गॅलिलिओला आपल्या वडिलांमुळे संगीताची गोडी लागली.ल्यूट वाद्य शिकून त्यावर त्यानं अनेक संगीत रचना केल्या.होमर,दान्ते आणि व्हर्जिल यांची काव्यं गॅलिलिओला तोंडपाठ होती.आपल्या वडिलांचं कलासक्त मन, झपाटलेपण,बंडखोर वृत्ती,पुरोगामी विचारांची कास,प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला.
पिसामधल्या चर्चमध्ये जायला गॅलिलिओला खूप आवडायचं.एका दंत कथेप्रमाणे १५८३ साली गॅलिलिओ फक्त १७ वर्षांचा असताना
एका रविवारी धर्मगुरूंचं पिसामधल्या कॅथिड्रलमध्ये कंटाळवाणं प्रवचन सुरू असताना त्यानं छतावर लटकणारा एक नक्षीदार दिवा बघितला.वाऱ्याच्या झोताबरोबर तो दिवाही झोके घेत होता.त्या झोक्याचं लयबद्ध मागेपुढे होणं गॅलिलिओला अचंबित करून गेलं;पण ते बघत असतानाच त्याला एकदम एक ब्रेन वेव्ह आली आणि तो नाचतच घरी आला आणि त्यानं लगेचच प्रयोगाला सुरुवात केली.त्यानं दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू घेतल्या.झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचं (पेंड्युलमचं) वजन कमी असो वा जास्त,जोपर्यंत लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते,तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो असा निष्कर्ष गॅलिलिओनं प्रयोगांनंतर निरीक्षणं करून काढला.दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही त्याला समजलं.या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्यानं वेळ मोजण्यासाठी त्यानं हाताची नाडी वापरली.याच पेंड्युलमचा वापर नंतर
गॅलिलिओनं त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला आणि याच पेंड्युलमचा वापर करून ह्यूजेन्सनं पहिलं घड्याळ बनवलं. त्या कॅथेड्रलमध्ये अजूनही एक दिवा जतन करून ठेवला आहे.तो 'गॅलिलिओचा दिवा' म्हणून आजही ओळखला जातो.
गॅलिलिओला आकिर्मिडीज आवडायचा. आकिर्मिडीजची 'युरेका युरेका' ही गॅलिलिओच्याच सुपीक डोक्यातून निघालेली दंतकथा असावी,असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे.गॅलिलिओनं आकिर्मिडीजच्या सिद्धान्ताप्रमाणे एक छोट्या आकाराचा वैज्ञानिक तराजू बनवला.गॅलिलिओनं बनवलेला हा खास तराजू (हायड्रोस्टॅटिक बॅलन्स) सर्वसामान्य तराजूपेक्षा खूपच वेगळा होता.याची खासियत म्हणजे या तराजूचा वापर करून कुणीही एखाद्या संमिश्र धातूमधल्या दोन धातूंचं नेमकं प्रमाण शोधू शकायचा.
याच वेळी ॲरिस्टॉटलला देव मानून त्याचा शब्द प्रमाण मानणाऱ्या लोकांचा गॅलिलिओला राग यायला लागला.'जड वस्तू ही हलक्या वस्तूपेक्षा जमिनीवर आधी पडते.'असं ॲरिस्टॉटलनं दीड हजार वर्षांपूर्वी मांडलेलं म्हणणं त्याला पटत नव्हतं.
ॲरिस्टॉटलच्या शब्दांची शहानिशा न करता झापडबंद समाज आणि विद्वान यांनीही ते मान्यही केलं होतं.गॅलिलिओचं म्हणणं नेमकं याच्या उलट होतं.भिन्न वजनाच्या दोन वस्तू पडताना एकाच वेळी खाली पडतात,असं त्याला म्हणायचं होतं.सत्य काय आहे हे प्रयोगानं बघायलाच पाहिजे,असं त्याच्या मनान घेतलं.अखेर त्यानं एके दिवशी याची खात्री करून घ्यायचं ठरवलं आणि दुसऱ्याच दिवशी पिसाच्या मनोऱ्यावरून जड आणि हलकी वस्तू खाली टाकून बघायचं ठरवलं. ११७४ साली बांधलेला पिसाचा मनोरा आज तर लंबरेषेपासून १७ फुट झुकलेला आहे. या मनोऱ्यापाशी गॅलिलिओनं प्रयोग बघायला बऱ्याच लोकांना बोलावलं होतं.गर्दीतून वाट काढत गॅलिलिओ स्वतः मनोऱ्याच्या दगडी भिंतीच्या आतल्या,
उभा चढ असलेल्या गोलाकार जिन्याच्या शेकडो पायऱ्या चढून वर गेला.१७९ फूट उंचीवर त्यानं एक ५० किलोचा,तर दुसरा १ किलोचा असे तोफेतले दोन गोळे ठेवले होते.गॅलिलिओनं काहीच क्षणात एकाच वेळी ते गोळे खाली सोडले. काहीच क्षणात दोन्ही तोफेचे गोळे जमिनीवर येऊन पडले;पण ते अचूकरीत्या एकाच क्षणी खाली पडले नाहीत.जेव्हा जड गोळा जमिनीवर आदळला,तेव्हा हलका गोळा जमिनीपासून २ इंचावर होता इतकंच.हा फरक हवेच्या खालून मिळणाऱ्या रेट्यामुळे आहे,असं गॅलिलिओनं सांगितलं;पण हा फरक खूपच नगण्य होता.गॅलिलिओनं १५९१ च्या सुमारास प्रयोगाच्या साहाय्यानं जड आणि हलकी वस्तू एकाच वेळी खाली पडतात,हे दाखवून दिलं आणि ॲरिस्टॉटलच्या मतांना तडा दिला.
