या पुढील काळात तुम्ही नेतृत्व करणार आहात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नेतृत्व कराल तेव्हा ते निश्चितच खूप परिणामकारक असेल आणि लोकसुद्धा त्याचे उदाहरण देतील व तुमचा आदर्श ठेवण्यास सांगतील.

तुम्हाला हे माहीत आहेच की, 'आर्मीच्या हेअरकट'बद्दल मिलिटरीमध्ये कोणते नियम आहेत. मी स्वतः आज माझे केस त्याप्रमाणे कापून घेणार आहे.कदाचित,ते तुमच्यापेक्षाही बारीक कापणार आहे. तुम्ही सर्वांनी आरशात स्वतः कडे पाहा आणि जर तुम्हास मनापासून वाटले की,'आर्मी स्टाइल हेअरकट केल्यानेसुद्धा तुम्ही आदर्श ठरू शकता, तर मग न्हाव्याच्या दुकानामध्ये जाण्याकरिता आपण ठरावीक वेळेचे नियोजन करू.


या बोलण्याचा परिणाम जसा अपेक्षित होता तसाच झाला.अनेक कॅडेट्सनी आरशामध्ये बघितले आणि दुपारी न्हाव्याकडे जाऊन आर्मी स्टाइलचा हेअरकट अर्थात सोल्जरकट करून घेतला.सार्जंट कैसरने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे कौतुक करताना म्हटले की,मला तर आत्ताच तुमच्यामध्ये उत्तम नेतृत्वगुणाचे दर्शन होत आहे.प्रसिद्ध वक्ते हेन्री वॉर्ड यांना ८ मार्च १८८७ रोजी मरण आले.पुढच्याच रविवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता लॅमन अ‍ॅबटला आमंत्रित केले होते.त्या दिवशीचे आपले भाषण प्रभावपूर्ण व्हावे याकरिता अ‍ॅबटने ते एकदा लिहिले,दोनदा लिहिले आणि त्यामध्ये बरीच खाडाखोडसुद्धा केली.त्याला जो संदेश द्यावयाचा होता तो जास्तीत जास्त प्रभावी ठरण्याकरिता त्याने खूपशी मेहनतही घेतली. त्यानंतर ते त्याने त्याच्या पत्नीला वाचूनही दाखवले.बाकीच्या भाषणांप्रमाणेच ते अतिशय सुमार दर्जाचे झाले होते.त्याचा पत्नीला त्याच्या स्वभावाची जरासुद्धा समज नसती,तर ती स्पष्टपणे म्हणाली असती की,लॅमन,हे अतिशय भयंकर आहे.हे भाषण कोणीही ऐकणार नाही. कदाचित,हे ऐकताना सगळ्यांना खूप झोपही येईल.हे ऐकताना जणू काही ज्ञानकोश कोणी वाचत आहे असेच वाटते आहे.तू एखाद्या साध्या माणसासारखे सरळ का बोलत नाहीस? तुला सामान्यांसारखे का वागता येत नाही ? तू जर हे भाषण वाचलेस,तर सगळे तुझीच चेष्टा करतील.याप्रमाणे ती म्हणू शकली असती; पण तिने तसे केले नाही.याचे कारण म्हणजे अतिस्पष्ट बोलण्याचे परिणाम तिला माहीत होते.

याऐवजी तिने त्यावर एकच शेरा मिस्कीलपणे मारला.ती म्हणाली की,तुझे हे भाषण खरेतर नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यूकरिता एक उत्कृष्ट अग्रलेख म्हणून तू प्रसिद्ध करू शकतोस ! वेगळ्या शब्दांत जर सांगावयाचे,तर त्याच्या लिखाणाचे तिने तसे कौतुक केले आणि मोठ्या कौशल्याने तिने हेसुद्धा सांगितले की,हे भाषण म्हणून पूर्ण अयोग्य आहे.लॅमन अ‍ॅबटला तिचा मुद्दा ताबडतोब समजला.त्याने लगेचच ते लिखाणाचे कागद फाडून टाकले आणि मग कसलीही पूर्वतयारी न करता ज्याप्रमाणे सुचेल तसे भाषण केले..


इतरांच्या चुका सुधारण्याचा वेगळा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्याव्यात.


२१ .१०.२३ या लेखामालेतील पुढील लेख..


४/११/२३

चूक शोधा तर अशी शोधा.. If you find a mistake,find it like this

जेव्हा कोल्विन कुलिज राष्ट्रपती होते,तेव्हा माझा एक मित्र व्हाईट हाउसमध्ये पाहुणा म्हणून गेला होता.राष्ट्रपतीच्या खाजगी कार्यालयात जाताना त्यानं कूलिजना आपल्या सचिवाला हे सांगताना ऐकलं की,"तू आज खूप सुंदर पोशाख घातला आहेस.. आज तू खुप सुंदर दिसते आहेस."


मितभाषी राष्ट्रपतींनी आजपर्यंत कुणा सचिवाची इतकी स्तुती केलेली नव्हती.ही स्तुती इतकी विलक्षण आणि अनपेक्षित होती की ती सचिवबाई शरमून गेली.मग कुलिजन म्हटलं, "आता तुला फार फुशारून जायची गरज नाही आहे.मी तुझ्याशी काहीतरी चांगलं बोलू इच्छित होतो.यापुढे तू पत्रांमध्ये विरामचिन्हांच्या चुका जरा कमी कराव्यात असं मला वाटतं."


