* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/१/२४

मर्डर स्वतः चा / Murder itself...


हा मला नेहमी इथेच भेटतो, याचं नाव.... जाऊ दे.... नावात काय आहे ? 


उंची असेल साधारण पाच फूट,वर्ण सावळा, अगदीच किरकोळ बांधा आणि केस वाढलेले...


हा स्वतः भिक मागत नाही;परंतु जे लोक भीक मागतात त्यांच्या हातातून याला हवी असलेली गोष्ट तो ओढुन घेतो... नाही दिली तर त्यांना शिव्या देतो,प्रसंगी हात उचलतो... सर्वांसाठी अत्यंत उपद्रवी असा हा मुलगा ! 


साधारण चार वर्षांपूर्वी मला हा भेटला आणि कसं कोण जाणे ? परंतु याला माझा लळा लागला... 


माझ्याशी अत्यंत प्रेमाने अदबीने आणि नम्रतेने तो वागतो,प्रसंगी माझ्यावर हक्क दाखवतो... 


माझा कोणताही शब्द तो पडू देत नाही... बरं माझ्याकडून याची कोणतीही अपेक्षा नाही. 


का करत असेल माझ्यावर इतकं प्रेम ? याचा मी नेहमीच विचार करतो. 


इतरांना तो खूप त्रास देतो हे मला नेहमीच खटकतं परंतु तरीही हळूहळू मलाही त्याचा लळा लागला...


परंतु इतक्या दिवसात तो नेमका कसा आहे ?हे मी अजून ओळखू शकलो नाही.तो जेवढा राकट आणि रानवट आहे तितकाच तो हळवा आणि संवेदनशील आहे.... त्याची दोन्ही रूपं मी नेहमी अनुभवत असतो.


इतरांना किळसवाणे वाटेल असे ड्रेसिंग मी करत असताना मला येऊन अगदी तन्मयतेने मदत करतो... त्याला किळस वाटत नाही. 


हात पाय मोडलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या पेशंटला उचलून रिक्षा किंवा ॲम्बुलन्स मध्ये ठेवायला मदत कर,

म्हटलं तर त्या व्यक्तीला अजिबात दुखणार नाही,याची काळजी घेऊन फुलासारखे अलगद तो त्याला उचलतो... 


एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये सोडून ये; म्हणालो तर वाटेत जाताना त्याचा हात हातात घेऊन,कपाळावर हात ठेवून त्याला तो धीर देतो...


आणि बिथरला तर याच्या अगदी विरुद्ध.... हातात जे येईल ते घेऊन समोरच्या व्यक्तीला मारतो,मग त्याचा हात मोडो की पाय.... याला पर्वा नसते. 


मागच्या वेळी हातात मावणार नाही,एवढा मोठा दगड घेऊन तो एकाच्या डोक्यात घालायला निघाला होता वरच्यावर त्याचा हात मी अडवला.... 


पशुचे क्रौर्य आणि माणसातील माणुसकी अशा दोन्ही गोष्टी याच्यात ठासून भरल्या आहेत,कोणत्या वेळी हा नेमका कसा वागेल ? याचा काहीही भरवसा नसतो... मला अजूनही तो कळला नाही हेच खरं....! 


बऱ्याचदा फिल्मी स्टाईल मध्ये तो मला म्हणतो, 'तुमच्यासाटी काय पन करंल सर आपन ... तुमच्यासाटी एकांदा मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय ' 


प्रत्येक व्यक्तीमध्ये पशु आणि मानव दोघेही लपलेले असतात कोणत्या वेळी कोणी डोके वर काढायचे हे संस्कार ठरवतात....


आई-वडिलांचे छत्र लहानपणी हरवले,गरीब मावशीने सांभाळ केला... परिस्थितीशी झगडता झगडता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट उत्तर देत तो इथपर्यंत पोहोचला होता. जगणं हिच लढाई होते तेव्हा,संस्कार आपोआप माघार घेतात...