ज्या वेळी गॅलिलिओ पडुआ विद्यापीठात प्रोफेसर होता,त्या वेळी त्याची पाओलो सार्पी, जिओव्हानी पिनेली आणि सॅग्रॅडो यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री झाली.पिनेलीच्या वैयक्तिक ग्रंथालयात ८० हजारांहून जास्त ग्रंथ होते.पिनेलीबरोबरच्या मैत्रीमुळेच गॅलिलिओला त्याच्या ग्रंथालयाचा हवा तसा उपयोग करता आला.
पिनेलीमुळे गॅलिलिओला व्हेनिसच्या शस्त्रागाराचा सल्लागार म्हणूनही काम मिळालं. अशी कामं करायला गॅलिलिओला खूप आनंद मिळत असे. त्यानं लिहिलेल्या 'डायलॉग' या पुस्तकात त्यानं याविषयी लिहिलंय.इथे असताना त्यानं किल्ल्यांची तटबंदी या विषयावर एक प्रबंध लिहिला.तसंच १५९४ मध्ये त्यानं शेतीला पाणीपुरवठा करणारं एक यंत्र बनवलं आणि व्हेनिसमध्ये त्याचं चक्क पेटंटही घेतलं पेटंट कायद्याच्या इतिहासात पेटंट मागणाऱ्या पहिल्या काही संशोधकांमध्ये गॅलिलिओ मोडतो.इतकंच काय,पण गॅलिलिओनं जहाजबांधणीतले अनेक प्रश्न भौतिकशास्त्राच्या मदतीनं सोडवले,लष्कराच्या कामातही त्यानं आपल्या बुद्धीचा प्रत्यय दाखवला.तोफेच्या गोळ्याचा अचूक मारा करण्यासाठी तोफ किती अंशाच्या कोनात ठेवायला हवी हे त्यानं गणिताच्या मदतीनं शोधून काढलं.गॅलिलिओचा मित्र संग्रॅडो खूप श्रीमंत असल्यामुळे गॅलिलिओला पैशांची चणचण भासायला लागली की तो त्याची प्रतिष्ठा वापरून त्याचा पगार वाढवण्याचं काम करत असे,जेव्हा गॅलिलिओनं 'डायलॉग' आणि 'डिसकोर्सेस' हे दोन ग्रंथ लिहिले त्यात आपल्या या जिज्ञासू आणि बुद्धिमान मित्राची आठवण म्हणून त्याच्याच नावाचं पात्र निर्माणकरून त्याला साहित्यविश्वात अजरामर केलं.
१५९३ साली गॅलिलिओनं भौतिक- शास्त्रातलं अत्यंत उपयोगी असं तापमापक ( थर्मामीटर) हे साधन पाण्याचा वापर करून बनवलं.त्यानंतर काही वर्षांनतर गॅलिलिओनं पाण्याऐवजी वाइनचा वापर केला;पण नंतर १६७० मध्ये पाऱ्याचा वापर करण्यात आला; पण थर्मामीटरच्या कल्पनेचा जनक म्हणून गॅलिलिओचंच नाव घ्यावं लागेल.या काळात त्यानं गोलभूमिती,तरफ,पुली,
स्क्रू या विषयांवर निबंध लिहिले.गॅलिलिओनं वेग (व्हेलॅसिटी) याची कल्पना वैज्ञानिक परिभाषेत मांडली. गॅलिलिओनं बल किंवा जोर (फोर्स) याचीही कल्पना मांडली.कुठलाही पदार्थ जोपर्यंत आपण त्यावर बाहेरून कुठलाही जोर लावत नाही तोपर्यंत त्याच वेगानं प्रवास करत राहतो. ही त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच असते,असं गॅलिलिओनं मांडलं. यानंतर कुठलीही वस्तू आपल्या जागेवरून हलायला जो प्रतिकार करते त्याला गॅलिलिओ 'जडत्व (इनर्शिया)' असं म्हणे.गॅलिलिओच्या या विचारांवर आणि नियमांवरच पुढे न्यूटननं त्याचे गतीचे नियम विकसित केले.गॅलिलिओनं उच्चतम प्रतीचा एक कंपास बनवला होता.तो समुद्री यात्रा करणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरला.त्यानं आपल्या हयातीत सूक्ष्मदर्शक,पेंड्युलमचं घड्याळ,खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप अशा अनेक गोष्टींचे शोध लावले.