त्यांची तऱ्हा जरा जास्तच धीटपणाची होती,पण मनोविज्ञान फारच उत्तम होतं.जर आम्ही आधी कुणाच्याही गुणांची स्तुती केली,तर नंतर अवगुणांबद्दल ऐकणं सोपं जातं.न्हावी पण दाढी करायच्या आधी गालावर साबण चोळतो.


आणि हेच मॅकिन्लेनं १८६९ मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढताना अंमलात आणलं.त्या काळातल्या एका प्रसिध्द रिपब्लिकननं निवडणुकीसाठी भाषण लिहिलं जे त्याच्या दृष्टीने सिसरो,पॅट्रिक हेन्री आणि डॅनियल वेबस्टर यांच्या भाषणापेक्षा सरस होतं.त्या व्यक्तीने मोठ्या अभिमानानं ते भाषण मॅकिन्लेला सुनावलं.भाषणात काही चांगल्या गोष्टी होत्या. पण ते त्या वेळच्या प्रसंगात साजेसं नव्हतं. मॅकिन्ले त्याच्या भावनांना दुखवू बघत नव्हता. त्याच्या उत्साहावर त्यांना विरजण घालायचं नव्हतं,परंतु त्याला त्यांना नकारसुद्धा द्यायचा होता.म्हणून त्यांनी कूटनीतीचा अवलंब केला.


"माझ्या मित्रा,हे खूपच छान भाषण आहे,खूपच उत्तम.

यापेक्षा अधिक चांगलं भाषण कुणी लिहूच शकत नाही.

अन्य प्रसंगी हे भाषण अजून योग्य दिसलं असतं,पण

या प्रसंगी ते योग्य वाटेल का? तसं पाहिलं तर तुमच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेलही पण आम्हास ते पक्षाच्या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे.आता घरी जाऊन या भाषणास माझ्या सूचनांप्रमाणे लिहून काढ आणि मला त्याची प्रत पाठवून दे."


त्यानं तसंच केलं.मॅकिन्लेच्या संशोधन व मार्गदर्शनाखाली त्यानं पुन्हा ते भाषण लिहून काढलं आणि त्यामुळे तो त्या अभियानाचा प्रभावी वक्ता ठरला.


इथे अब्राहम लिंकनचं दुसरं सर्वांत प्रसिध्द पत्र देत आहे.(त्यांचं सर्वांत जास्त प्रसिध्द पत्र श्रीमती बिक्सबीला लिहिलं गेलं होतं,ज्यात त्यांनी युध्दात मारल्या गेलेल्या त्यांच्या पाच पुत्रांवर दुःख प्रकट केलं होतं.) लिंकनने हे पत्र कदाचित पाच मिनिटातच लिहिलं असेल.परंतु १९२६ मध्ये सार्वजनिक लिलावात ते १२ हजार डॉलरला विकलं गेलं आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की ही रक्कम त्या रकमेपेक्षा जास्त होती.हे पत्र २६ एप्रिल, १८६३ला गृहयुध्दाच्या निराशाजनक काळात जनरल हुकरला लिहिलं गेलं होतं.अठरा महिने लिंकनच्या सेना सातत्याने एकामागोमाग एक मोर्च्यांवर हारत होत्या.सगळे प्रयास व्यर्थ आणि मूर्खपणाचे सिद्ध होत होते आणि सैनिक मारले जात होते.देश हतबुध्द झाला होता. इथपर्यंत नौबत येऊन ठेपली होती की सीनेटच्या रिपब्लिकन सदस्यांनीही विद्रोह केला होता आणि ते पण लिंकनला व्हाईट हाऊसमधून बाहेर काढू पाहात होते. "आज आम्ही विनाशाच्या काठावर आहोत." लिंकन म्हणाले, "मला असं वाटतंय,की ईश्वरही आमच्या विरुध्द आहे.आशेचा सूक्ष्म किरणही दिसत नाही." इतक्या घनघोर अंधारात आणि अराजकतेच्या काळात हे पत्र लिहिलं गेलं होते.


मी इथे हे पत्र छापतो आहे,कारण त्यामुळे हे कळतं की लिंकनने कशा तऱ्हेनें एका हटवादी जनरला बदलण्याचा प्रयत्न केला,जेव्हा देशाचं भाग्य त्या जनरलच्या कार्यावर अवलंबून होतं.


राष्ट्रपती बनल्यावर लिंकनचे हे सर्वांत जास्त जहाल पत्र होतं.पण तुम्हाला असं आढळून येईल की त्यांनी जनरल हुकरच्या गंभीर चुकांवर टीका करण्याआधी त्याची स्तुती केली होती.


होय,या चुका गंभीर होत्या.पण लिंकननं तसं म्हटलं नाही.. लिंकन खूप उदार व कूटनीतीज्ञ होते.लिंकनन लिहिलं, "अशा काही बाबी आहेत ज्याबद्दल मी तुमच्यामुळे समाधानी नाही आहे.' काय कूटनीती होती! किती व्यवहारकुशलता होती! जनरल हुकरला हे पत्र लिहिलं गेलं होतं.


"मी तुम्हाला पोटोमॅकच्या सेनेचा सेनापती बनवले आहे हे उघडच आहे,की मी असं करण्यामागे काही योग्य कारणं होती.तरीही, असं असूनसुध्दा मला असं वाटतं की तुम्हाला हे माहीत असावं की काही बाबतीत मी तुमच्याबद्दल पूर्णपणे समाधानी नाहीए.