याच्यासाठी काहीतरी करायचं माझ्या डोक्यात होतं;परंतु काय करायचं आणि कसं करायचं हे कळत नव्हतं. 


एके दिवशी डोक्यात एक विचार घेवुन निघालो, तो भेटला... भेटला तसा, लहान मुलाप्रमाणे गळ्यात पडला... 


त्याला सहज विचारलं, 'तु नेहमी म्हणतोस ना? सर तुमच्यासाठी काय पण ... काय करू शकतोस तु माझ्यासाठी ?' 


'हो सर काय पन,तुमि सांगा,तुमच्यासाटी एकांदा  मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय '


५००० रुपयांची गड्डी त्याच्या खिशात ठेवत मी म्हणालो,'माझं एक काम होतं,करशील का ?'


'एक काय,धा कामं सांगा ना सर,तुमच्यासाटी काय पन ...  बोला ना काय करायचं ? तो बेफिकिरीने हाताच्या बाह्या वर घेत म्हणाला.


त्याच्या कानाजवळ जावून हळुच म्हणालो,'एक मर्डर करायचा आहे'


तो जवळपास उडालाच..'क्काय करायचं आहे ?' त्याने आश्चर्याने पुन्हा विचारलं. 


"म-र्ड-र" तिन्ही शब्दांवर दाब देत पुन्हा त्याच्या काना जवळ जाऊन म्हणालो.पहिले पाच हजार दिले आहेत पुढचे नंतर बघू...


त्याचा विश्र्वास बसेना....


'आवो सर काय बोलताय ? कुनाचा मर्डर करायचा ? 


'सांगतो '


'आनी कशासाटी?'


'ते हि सांगतो '


'आवो पन सर आज काय असं भंजाळल्यावानी बोलताय ?' तो वैतागुन म्हणाला. 


'का रे घाबरलास का ?'


याचे उत्तर त्याने दिलं नाही.... रस्त्यावर पडलेली एक काडी घेऊन तो बसल्या जागी रेघोट्या मारत विचार करायला लागला.त्याच्या मनात कदाचित द्वंद्व सुरू झालं असावं. 


'का रे घाबरलास ना ?' खांद्याला धरून त्याला हलवून म्हणालो. 


'तसं नाय वो सर,पन इतके दिवस मी तुम्हाला बगतोय,तुमि लोकांची सेवा करता,त्यांना जगवता आनी आज मर्डरच्या गोष्टी करू लागले...' तो भांबावून गेला होता .... कावरा बावरा झाला होता. 


त्याला म्हटलं,'इथं खूप गर्दी आहे बस गाडीवर,आपण दुसरीकडे जाऊन बोलू ....' आज पहिल्यांदाच तो अत्यंत नाखुशीने माझ्यामागे बसला.वाटेत जाताना म्हणाला,एक बोलू का सर?डॉक्टर म्हनुन तुमचं काम आहे माणसाला जगवणं... आज तुमि मर्डरची गोष्ट केली आपल्याला नाही आवडलं... आपल्या मनातून उतरले राव तुमि....' अत्यंत पडलेल्या आवाजात तो बोलत होता.गाडी चालवत असताना मला त्याचा चेहरा दिसत नव्हता;परंतु तो कसा झाला असेल,

याची मला कल्पना आहे. 


आपल्या मनात ज्यांच्याबद्दल आदर असतो, असे लोक चुकीचे वागायला लागले,की आदर नावाच्या भावनेचा फुगा फुटतो,त्याचंही नेमकं तेच झालं असावं...! 


मी त्याच्या मनातून पूर्णतः उतरलो होतो,याची मला जाणीव झाली.   


तरीही मी त्याला म्हणालो,'का रे ? तूच म्हणाला होतास ना तुमच्यासाठी मर्डर सुद्धा करू शकतो' 


'अवो सर आपुन भांडन मारामाऱ्या करतो शिव्या देतो,पण एकांद्या जीवाला आपुन कायमचे संपवू शकत नाय..आपुन तितके हरामी नाय....

