एक रुग्ण त्याच्या डॉक्टरांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हणतो,करुणा म्हणजे फक्त हातात हात धरणे नाही.ते एक चांगले औषध आहे.याची आठवण करून देणारे हे पुस्तक आहे.लेखकांचे व प्रकाशकांचे आभार व धन्यवाद…
काही शब्द रोजच्या वापराने इतके गुळगुळीत झालेले असतात की पुन्हा नव्याने त्यांच्याकडे बघावं लागतं.आरोग्य हाही त्यातलाच एक.
आपल्या शारीरिक स्वास्थ्याचे दोन भाग आहेत : शारीरिक क्षमता ("Physical Fitness") आणि आंतरिक आरोग्य ("Health") हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहेत,दोन्हींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तरच परिपूर्ण स्वास्थ्य आपल्याला मिळेल.
शारीरिक क्षमता :
दूरवर चालणं-धावणं,वजन उचलणं,मैदानी खेळ, योगासनं करू शकणं,टेकडी चढणं ह्यांसारख्या गोष्टी शारीरिक क्षमतेमध्ये येतात.हे सहजपणे करणाऱ्या व्यक्तीला आपण ते फिट आहेत असं म्हणतो.व्याख्या करायची झाली तर शारीरिक क्षमता म्हणजे आपले अवयव,स्नायू वापरून शरीराबाहेरच्या आव्हानाला तोंड देऊ शकणे.साधारणतः शारीरिक क्षमता ही डोळ्यासमोर सहजपणे दिसू शकते.अनेकदा अशा 'फिट' व्यक्तींमध्ये त्यांच्या-त्यांच्या क्षमतेप्रमाणे बळकट स्नायू,चपळता,दमश्वास टिकवता येणे,शारीरिक कौशल्य दिसून येतं.
आंतरिक आरोग्य :
शरीराच्या आतल्या सगळ्या यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्या तर आंतरिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल.मेंदू व्यवस्थित विचार करू शकतो आहे, हृदय रक्ताभिसरण करतंय,
मूत्रपिंडं रक्तशुध्दी करतायत, पंचेंद्रियं आपापलं काम नीट करत आहेत असं सगळं असेल तर चांगलं आरोग्य आहे.शिवाय ह्यात पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करते आहे,हे ही आलंच.
ही पचनसंस्था आपल्याला अन्नामधून दोन गोष्टी मिळवून देतेःऊर्जा आणि कच्चा माल.आपल्याला रोजच्या जगण्यात प्रत्येक क्षणी ऊर्जेची गरज असते. याखेरीज शरीरात अनेक प्रकारच्या पेशी-अवयवांची दुरुस्ती करावी लागत असते ज्यासाठी लागणारा कच्चा माल अन्नातून येतो.आपल्या शरीरात काही लाख कोटी पेशी असतात.त्यातल्या कुठल्या ना कुठल्या लाखो पेशी दररोज मरत असतात,तितक्याच पुन्हा बनवाव्या लागतात.हाडे,स्नायू यांची झीज भरून काढावी लागते. यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल लागतो.आत आलेल्या अन्नाचं योग्य प्रकारे ऊर्जा आणि कच्च्या मालात रूपांतर होणं,आणि शरीरातल्या सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू राहणं ही उत्तम आंतरिक आरोग्याची दोन प्रमुख लक्षणं आहेत.
आपण अनेकदा 'Metabolism' हा शब्द वापरतो. कोणाचं "Metabolism Slow" आहे म्हणून पटकन वजन वाढतं,कोणाचं "Fast" आहे म्हणून कितीही खाल्लं तरी वजन वाढायची चिंता नसते,असं आपण ऐकतो-बोलतो.यात Me- tabolism Slow असणं म्हणजे आपल्या शरीराचा Basal Metabolic Rate (BMR) हा कमी असणं.Fast असणं म्हणजे BMR जास्त असणं.