"मला खात्री आहे की तुम्ही शूर आणि कुशल सैनिक आहात,ज्याची मी प्रशंसा करतो.मला हा विश्वास आहे की तुम्ही राजनीती आणि आपल्या व्यवसायाची आपसात गल्लत करीत नाही आणि हे तुम्ही अगदी योग्य करता.. तुमच्यात आत्मविश्वास आहे,जो बहुमूल्य गुण आहे.


तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात,जी सिमित मात्रेत असेल तर हानिकारक नसून लाभदायक ठरते. पण मला असं वाटतं की जनरल बर्नसाइडच्या कमांडमध्ये तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षा दाखवली होती आणि त्याच्याशी बराच असहयोग दाखवत होता.या तऱ्हेने तुम्ही आपल्या देशावर अन्याय केला आहे आणि एका योग्य व सन्मान्य सैनिक सहयोगीबरोबरसुध्दा.


"मी असं विश्वसनीय सूत्रांकडून ऐकलं आहे,की तुम्ही नुकतेच असं म्हटले की सेना आणि सरकार दोघांनाही हुकुमशाहाची गरज आहे. उघड आहे की मी तुमच्यावर या कारणाने नव्हे, तर त्याखेरीजसुध्दा सैन्याची धूरा सोपवली आहे."केवळ तेच अधिकारी हुकुमशहा होऊ शकतात जे यश प्राप्त करतात.मी आता तुमच्याकडून यशाची अपेक्षा करतो आहे आणि मी हुकुमशाहीचा धोका पत्करायला तयार आहे.


"सरकार तुम्हाला स्वतः कडून पूर्ण समर्थन देईल, जे ते आपल्या सर्व सेनापतींना देते.मला असं भय वाटतं की तुम्ही आपल्या सेनेमध्ये चुकीच्या भावनांना उत्तेजन दिले आहे.आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर टीका करणे व त्याच्यावर अविश्वास दाखवण्याची तीच खोड आता तुम्हाला झेलावी लागणार आहे.जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत मी ही सवय मोडण्यात तुम्हाला मदत करेन.


"जर सेनेचे मनोबल या तऱ्हेचे असेल तर,तुम्ही काय आणि नेपोलियन काय (जर तो पुन्हा जिवंत होईल तर) या सेनेकडून एखादी मोठी सफलता प्राप्त करू शकता आणि घाई करण्याच्या सवयीपासून सावधान राहा.पण पूर्ण उर्जेसह आणि जागृत सतर्कतेसह पुढे कूच करा आणि आम्हाला विजय प्राप्त करून द्या. "


तुम्ही कूलिज,मॅकिन्ले किंवा लिंकन नाही आहात.तुम्हाला माहिती करून घ्यायचंय,की हे तत्त्वज्ञान तुमच्या रोजच्या व्यवसायात तुमची मदत करेल की नाही ते? चला तर मग,बघू या. आम्ही फिलाडेल्फीयाच्या वार्क कंपनीच्या डब्लू. पी.गॉचं उदाहरण बघू या.


वार्क कंपनीला फिलाडेल्फीयात एका निश्चित तारखेला एक ऑफिस तयार करायचं होतं.सर्व काही ठराविक कार्यक्रमानुसार चालू होतं. इमारत जवळपास पूर्ण तयार झाली होती.पण तेव्हाच त्या इमारतीच्या बाहेरचं काम करणाऱ्या ब्राँझ कंत्राटदारानं म्हटलं की तो निश्चित तारखेपर्यंत माल पाठवू शकणार नाही.काय? संपूर्ण इमारतीचं काम थांबून जाईल ? जबरदस्त दंड होईल! खूप नुकसान होईल! आणि हे सर्व फक्त एका व्यक्तीमुळे होईल!


दीर्घ फोनवरच्या चर्चांनी आणि गरम वादविवादांनीसुध्दा काहीच फायदा झाला नाही. मग मिस्टर गॉला त्या उपकंत्राटदाराला भेटायला न्यू यॉर्कला पाठवण्यात आले,म्हणजे तो सिंहाच्या गुहेत जाऊन त्याला पकडेल.


ज्यावेळी मिस्टर गॉ त्या उपकंत्राटांच्या कंपनीच्या अध्यक्षाला की भेटले,तेव्हा त्यांनी म्हटले, "तुम्हाला हे ठाऊक आहे का,तुमच्या नावाचे तुम्ही अख्ख्या ब्रुकलिनमध्ये एकमेव व्यक्ती आहात?"अध्यक्षांना नवल वाटले."नाही,मला हे माहित नव्हते. '


मिस्टर गॉ म्हणाले,"जेव्हा आज मी सकाळी ट्रेनमधून उतरलो तेव्हा तुमचा पत्ता बघण्यासाठी मी टेलिफोन डिरेक्टरी बघितली आणि मला असं आढळून आलं की ब्रुकलिनच्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये तुम्हीच तुमच्या नावाचे एकुलते एक व्यक्ती आहात.


"मला हे माहित नव्हते,"अध्यक्षाने म्हटले.त्यानं डिरेक्टरी उचलून स्वतः बघितलं.त्यानंतर अभिमानाने म्हणाला,

"हो,हे नाव सामान्य नाहीए. माझे पूर्वज दोनशे वर्षांपूर्वी हॉलंडमधून इथे आले होते आणि न्यू यॉर्कमध्ये स्थित झाले होते." मग बराच वेळ तो आपल्या पूर्वज आणि कुटुंबाबद्दल गोष्टी करीत राहिला.जेव्हा त्याचं बोलणं संपलं तेव्हा मिस्टर गॉने प्रशंसा करीत म्हटलं की हा प्लांट किती मोठा आहे आणि त्याने पाहिलेल्या इतर प्लांट्सच्या तुलनेत हा कसा सरस आहे. "ही मी पाहिलेली सर्वांत स्वच्छ ब्रांझ फॅक्टरी आहे."