तुमच्यासाटी मर्डर पन करू शकतो,याचा अर्थ मी तुमच्यासाठी काय पन करू शकतो असा होतो,  पन म्हनून काय खरंच तुमी माझ्याकडून मर्डर करून घेणार का ? 


गाडी थांबवून एका ठिकाणी त्याला बसवत म्हणालो,'ते काहीही असो,तुला एक मर्डर करायचा आहे... ऍडव्हान्स दिला आहे... 


'कुनाचा मर्डर करायचा आहे ?' त्याने चाचरत, रडवेल्या स्वरात विचारले. 


'तुझाच....'  त्याच्याकडे पाहत ठामपणे मी बोललो. 


'क्काय???' म्हणत जवळपास किंचाळत तो ओरडला. 


सुकलेलं पान अलगद गळून पडावं;तशी त्याची उरली सुरली सहनशक्ती आणि माझ्या बद्दलचा असलेला आदर आता गळून पडला.


xxxx माजा मर्डर करायला मलाच पैशे देतो ? थांब तु xxxx असा ऐकणार नाहीस.... तुला मी दाकवतोच आता.... साल्या तुला मी काय समजलो आणि तू काय निघालास...'


शिव्यांची लाखोली वाहत,मला मारण्यासाठी हातात काही सापडते का,ते तो आजूबाजूला शोधू लागला.... त्याचा अवतार आता भयानक झाला होता. 


त्याचा हात धरण्याचा मी प्रयत्न केला;परंतु त्याने माझ्या हाताला हिसडा दिला... तो आता आवरण्याच्या पलीकडे गेला होता...


थांब थांब,आता फक्त शेवटचं माझं बोलणं ऐकून घे;म्हणत महत्प्रयासाने मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.तोंडातून शिव्या अजुन सुरूच होत्या.तो ऐकेचना....


आता मात्र त्याच्या तोंडावर माझा हात दाबून अधिकारवाणीने म्हणालो, 'बास लय नाटक झालं तुझं...

आता दहा मिनिट मी काय सांगतो ते ऐकून घे,त्यानंतर पुन्हा शिव्या दे...


तो मुकाट्यानं बसला...


'ऐक,तू पहिल्यांदा मला भेटलास त्याला चार वर्षे झाली...का ते मला माहित नाही; परंतु तुझ्या मनात तू मला मानाचं स्थान दिलं... माझ्यासाठी तू वाटेल ते करायला तयार होतास. 


किळस येईल,अशा रुग्णांची सेवा तू पूजा केल्याप्रमाणे करत होतास,तुझ्या मध्ये मला देव दिसायला लागला. 


बिन आई बापाचा पोरगा तू.... मी तुझ्याकडे बापाच्या नजरेने पाहायला लागलो.माझाच मुलगा समजून मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करायला लागलो.हि झाली माझी बाजू;पण दुसऱ्या बाजूने तु जे काही इतरांच्या बाबतीत वागतोस,

त्यामुळे तू कोणालाही आवडत नाहीस. 


उठ सूट एखाद्याच्या डोक्यात दगड घालायची भाषा करतोस,एखादवेळी पोलिसांच्या तावडीत सापडलास तर जेलमध्ये माझ्या डोळ्यादेखत सडशील.... 


किंवा तुझ्यावर जी मंडळी नाराज आहेत तेच तुझा डोक्यात दगड घालून खून करतील.. ! 


ज्याला मी मुलगा समजतो,त्याच्या बाबतीत हे असं झालेलं मला आवडेल का ? 


ज्या दिवशी तू येत नाहीस ना,त्या दिवशी लोकांना आनंद होतो.... उद्या तु मेल्यावर हे लोक पेढे वाटतील... 


असलं कसलं आयुष्य रे... ? 