BMR हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो :
(१) साठवलेली चरबी सोडून उरलेलं वजन (ज्याला Lean Mass असं म्हणतात) (२) वजन, (३) वय आणि लिंग, (४) वाढीचं वय, (५) सध्या असलेला आजार, (६) आजूबाजूच्या हवेचं तापमान, (७) त्या व्यक्तीची अनुवांशिकता (Genetics).
Metabolism हे खरं तर एक फार लांब-रुंद, ढोबळ नाव आहे. शरीर चालवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळंच Metabolism मध्ये येतं. दोन प्रकारच्या प्रक्रिया Metabo- lism मध्ये असतात.
१. Catabolism : शरीरात जे काही विघटन चालू
असतं ते ह्या प्रकारात मोडतं.उदा.अन्नाचं विघटन होऊन कच्चा माल तयार होणं.
२. Anabolism : शरीराला जे काही नवीन बनवावं
लागतं किंवा दुरुस्त करावं लागतं त्या प्रक्रिया यात येतात. उदा. नवीन पेशी बनवणे, पेशींची वाढ होणे, नवीन स्नायू बनवणे, हाडांची झीज भरून काढणे, इ.
शारीरिक क्षमता (Fitness) आणि आंतरिक आरोग्य (Health) या दोघांचंही महत्त्व एकमेकांशी जोडलेलं,पण तरीही वेगळं आहे.या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिल्यानेच पूर्ण स्वास्थ्य अनुभवायला मिळू शकतं.
आपण वर बघितल्याप्रमाणे अन्नपचन,शरीरातल्या बाकी प्रक्रिया (ज्यात चरबी साठवणे / वापरणे हेही आलं.) ह्या सर्व आंतरिक आरोग्यामध्ये येतात.शारीरिक क्षमतेवर केलेल्या कामाने ह्या सर्वांना मदत जरूर होते,पण ह्याबद्दलचा एक मुद्दा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दोन उपमा बघूयाः
आपल्याकडे स्कूटर,कार असं जे वाहन असतं ते त्याच्या-त्याच्या आंतरिक रचनेप्रमाणे इंधनाची,तेलाची मागणी करतं.त्यात टाकलं जाणारं इंधन हे कुठलंही असून चालत नाही पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनात डिझेल टाकलं तर वाहन बिघडतं.म्हणजेच हे इंधन, आणि वंगणासाठी तेल हे वाहनाच्या आंतरिक आरोग्याशी संबंधित आहे.
आता जर कोणी म्हणाला की,आज मी माझ्या वाहनात पेट्रोल ऐवजी डिझेल टाकतो.आणि रोजच्या १० किलोमीटर ऐवजी २० किलोमीटर चालवतो.म्हणजे मग चुकीच्या इंधनामुळे निर्माण झालेली उणीव भरून निघेल." तर आपण त्याला वेड्यात काढू !
त्या वाहनासारखंच आपल्या शरीराचंही आहे.माझ्या आंतरिक प्रक्रियांसाठी अयोग्य इंधन (अन्न) मी खाईन पण आज दुप्पट व्यायाम करीन,जास्त अंतर चालीन आणि सर्व काही ठीक होईल ही आपली गैरसमजूत आहे !
शारीरिक क्षमतेवर नेहेमीपेक्षा जास्त काम करून आपण आंतरिकप्रक्रियांमधली उणीव भरून काढू शकतो असं आपल्याला सांगण्यात आलंय,पण ते खरं नाही.
चार आग्रहाचे गुलाबजाम जास्त खा आणि नंतर मैलभर चालून ये किंवा व्यायामशाळेत जास्त घाम गाळ,म्हणजे मग काही होत नाही असं आपल्याला वाटतं.पण हे म्हणजे,जुळ्या भावांपैकी एकाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याला चार घास जास्त देण्यासारखं आहे !
आपल्या परिपूर्ण आरोग्याचे दोन भाग शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हे जुळ्या भावांसारखे आहेत.ते एकमेकांना मदत करू शकतात,पण त्यापैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.एवढंच नाही तर असं दुर्लक्ष केल्याची उणीव दुसऱ्याकडे जास्त लक्ष देऊन भरून काढता येत नाही !