त्या उपकंत्राटदाराने म्हटले, "हा उभारायला मी माझे संपूर्ण आयुष्य घालवलं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.तुम्हाला संपूर्ण फॅक्टरी बघायला आवडेल का?'


फॅक्टरीमध्ये हिंडताना मिस्टर गॉने निर्मितीसंबंधी अनेक गोष्टींची प्रामाणिक प्रशंसा केली.त्याला सांगितलं की कशी अन् का त्याची निर्माण- प्रक्रिया त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस होती.गॉने अनेक यंत्रांना बघून नवल केले की त्याने हे असे कुठे आधी बघितले नव्हते.

उपकंत्राटदाराने सांगितले की ही यंत्रे त्याने स्वतः बनवली आहेत. त्याने गॉला यंत्रांच्या कार्यप्रणालीला समजवायला बराच वेळ घेतला,जेणेकरून त्याला त्या यंत्रांद्वारे किती उत्तम काम होतं हे कळून येईल.त्याने गॉला जेवणाचे आमंत्रण दिले. तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की आतापावेतो गॉने आपल्या तिथे येण्याचा व भेटीचा मूळ उद्देश एका शब्दानेही सांगितला नव्हता.

जेवणानंतर उपकंत्राटदाराने म्हटले, "आता ध्येयाबद्दल बोलायची वेळ आली आहे. तुम्ही इथे का आला आहात हे उघडच आहे. आमची भेट इतकी सुखद ठरेल याची मला कल्पना नव्हती.आता तुम्ही निश्चित होऊन फिलाडेल्फीयात परत जाऊ शकता.मी तुम्हाला वचन देतो की तुमचा माल वेळेवर पोचून जाईल.मग त्यासाठी इतर ग्राहकांना उशीर झाला तरी बेहत्तर !"


मिस्टर गॉला काही न मागताच सर्व काही मिळालं होतं.

सामान वेळेवर पोचलं,जे कंत्राटात कबूल केलं होतं.


जर मिस्टर गॉनेसुद्धा डायनामाइटची तीच पद्धत वापरली असती जी बहुतेक सारे सर्वसामान्य लोक वापरतात,तर असं शक्य झालं असतं का?


न्यू जर्सीच्या फोर्ट मॉनमाउथमध्ये फेडरल क्रेडिट युनियनच्या एका ब्रँच मॅनेजरने आमच्या वर्गात हे सांगितलं होतं की कशा तऱ्हेने त्याने आपल्या एका कर्मचाऱ्याला अधिक कुशल बनण्यात मदत केली होती.


"आम्ही एका मुलीला टेलरच्या प्रशिक्षणावर ठेवलं होतं.

ग्राहकांशी तिचा व्यवहार खूप चांगला होता.पूर्ण दिवसभर तिला काम करताना काही प्रश्न येत असे,पण दिवसाचा अंताला तिच्यासमोर समस्या उभी राहत असे.कारण हिशोबांचा तालमेळ जमवायला तिला खूप वेळ लागत असे. "मुख्य टेलर मला भेटायला आला आणि त्याने मला स्पष्ट सांगितले की या मुलीला नोकरीवरून काढून टाकायला हवे.तिच्यामुळे सर्वांना उशीर होतो.तिचं काम खूपच संथ असल्याने तिला काढून टाकण्यापलीकडे काहीच गत्यंतर नाहीए.


" दुसऱ्या दिवशी मी तिचं काम बघितलं. ग्राहकांबरोबर तिचा व्यवहार खरंच चांगला होता आणि सामान्य कामकाजात तिचा वेगही चांगला होता.दिवसाच्या शेवटी मी तिला हिशेब करताना बघितलं आणि मला लक्षात आलं,की तिला वेळ का लागतो?ऑफिस बंद झाल्यावर मी तिला भेटायला गेलो.ती त्रस्त आणि हिरमुसलेली होती. मी ग्राहकांशी तिने केलेल्या व्यवहाराचं कौतुक केलं आणि तिच्या कामाच्या वेगाचीही स्तुती केली.मग मी तिला हिशोबाचा ताळमेळ करण्याची सोपी पद्धत सांगितली.तिला एकवार हे माहित झालं की मला तिच्यावर भरवसा आहे, तेव्हा तिने माझ्या सूचनांना विनातक्रार मानलं आणि लवकरच ती मी सांगितलेल्या पध्दतीनुसार ताळमेळ ठेवू लागली.यानंतर तिला ना कुठली समस्या आली,ना आम्हाला तिच्याबाबत समस्या आली. "


आपले बोलणे कौतुकपूर्ण शब्दांनी सुरू करणे म्हणजे दातांच्या त्या डॉक्टरसारखे आहे,जो आपल्या कामाची सुरुवात नोव्होकॅननी करतो.रुग्णाचा दात तर काढला जातो,पण नोव्होकॅनमुळे त्याला वेदना होत नाहीत.


सगळ्यां पुढाऱ्यांनी ह्या सिध्दान्ताचे पालन करायला हवे.


कौतुक आणि प्रामाणिक स्तुतीने बोलायला सुरुवात करा.


२१ . १०. २३ या लेखामालेतील पुढील लेख..

२/११/२३

पहिल्या महायुद्धापूर्वीचा घटनाक्रम.. Events before the First World War.