आपल्या असण्याने कोणालातरी आनंद होतो आणि आपल्या नसल्याने कोणालातरी दुःख होतं ते खरं आयुष्य...! आपण मेल्यावर लोकांनी रडावं असं वाटत असेल तर,आपण जिवंत असताना त्यांना हसवलं पाहिजे बाळा...


पण तू मात्र त्यांना कायम रडवतोस.... ! 


तुला वाटतं,तुला पाहून लोकांनी घाबरावं... तूझा दरारा निर्माण व्हावा....म्हणजे तू हिरो होशील.... 


येड्या,आपल्याला पाहून कोणालातरी भीती वाटते,

यापेक्षा आपल्याला पाहून कोणाची तरी भीती जाते,याचं सुख जास्त असतं मर्दा... खरा हिरो तो असतो... ! 


"भाई" व्हायला नाही; "भाऊ" व्हायला काळीज लागतं...


एखाद्याला ढकलून पाडायला ताकद नाही लागत .... पडलेल्या एखाद्याला हात देऊन उचलायला ताकद लागती बाळा.... 


त्याचा चेहरा आता बदलत चालला होता.... 


मला जाणवत होतं,त्याला बरंच काही कळतंय;  परंतु अजून बरंच समजायचं राहिलंय ....


बाळा,तुझ्या मध्ये ना,एक देवमाणूस लपला आहे; पण त्याच्या मागे एक ना- लायक, ना- करता, गुन्हेगार राक्षस सुद्धा बसला आहे... आत्तापर्यंत मला ज्या शिव्या दिल्यास ना.... त्या शिव्या तू त्याला दे,मला नाही... ! 


आतापर्यंत मी जो मर्डर करायचा म्हणतोय ना, तो याच राक्षसाचा.... !


त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं.... ! 


अजून फोड करून सांगणं आवश्यक होतं....


बाळा आपण केळ खातो... साली सकट खातो का ? साल काढून फेकून द्यावीच लागते ना ? नारळ फोडून खोबरे खातो... वरची करवंटी फेकून द्यावी लागते ना ? 


तसंच हे... तुझ्यात बसलेल्या राक्षसाला तुलाच बाहेर काढून फेकुन द्यावे लागेल... माणूस म्हणून तुला जगायचं असेल, तर या राक्षसाचा मर्डर तुलाच करावा लागेल.... कळतंय का ??? 


मला नेमकं काय म्हणायचंय,ते त्याला आत्ता उमगलं...त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि अक्षरशः एखाद्या लहान पोरागत रस्त्यावर माझ्या कुशीमध्ये येऊन तो ढसाढसा रडायला लागला...


'ए सर,आपल्याला आय बाप नाहीत,तु आपला बापच झाला राव,आपल्याला याआधी आसलं साल्लं कुणी सांगितलं नाही,अपुन त्या राक्षसाला आता खल्लास करणार... बघ तु... पन तु ऱ्हाशील ना आपल्या सोबत कायम ???' 


मी त्याला जवळ ओढून पाठीवर थोपटत राहिलो...


त्याच्या चेहऱ्यावर आता वेदना होत्या....


असणारच की.... नारळावर नको असलेले केसर उपटून ओढून काढताना त्या नारळाला सुद्धा वेदना होतच असतील की... हापूस आंब्याला,मीच फळांचा राजा आहे;हे सिद्ध करण्यासाठी,हृदयातून आरपार सुरी फिरवून स्वतःच्या फोडी करून घ्याव्याच लागतात.... 


इथं स्वतःच्या शरीरात लपलेल्या राक्षसाला ओढून काढून त्याचा "वध" करायचा होता,मग वेदना तर होणारच की.... 


आज त्याने स्वतःतल्या राक्षसाला ओढून बाहेर काढले....  A Perfect Murder... !!!