१६०९ साली गॅलिलिओनं दुर्बीण (टेलिस्कोप) बनवली आणि मग त्यानं अशा दुर्बिणी (टेलिस्कोप्स) विकायला सुरुवात केली.मग हे टेलिस्कोप्स इतके लोकप्रिय झाले की,ते घरोघरी दिसायला लागले आणि प्रतिष्ठेचा भागही बनले. याच दुर्बिणीतून गॅलिलिओच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं लांबवरून येणारं जहाज बघितलं असतं;पण त्याऐवजी त्यानं आपली दुर्बीण फक्त आकाशाकडे वळवली आणि त्या क्षणापासून संपूर्ण विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून गॅलिलिओनं चंद्रावरचे डोंगर, दऱ्या,विवरं अशा अनेक गोष्टी न्याहाळल्या. चंद्रावर दिसणारे डाग हे डाग नसून तिथल्या डोंगराच्या पडणाऱ्या सावल्या आहेत हे गॅलिलिओला जाणवलं.या सगळ्या शोधांवर मग गॅलिलिओनं 'द स्टारी मेसेंजर' नावाचं पुस्तकही लिहिलं.१६१० साली गॅलिलिओनं गुरुच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह आणि चंद्र शोधून काढले.गुरूला आणखी उपग्रह आहेत ही गोष्ट त्या काळी कोणालाच ठाऊक नव्हती;पण गॅलिलिओनं आपल्या दुर्बिणीतून गुरूच्या भोवती फिरत असलेले चार चंद्र शोधले. गुरूभोवतीचे चंद्र बघून,चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत,त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचं कारण नाही, हे कोपर्निकसचं म्हणणं बरोबर असलं पाहिजे,'असं त्याचं ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलिलिओ रातोरात चक्क हिरो बनला;पण पृथ्वीला केंद्रस्थानी मानणाऱ्या चर्चला गॅलिलिओचं म्हणणं पटणंच शक्य नव्हतं. त्यामुळे 'चंद्रावरचे पर्वत,डाग आणि दुर्बिणीतून दिसणाऱ्या इतरही गोष्टी खऱ्या नसून त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत,'असंच चर्च म्हणायला लागलं.
८ जानेवारी १६४२ रोजी गॅलिलिओ मृत्युमुखी पडला.खेदाची गोष्ट ही की,पोप रागावेल म्हणून १७३७ सालापर्यंत म्हणजे शंभरएक वर्षं गॅलिलिओचं स्मारकसुद्धा उभं राहिलं नाही. विसाव्या शतकातला प्रसिद्ध जर्मन नाटककार बॉल्ड ब्रेख्त याच्या लेखणीतून साकारलेलं 'द लाइफ ऑफ गॅलिलिओ' हे नाटक गॅलिलिओच्या आयुष्याच्या दुसऱ्या कालखंडावर भाष्य करतं. पुढे १९७५ मध्ये याच नाटकावर आधारित 'गॅलिलिओ' नावाचा चित्रपटही निघाला.
एखाद्या पदार्थांचे गुणधर्म प्रयोगाच्या आधारानं मांडताना गॅलिलिओनं गणिताचा आधार घेतला आणि या विषयाचं महत्त्व अधोरेखित केलं. आपलं कुतूहल फक्त 'का?' विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे,अस तो म्हणे.
कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिध्द केल्याशिवाय त्यानं खरी मानली नाही. त्यामुळेच गॅलिलिओला पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल.
गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली 'सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो याविषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली.मग त्यावर १० वर्षं विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले.शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी 'गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते' हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या मथळ्यावर झळकली
होती!त्याअगोदर तीन वर्ष म्हणजे १९८९ साली झेप घेतलेलं 'गॅलिलिओं' नावाचं अंतराळयान १९९५ साली जेव्हा गुरूपर्यंत पोहोचलं तेव्हा विसाव्या शतकानं गॅलिलिओला केलेला तो सलामच होता! गॅलिलिओच्याच दुर्बिणीनं याच गुरूभोवती फिरणारे चार चंद्र बरोबर ३८५ वर्षांपूर्वी टिपले होते!गॅलिलिओ,
त्याचं विपुल लेखन आणि विशेष म्हणजे त्याचा 'डायलॉग' हा ग्रंथ याचे ऋण जगातला कुठलाही माणूस कधीच विसरू शकणार नाही, हे मात्र खरं!
'का?' असं विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे.कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध केल्याशिवाय खरी मानू नका.
०६.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग…
तळटिप - हूशार माकड गब्बरसिंग हा
०६.०२.२४ रोजी लिहिलेला लेख सोयरे वनचरे-अनिल खैर मधून घेतला होता.
Clever Monkey Gabbarsingh ..|