१७ सप्टेंबर १७९६ मध्ये अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या राष्ट्राला संदेश देताना सांगितले होते,"आपण जगातल्या कोणत्याही देशाशी मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजे पण युरोपची लालसी महत्त्वाकांक्षा,हितसंबंध, जीवघेणी स्पर्धा यापासून अमेरिकेने स्वत:ला दूर ठेवलेले बरे.'


१९१४ मध्ये मात्र हा सल्ला जुना झाला म्हणून फेकून द्यावा तसे काहीसे लोकांनी घडवून आणले.पहिले महायुद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे १९०९ साली अमेरिकन काँग्रेसच्या करमाफीच्या एका चर्चेच्या वेळी नॉर्मन डोड नावाचा या समितीचा संचालक साक्ष देत असताना,एक प्रश्न विचारला गेला होता.


"लोकांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी युद्धाशिवाय अजून काही उपाय आहे का?"


वर्षभर विचार करून उत्तर आले नाही.युद्ध हाच एखादी गोष्ट कायमची बदलण्याच्या प्रभावी उपाय आहे.पुढचा प्रश्न होता अमेरिकेला युद्धात कसे ओढता येईल ?


लोकांच्या सुखी आणि शांततापूर्ण जीवनासाठी काम करणाऱ्या समितीचे हे निष्कर्ष आहेत ! २५ ऑक्टोबर १९११ मध्ये विन्स्टन चर्चिल नावाचा चलाख माणूस ब्रिटिश नौदलाचा प्रमुख म्हणून नेमला गेला.तर इकडे अमेरिकेत अध्यक्ष वूड्रो विल्सनने फ्रँकलीन डेलानो रूझवेल्टची, अमेरिकन नौदलाचा उपसचिव म्हणून नेमणूक केली.अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक अवकाशात ज्या युद्धपूर्व हालचाली सुरू होत्या, त्यांचा आढावा आपल्याला स्तंभित करतो. १९०६ मध्ये अचानक रॉथशिल्ड्सने,रॉकफेलरच्या ऑईल कंपनीकडून स्पर्धा निर्माण होत असल्याचे कारण देत,स्वतःची ऑईल कंपनी 'रॉयल डच शेल मध्ये विसर्जित केली. याचे खरे कारण त्यांना यातून आपली संपत्ती दडवायची हे होते कारण काहीही झाले तरी हा रॉकफेलर त्यांचाच पिता होता आणि महत्त्वाचे म्हणजे याचवेळी अमेरिकेत मध्यवर्ती बँकेची हालचाल सुरू झाली होती.जेकब स्वीफने न्यूयॉर्क चेंबर्समध्ये तडाखेबंद भाषण ठोकीत याला वाट करून दिली.


या जेकबबद्दल 'ट्रुथ' या मासिकाच्या डिसेंबर १९१२ च्या अंकात आलेलं अवतरण पाहा- "कुन्ह-लोएब अ‍ॅन्ड कंपनी (Kuhn,Loeb, and co) ह्या बँकिंग हाऊसचा प्रमुख जेकब हा अमेरिकेत खाजगी बँकेसाठी एक मोठी चळवळ चालवीत असून तो रॉथशिल्ड्सच्या युरोपचा अमेरिकेतील हितसंबंध जपणारा आर्थिक धोरणी आहे.हा रॉकफेलरशी संबंधित असून त्याच्या स्टँडर्ड ऑईल कंपनीत त्याची गुंतवणूक आहे.तो हरीमन आणि गौल्ड्स (Harrimans Goulds) या रेलरोड कंपन्यांचा एक निकटचा माणूस असून या लोकांची अमेरिकेत फार मोठी आर्थिक ताकद आहे."


वूड्रो विल्सन हा अमेरिकन अध्यक्ष निवडला गेला.काही दिवसातच त्याला एक अश्केनाझी ज्यू सॅम्युअल उटेरमायर (Samuel Untermyer) व्हाईट हाऊस इथे भेटायला आला.झाले असे होते की हा विल्सन प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक असताना त्याचे एका सहकारी मित्राच्या बायकोबरोबर संबंध होते.ते जाहीर करण्याच्या धमकीवर त्या स्त्रीने विल्सनकडे ४०,००० डॉलर्सची मागणी केली होती.विल्सनकडे तेव्हा तितके पैसे नव्हते.

हा जो माणूस (सॅम्युअल उटेरमायर) भेटायला आला

होता,त्याने ते पैसे देण्याची तयारी दाखविली.त्या बदल्यात त्याने विल्सनला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात एक जागा भरताना आपल्या माणसाला ती मिळावी अशी अट घातली.विल्सनने ती मान्य केली आणि त्या नंतर तीन वर्षांनी ४ जून १९१६ रोजी लोईस डेम्बीत्झ ब्रडेड्स (Louis Dembitz Brandeis) हा अश्केनाझी ज्यू अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाला.


वूड़ो विल्सनने एक पत्र आपला राजकीय सल्लागार असणाऱ्या कर्नल एडवर्ड मांडेलला लिहिले आहे,"अँड्र्यू जॅक्सनच्या काळापासून अमेरिकेत काही आर्थिक घटकांनी या सरकारचा ताबा घेण्याचे सातत्याने प्रयत्न चालविले आहेत आणि माझे प्रशासन त्याला अपवाद नाही.जॅक्सनच्या काळातील बँका आता अधिक मोठ्या प्रमाणावर या देशात पुन्हा एकदा तेच उद्योग करू पाहताहेत."


राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या माणसांना काही आर्थिक दादा एका युद्धाच्या तयारीला लागले आहेत याचा अंदाज येत होता.अमेरिकन परराष्ट्र सचिव विल्यम जेन्निंग ब्यान लिहितो,"बँकांचे हितसंबंध आता युद्धाच्या तयारीसाठी सरसावत आहेत.३ ऑगस्ट १९१४ रोजी रॉथशिल्ड्सच्या फ्रेंच फर्मने न्यूयॉर्कच्या मॉर्गन कंपनीला साधारण १ बिलियन डॉलर्सचे कर्ज उभारायला सांगितले आहे.

ज्यातून बराच वाटा अमेरिकन मालाच्या फ्रेंच खरेदीसाठी अमेरिकेत ठेवायला सांगितला आहे.लुसियाना बोट बुडणे,हा प्रसंग अमेरिकेला युद्धात उतरविण्यासाठी कदाचित पुरेसा नव्हता


हा किस्सा असा की,पहिल्या महायुद्धात युरोप होरपळत होता तेव्हा दहा पैकी नऊअमेरिकनांना आपण यात पडू नये असे वाटत होते,पण त्यासाठी मग अमेरिकन प्रशासनात मोक्याच्या जागी काही लोक घुसवणे भाग होते.त्याचबरोबरीने माध्यमांत विषारी प्रचाराचा जोर लावणे भाग होते.मग कोणीतरी चूक करायला हवी आणि त्यासाठी जर्मनी निवडला गेला कारण पहिले महायुद्ध अक्षरश:जर्मन पराक्रमावर उभे होते.अमेरिकन सरकार मात्र जनभावनेमुळे तटस्थ होते.खरे वाटणार नाही, पण हा इतिहासातील एक महाभयंकर प्लॉट आहे.वूड्रो विल्सन,

कर्नल एडवर्ड मांडेल,जे.पी. मॉर्गन आणि इंग्लंडचा त्यावेळेचा अ‍ॅडमिरल चर्चिल यांची खलबते झाली.

लुसियाना (Lusitania) नावाची प्रवासी बोट जिच्यात एकूण ११९५ प्रवासी होते आणि त्यांच्या वेळी १९५ अमेरिकन होते,ती बोट जर्मनीने बुडवायची घोडचूक केली तर बरे असे ठरले! मग या बोटीला लष्करी सामग्रीने सज्ज करण्यात आले. या बोटीवर जे.पी.मॉर्गनने ६ मिलियन डॉलर्सची शस्त्रात्रे भरली.प्रवाशांना याची काहीही कल्पना नव्हती.मुख्य म्हणजे हे सर्व आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध होते.बोटीचा प्रवास ठरला आणि जर्मन गुप्तहेरांनी ते आपल्या सरकारला कळविले.तातडीने धूर्त जर्मन सरकारने सावधगिरी म्हणून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील सुमारे पन्नास वर्तमानपत्रात 'अमेरिकन लोकांनी या बोटीत प्रवास 'करू नये' अशी ताकीद असणारी जाहिरात देण्याचे ठरविले,पण अमेरिकेच्या प्रवास परराष्ट्रखात्याने हे कळताच सर्व वर्तमानपत्रांना दमबाजी करून,त्या जाहिराती छापण्यापासून परावृत्त केले.त्यामुळे ही जाहिरात फक्त एकाच वर्तमानपत्रात छापून आली.या जाहिरातीचे स्वरूप असे होते :


'जे प्रवासी अटलांटिक पार करून प्रवासाला जाण्याचे ठरवीत आहेत.त्यांना समज देण्यात येते की सध्या जर्मनी आणि ब्रिटनमध्ये एक युद्ध सुरु आहे आणि त्याच्या सीमा ब्रिटनच्या समुद्रात खोलवर आहेत.त्यामुळे इथे येणाऱ्या प्रवासी जहाजाने हे स्वतःच्या जबाबदारीवर त्या समुद्रात प्रवेश करावा.ही जहाजे शत्रुपक्षाची म्हणून कदाचित जर्मनीकडून बुडविली जाऊ शकतात आणि तसे झाल्यास त्याची कोणतीही जबाबदारी जर्मनीवर राहणार नाही.'


जर्मन दूतावास वॉशिंग्टन : २२ एप्रिल १९९५


जर्मन नौदलाला 'या युद्धात आधी गोळ्या घाला आणि नंतर प्रश्न विचारा',अशा सर्वसाधारण सूचना होत्याच.७ मे रोजी ही बोट कोणत्याही संरक्षणाशिवाय निघाली.तिचा प्रवास मार्गही अगदी जर्मनीच्या माहित असणाऱ्या पाणबुडीच्या ठाण्यानजिकचा.झाले, जर्मनीच्या एकाच क्षेपणास्त्र तडाख्याने त्या बोटीवरच्या दारुगोळ्याने पेट घेतला आणि तिला केवळ अठरा मिनिटात जलसमाधी मिळाली आणि सुमारे हजार लोक ज्यात स्त्रिया,लहान मुले होते,ते रसातळाला गेले.

त्यावेळी अमेरिकेचा राजदूत,पेज हा जणू सर्व प्रवासी वाचले,अशीच बातमी आल्यासारखा एका नियोजित डिनरपार्टीला गेला आणि तिथे मात्र या शोकांतिकेचे एकेक टेलिग्राम येऊन थडकले.ते पेजने तिथेच वाचले.