तिकडे तो रडत होता आणि इकडे मी खदाखदा हसत होतो, डोळ्यादेखत एक "मर्डर" होऊन सुद्धा....! यानंतर या पाच हजार रुपयांमध्ये,रस्त्यावरच मोबाईल ॲक्सेसरीज (हेडफोन, मोबाईलचे कव्हर इत्यादी) विकण्याचा व्यवसाय त्याला आपण टाकून दिला. 


तो आता हा व्यवसाय करतो,जमेल तेव्हा येऊन मला मदत करतो आणि सर्वात महत्त्वाचं,म्हणजे कोणाच्याही हातातून कोणतीही वस्तू तो हिसकावून घेत नाही,उलट येताना त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो...! 


हल्ली तो "आनंद" वाटत फिरतो... !!! 


"आनंद मरता नही" किती खरं आहे हे वाक्य...! 


"हा"' कधी येतो....  म्हणून आज लोक त्याची वाट बघतात...


हि नवनिर्मिती पाहताना; बाप झाल्याचा मला पुन्हा आनंद होतो... पुन्हा आनंद होतो.... पुन्हा पुन्हा आनंद होतो...! 


या सर्व घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले...! 


मागच्या महिन्यामध्ये मला तो भेटला आणि म्हणाला, 'सर पुढच्या महिन्यामध्ये माझा "बड्डे" आहे...'


बड्डे... वाढदिवस... ! 


वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन वाढ झालीच पाहिजे असं काही नाही... बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा ऱ्हास झाला तरी ती शेवटी वाढच असते....कणाकणाने रात्र संपत जाते तेव्हाच तर सूर्य उगवतो,...तिरस्कार नाश पावतो,तेव्हाच तर प्रेम निर्माण होतं...


यानेही याच्यातल्या राक्षसाला संपवले, म्हणून आज तो माणूस म्हणून उभा आहे...!!!


हि सर्व प्रक्रिया अत्यंत शांततेत घडली होती.... 


बीज रुजताना आवाज होत नाही.... झाड मोडताना कडाड - धडाड करुन धरणीकंप झाल्यासारखा आवाज होतो.... निर्मिती शांततेत होत असते.....आवाज विनाशाला असतो...!


माणूस होण्याची हि "नवनिर्मिती" अत्यंत शांततेत घडली होती आणि ही नवनिर्मिती आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेट करायची ठरवली...


मधल्या काळात सौ.तेजस्विनीताई सुगंधी,यांचा मला फोन आला,त्या म्हणाल्या,'माझ्या मुलीची एक जुनी परंतु अत्यंत उत्तम कंडीशन मधील सायकल आहे ती तुम्हाला द्यायची आहे,त्याचे योग्य काय ते करावे'


वर वर्णन केलेला संपूर्ण प्रसंग हा ४ जानेवारी २०२३ चा आहे... याच दिवशी तो माणसात आला होता आणि म्हणून हिच त्याची जन्मतारीख असं मी समजतो.... 


यानंतर ४ जानेवारी २०२४  रोजी साईबाबा मंदिर,सातारा रोड येथे मी "त्याला" बोलावलं.


केक आणून त्याचा "बड्डे" सेलिब्रेट केला .... 


तेजस्विनी ताईंनी दिलेली सायकल त्याला भेट म्हणून दिली... 


ज्यांना तो यापूर्वी त्रास द्यायचा,असा समस्त भिक्षेकरी वर्ग त्याच्या वाढदिवसाला उपस्थित होता.... 


गंमत म्हणजे या समस्त वर्गाने त्याच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना केली...! 


सायकल दिल्यानंतर माझा हा मुलगा म्हणाला, 'सर आंदी तुम्ही सायकल चालवा,आन मंग मला द्या....


त्यात त्याची काय भावना असेल माहित नाही.... 


पण बऱ्याच वर्षानंतर मी सुद्धा सायकल चालवण्याचा आनंद घेतला...! 


कार्यक्रम संपला... मी निघालो... 