आपण कदाचित "You cannot outrun a bad diet" असं वचन ऐकलं असेल.त्याचा अर्थ हाच आहे की अधिक शारीरिक क्षमता आंतरिक आरोग्याला थोडासा टेकू देऊ शकेल,पण त्यांची जागा घेऊ शकत नाही. Fitness cannot compensate for bad health.
शारीरिक क्षमतेचा संबंध आपल्याला रोजच्या जगण्यात शरीराबाहेर जी कामं करावी लागतात त्याच्याशी आहे. तुम्ही सहज जिने चढू शकता का ? थोडंसं धावून बस पकडू शकता का ? भाजीच्या पिशव्या,प्रवासाच्या बॅगा घेऊन निदान काही अंतर सहज चालू शकता का ? कुटुंबियांबरोबर,मित्रांबरोबर लांबवर फिरायला जाऊ शकता का? बसमध्ये विमानात बसताना आपापली बॅग वरच्या कप्प्यात ठेवू शकता का? मुलांबरोबर / नातवंडांबरोबर खेळू शकता का ? त्यांना कडेवर घेऊ शकता का ?आपलं वय जसं वाढत जाईल तसं हे सगळं करण्याची आपली इच्छा असतेच आणि ते करू शकण्याची क्षमता आपण राखली पाहिजे.त्यासाठी नियमित व्यायाम, खेळ हे गरजेचं आहे. आणि आपण आधी पाहिल्याप्रमाणे,हा विषय शारीरिक क्षमतेचा आहे.
दुसरा विषय आंतरिक आरोग्याचा :
तुम्हाला जीवनशैलीचे आजार आहेत का किंवा त्याची सुरुवात झाली आहे का? वजन आणि पोटाचा घेर वाढलेला असणं,उच्च रक्तदाबासाठी औषध असणं, रक्तातील इन्सुलिनची किंवा ग्लुकोजची पातळी वाढलेली असणं,स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित नसणं / पीसीओडी चा त्रास असणं,इ.लक्षणं चालू झाली आहेत का ? वेगळ्या शब्दातः जर तुम्हाला हे सर्व त्रास नियंत्रणात ठेवायचे असतील,उद्या त्यांचं रूपांतर गंभीर आजारात होऊ दयायचं नसेल आणि निरोगी दीर्घायुष्य जगायचं असेल तर आंतरिक आरोग्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे.
✓ नुसतं "मी रोज एक तास चालतो" अशी शारीरिक क्षमतेशी निगडित कारणं देऊन उपयोग नाही किंवा "मला आत्ता काही होत नाहीये" अशी वरवरची कारणं देऊनही चालणार नाही.आंतरिक आरोग्यावर स्वतंत्रपणे बारीक लक्ष दिलं पाहिजे.
आरोग्य म्हणजे नक्की काय ? आधुनिक भस्मासुर, जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय,मंदार गद्रे,औषधांपासून मुक्ती देणारा डॉक्टर
अनेकदा आपल्याला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना जीवनशैलीचे आजार होताना दिसतात.आपण बोलून जातो,की "अरे, तिला कसा मधुमेह झाला? ती तर रोज चालायला जातेच,आणि योगासनंही करते." किंवा त्याला कसा उच्च रक्तदाब आणि हृदयविकार जडला? तो तर नियमित व्यायाम करतो,हिमालयात ट्रेकिंगलाही जातो.
शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हा फरक लक्षात घेतला तर आता ह्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. वरून शारीरिकरीत्या सक्षम दिसणाऱ्या व्यक्तीच्याही शरीरातल्या प्रक्रिया बिघडलेल्या असू शकतात.अर्थात-उत्तम आंतरिक आरोग्य आहे म्हणून तुम्ही उद्या सहज १० किलोमीटर पळू शकाल,उत्तम वजनं उचलू शकाल,किंवा डोंगर चढू शकाल असंही नाही.त्या प्रकारच्या शारीरिक क्षमता कमवायला तुम्हाला त्यांचा सराव करावाच लागेल.म्हणजेच,Fitness & Health are different. One cannot compensate for the other हे आपल्या लक्षात येतं.
शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखांमध्ये…!