यावर अमेरिकेत संतापाची लाट उसळली आणि मग मात्र कर्नल मांडेल हाऊसने,अमेरिका याचा बदला म्हणून,एका महिन्यात या युद्धात उतरणार असल्याचे अत्यंत आवेशाने जाहीर केले.त्याच वेळी अजून एक गर्भश्रीमंत व्यावसायिक बर्नार्ड.एम.बरुच याने पिट्सबर्गला लष्करी वातावरण तयार करण्यासाठी आणि मानसिकता तयार करण्यासाठी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

युद्धाबद्दल जे. पी. मॉर्गन आणि त्याच्या अराजकीय निकटवर्तीयांकडून अमेरिकन लोकांची सरकारवर युद्धासाठी दबाव आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू करण्यात आले.त्याचवेळी एक नॅशनल सिक्युरिटी लीग स्थापण्यात आली.जिला अमेरिकेला युद्धात उतरावे यासाठी जनमत तयार करण्याचे सांगण्यात आले.या लीगच्या नावाने मोठा प्रचार सुरू करण्यात आला.ज्यात जर्मनीला इशारे देण्यात आले.जे लोक शांततेच्या बाजूचे होते,त्यांना जर्मनीचे हस्तक,सैतानी माणसे,गद्दार आणि जर्मनीचे हेर अशा शेलक्या विशेषणांनी संबोधण्यात येऊ लागले.त्यावेळी वर्तमानपत्रे हीच मोठी माध्यमे होती.

असला सततचा प्रचार,मोठ्या प्रमाणावर जनमत तयार करीत असल्याने सामान्य अमेरिकन नागरिकाला आता असे वाटू लागले होते की अमेरिकेने या युद्धात उतरावे कारण ती आपली नैतिक जबाबदारी आहे.पुढे दुसऱ्या महायुद्धातला हिटलरचा प्रचारक गोबेल्स आपल्याला माहीत आहे.त्याने बहुधा असल्या उद्योगातूनच प्रेरणा घेतली असावी असा हा विस्तृत प्रचार होता.या लीगमध्ये एक जो माणूस होता,त्याचे नाव फ्रेडरिक आर काऊडर्ट (Frederic R. Coudert) हा वॉल स्ट्रीटवरचा ब्रिटन,

फ्रान्स आणि रशियन सरकारांचा अटर्नी.त्या लीगमधली इतर माणसे पाहिली तर युद्धाच्या सीमेवर अमेरिकेला आणून ठेवण्यात कोणाचा हात होता हे स्पष्ट होईल.


● सायमन आणि डॅनियल गुगलहेम (Simon and Daniel Guggenheim)


● प्रख्यात म्युनिश्नस कुटुंबाचा टी कोलमन ड्यूपोंत (T. Coleman Dupont)


● मॉर्गनचा पूर्व भागीदार रोबर्ट बेकॅन (Robert Bacon)


● कार्नेगी स्टीलचा प्रवर्तक


● यू. एस. स्टीलचा हेन्री क्लाय (Henry Clay)


● ज्याला मॉर्गनच्या हितासाठीचा परराष्ट्रमंत्री म्हटले जायचे,तो जज्ज गरी जॉर्ज डब्ल्यू.पर्किन्स (Judge Gary George W. Perkins)


● पूर्वाध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट (Theodore Roosevelt)


● दस्तुरखुद्द जे. पी. मॉर्गन (ज्युनिअर )


● अध्यक्ष टाफ्ट आणि रूझवेल्टच्या प्रशासनातील युद्ध सचिव हेन्री.एल.स्टीमसन (Henry L. Stimson )


● मॉर्गनच्या कह्यातला वॉल स्ट्रीटचा अर्थतज्ज्ञ अजून एक स्टीम्सन


ज्यावेळी मॉर्गन आणि त्याचे आर्थिक हितसंबधी युद्धाचे नगारे वाजवीत होते,तेव्हा तरीही काहीसा निरिच्छ असलेल्या वूड्रो विल्सनला युद्धात खेचणारे अजून काही प्रभावशाली लोक होते. त्याचा परराष्ट्र सल्लागार कर्नल एडवर्ड हाउस आणि त्याचा पिता वाल्टर हिन्स पेज (Walter Hines Page) जो पुढे ब्रिटनला अमेरिकेचा राजदूत म्हणून गेला.या पेजचा मोठा मेहनताना याच मंडळींकडून दिला जात होता.हे जे कर्नल एडवर्ड हाउस नावाचे गृहस्थ होते,ते प्रत्यक्षात आपण विल्सनचे अतिशय नेमके आणि विवेकी सल्लागार असल्याचे दाखवीत असत,पण खरे तर अध्यक्ष विल्सनला ब्रिटिशांशी अश्लाघ्य अशी मैत्री करायला यानेच भाग पाडले.अगोदर त्याने विल्सनला युद्धात ढकलले आणि नंतर ब्रिटिशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वापरले.राजकीयदृष्ट्या बघता,इथेच,अमेरिकेची महायुद्धात उतरल्यानंतरही स्वतःचे असे एक तटस्थ आणि न्यायाचे परराष्ट्रधोरण जगापुढे मांडण्याची एक छान संधी या माणसामुळेच हुकली अशी इतिहासातील एक दुखरी नोंद आहे..अयोग्य माणसे मोक्याच्या जागी असतील तर काय घडते,याचे हे एक बोलके उदाहरण आहे.१९९६ ला या कर्नल हाऊसने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या फ्रंक एल पोक नावाच्या अधिकाऱ्याला (हा नंतर मॉर्गनचा सल्लागार म्हणून काम करीत होता) लिहिले,"प्रेसिडेंटना ब्रिटिशांच्या इच्छेविरुद्ध काही करू नये,म्हणून मार्गदर्शन करणे अत्यावश्यक आहे.