जाताना तो जवळ आला ...पाया पडला... म्हणाला, 'सर कुच काम होना तो बोलना...'


मी म्हणालो, 'एकच मर्डर करायचा होता... तो तू केलास .... आता माझं काही काम नाही तुझ्याकडे...' 


'बस क्या सर' म्हणत हसत तो पुन्हा कुशीत आला... 


यावेळी तो हसत होता आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते...


पोराच्या "जेवणाचा" विचार करते ती आई असते,

परंतु पोराच्या अख्ख्या "जीवनाचा" विचार करतो तो बाप असतो... ! 


या पोराला जन्माला घालून,आज मी परत बाप झालो.... परत परत बाप झालो....! 


जाताना त्याने केकचा तुकडा भरवला... मी तो मटकन खाऊन टाकला... हे सेलिब्रेशन होतं, माझ्या बाप होण्याचं... !!! 


मी गाडीला किक मारली... निघालो... संध्याकाळची गार हवा बोचत होती ....आणि डोक्यात गाणं वाजत होतं.... साला मै तो बाप बन गया... ! 


४ जानेवारी गुरुवार २०२४


डॉ.अभिजित सोनवणे,

डॉक्टर फॉर बेगर्स,

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तुमचा जन्म होणं ही दहा लाखातली एक गोष्ट आहे…


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अस्तित्व हाच इतका मोठा चमत्कार आहे की,तो लक्षात घेत तुम्ही साजरा केला पाहिजे.कारण तुमची आई तिच्या आयुष्यात दहा लाख अंडज वागवते.तुम्ही जो गणितीय चमत्कार आहात त्याच्या जवळपासही फिरकत नाही ही संख्या अलीकडे झालेल्या संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की,ज्या अंडजामुळे तुम्ही जन्माला आलात,त्या अंडजाने तुमच्या पित्याच्या २५ कोटी शुक्राणूंपैकी कुणाशी जोडून घ्यावं,हे ठरवताना अतिशय चोखंदळपणा दाखवला होता.तुमची निर्मिती करणाऱ्या अंडजाने दुसरा एखादा शुक्राणू निवडला असता,तर आज तुम्ही इथे नसता,कारण तुमचा कधी जन्मच झाला नसता.म्हणजे तुमचा जन्म हा एखाद्या चमत्काराहून कमी नाही. 


मेल रॉबिन्स द हाय फाईव्ह हॅबिट,या पुस्तकातील उतारा..।


आजचा हा लेख २४९ वा पृष्ठ संख्या - १३२१४

हा ब्लॉग मला भेट देणारे आमचे निर्मळ,प्रेमळ,

मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा आज जन्म दिवस त्यांना जन्मदिवसाचे आनंदी अभिष्टचिंतन…


७/१/२४

लॉटरी ती ही झाडांची.. The lottery is that of trees

झाडं आपलं आंतरिक संतुलन सांभाळून असतात.

आपल्या शक्तीचा वापर ते अत्यंत काळजीपूर्वक करतात आणि ऊर्जेचा वापर काटकसरीने होतो.

यामुळे आपल्या सर्व गरजा ते पुरवू शकतात.आपली वाढ करण्यात त्यांची काही ऊर्जा खर्च होते.बुंध्याचा घेर आणि आपली उंची झाडाला वाढवायची असते. त्यासाठी फांद्या वाढायला हव्यात आणि वाढतं वजनही त्यांना सांभाळायचं असतं.या कामासाठी ऊर्जा वापरून झाली की स्वसुरक्षेसाठी काही ऊर्जा राखून ठेवली जाते. या ऊर्जेचा वापर करून त्यांना आपल्या भक्षकांवर रासायनिक मारा करून थोपवता येतं. आणि यानंतर प्रश्न उरतो तो आपल्या वंशवाढीचा.