याने ब्रिटिश पंतप्रधान ऑर्थर बल्फोर यांना अध्यक्ष विल्सनला कसे हाताळले पाहिजे याचे सल्ले दिले.

विल्सनसमोर आपण आपल्या समस्या अधिक अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सांगायला हव्यात आणि अमेरिकन मदतीची आपल्याला गरज आहे हे त्याला पटवून द्यायला हवे.जर्मनीशी शांततेच्या कोणत्याही तडजोडी त्याने स्वीकारू नयेत.ते अमेरिकन-ब्रिटिश मैत्रीला घातक ठरेल,अशी कान भरण्याची कामे या कर्नल हाऊसने अपूर्व अशा निष्ठेने केली.


अमेरिका युद्धात उतरल्याबरोबर ब्रिटिशांनी आपला एक लायझनिंग अधिकारी व्हाईट हाऊसमध्ये पाठविला आणि या कर्नल हाऊसने त्याला जे सल्ले दिले ते बघण्यासारखे आहेत. "प्रेसिडेंटला जे ऐकायला आवडेल तेच बोल. त्यांच्याशी वाद घालू नये,त्यांची मर्मस्थाने शोधून त्यावर वेळ येताच आपण प्रहार करूच,पण तुझे वर्तन मात्र अत्यंत नम्र आणि हुजरेगिरीचेच असले पाहिजे." या कर्नल हाऊसच्या प्रतापात पुढे पहिल्या महायुद्धाच्या तहाच्या अटी ठरविण्याचा पण समावेश आहे.


त्यावेळचा अमेरिकन नौदलाचा उपसचिव होता फ्रँक्लीन डेलानो रूझवेल्ट (हाच नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेचा अध्यक्ष होता.) त्याला अमेरिकेने युद्धात उतरायला वेळ घ्यावा याचा अत्यंत संताप येत होता.

रूझवेल्ट डेमोक्रॅटिक पक्षाचा.अमेरिकेने प्रशासनाने हक्कांसाठी आपले धोरण कुठे न्यावे असा विषय लावून धरला.रिपब्लिकन पक्षाच्या काही युद्धखोर लोकांसोबत जेवताना त्याने अमेरिकन प्रशासनाने हक्कांसाठी आपले धोरण कुठे न्यावे असा विषय लावून धरला. (या लोकांमध्ये थिओडोर रूझवेल्ट,जनरल वूड,जे. पी. मॉर्गन आणि एलीह रूट ही माणसे होती.) रूझवेल्टचे कठोर दबाव अखेर यशस्वी झाले.


जवळपास १९५ अमेरिकन नागरिकांच्या हकनाक मृत्यूनंतरही,माध्यमांचे दबाव,अध्यक्ष वूड्रो विल्सनचे सततचे इशारे आणि लोकांच्या संतप्त भावना असूनही या युद्धात उतरण्यासाठी काँग्रेसची परवानगी मिळायला जवळपास दोन वर्षे लागली.हा अमेरिकेच्या तटस्थ धोरणाचा सबळ पुरावा आहे.कसा काळ असतो बघा, त्यावेळी अमेरिका आजच्यासारखी युद्ध खुमखुमी असणारा देशच नव्हता.शेवटी १६ एप्रिल १९१७ रोजी देवाच्या इच्छेला स्मरून आणि देशाच्या हाकेचा सन्मान म्हणून अमेरिका युद्धात उतरली.


एक हजार निरपराध लोकांच्या मृत्यूमुळे मात्र काही लोकांना आपले स्थान गमवावे लागले.परराष्ट्रमंत्री विल्यम जेनिंग ब्र्यानने राजीनामा दिला.बोटीच्या कप्तानाला दोषी ठरविण्यात आले आणि जगाच्या कल्याणासाठी अमेरिकेचे भाबडे सैनिक,आपली घरे,

बायका,मुले मागे एकाकी सोडून,काहीही संबंध नसलेल्या शत्रूला मारण्यासाठी आणि मरण्यासाठी युद्धभूमीकडे रवाना झाले.(जसे ते हल्ली नेहमीच जातात.)


हे सारे घडत असताना अमेरिकन माध्यमांवर रॉकफेलर आणि मॉर्गनची अत्यंत करडी नजर होती.आयर्लंडच्या जवळ १९५ अमेरिकन लोकांना घेऊन बुडालेली ही बोट,हे या गुलाम माध्यमांनी राष्ट्रीय प्रचारासाठी युद्धाच्या भावनात्मक पाठिंब्यासाठी ज्वलंत प्रतीक बनविले.

अमेरिकेची युद्धातील एन्ट्री ठरवल्याबरहुकुम घडून आली.


अमेरिकन काँग्रेसने एप्रिल ६,१९१७ रोजी अमेरिकेला युद्धात उतरण्याची परवानगी दिली.ह्या पास झालेल्या ठरावाचे शब्द होते, 


"अमेरिकेने जगातील सर्व युद्धे समाप्त करण्यासाठी आणि जग लोकशाही मार्गाने सुरक्षित करण्यासाठी या युद्धात भाग घ्यायचे ठरविले आहे.'


बैठकीत सामील असणारा ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जॉन मायनर्ड केन्स (John Maynard Keynes) म्हणाला,

"या असल्या अपमानास्पद कराराने शांतता येणे अशक्य आहे."


या युद्धातून रॉकफेलरसारख्या युद्ध दलालांना २०० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त फायदा झाला.


०३.१०.२३ या लेखमालेतील लेख