ज्या प्रजाती दरवर्षी फुलतात,त्यांना वंशवृद्धीच्या दुष्कर उपक्रमाचे नियोजन करताना ऊर्जेचा सांभाळून विचार करावा लागतो.दोन-पाच वर्षातून एकदाच फुलणाऱ्या बीच आणि ओक सारख्या प्रजातींसाठी प्रजोत्पादनाचा काळ त्यांचं ऊर्जेचं गणित बिघडवू शकतं.जवळपास सर्वच ऊर्जा जीवनावश्यक कामांसाठी वापरली गेलेली असते आणि त्याउपर त्यांना मोठ्या प्रमाणात

बीजोत्पादनही करायचं असतं.आणि मग फुलं फुलवण्यासाठी फांद्यांमध्ये जागेची चढाओढ चालू होते.भरगच्च फांद्यांवर फुलांसाठी अजिबात जागा नसली तरी ती करावी लागते. जेव्हा पानं कोमेजून गळून पडतात तेव्हा झाडं अगदी ओसाड दिसू लागतात.अशा जंगलाकडे बघणाऱ्याला वाटेल की झाडांची अवस्था अगदीच बिकट आहे.पण जंगल आजारी नसतं, या काळात ते फक्त हळवं होतं.

आपली सर्व शक्ती पणाला लावून बीजोत्पादन करण्याच्या प्रयत्नात झाड असतं आणि त्यात झाडाला पानं कमी असतात त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होतं.आणि असलेली साखर बियांमधील तेल आणि चरबी वाढवण्यात खर्ची पडते.त्यामुळे दैनिक गरजा भागवण्यासाठी,

थंडीपासून सुरक्षेसाठी आणि आजारांना प्रतिकार करण्यासाठी फारशी साखर उरत नाही.


अनेक कीटक याच क्षणाची वाट पाहत असतात. उदाहरणार्थ,बीच वृक्षावर'लिफ माइनिंग वीव्हील'नावाचा कीटक येतो आणि कोवळ्या हतबल पानांवर त्याची मादी आपली लाखो अंडी घालून जाते.अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानाच्या दोन पृष्ठभागांमधल्या भागावर ताव मारते आणि खाता खाता तपकिरी रंगाचे पानाचे अवशेष सोडून पुढे जाते.मोठे झाल्यावर यांचे किडे पानाला भोकं पाडत पान खात सुटतात. बघणाऱ्याला वाटेल की पानांमधून बंदुकीची गोळी गेली की काय.एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात कीटकांची पैदास होते तेव्हा बीचचे जंगल हिरवे न दिसता तपकिरी दिसू लागतं. सर्वसाधारणपणे यांच्यापासून सुरक्षा करण्यासाठी झाड आपली पानं कडवट करतात खरे,पण सर्व ऊर्जा फुलोऱ्यात खर्च झाल्यामुळे या वेळेस त्यांना शांतपणे भक्षकांची मेजवानी सोसावी लागते.


सशक्त झाडांना याचा फारसा त्रास होत नाही कारण त्यांना पुन्हा तब्येत सुधारण्यासाठी काही वर्षं मिळणार असतात.पण जर एखादं बीच झाड कीटकांच्या आक्रमणाच्या आधीच आजारी असेल तर मात्र त्याचं काही खरं नाही.याची जाणीव असतानाही झाड फुलोरा फुलवण्यात काटकसर करीत नाही.जंगलातील झाडांचा मृत्युदर वाढलेला असताना असं दिसतं की सर्वांत जास्त बाधित वृक्षांवर सर्वाधिक फुलोरा असतो.वढून आपली जनुकीय परंपरा संपून जाण्यापेक्षा आपल्या फुलांतून प्रजोत्पादन करून काही टिकून राहावी असं त्यांच प्रयोजन असणार. एखादा अपवादात्मक तीव्र उन्हाळा आला तर जंगलाचं चित्र असंच काहीसं होतं.कोरडा दुष्काळ पडून गेला की बरीच झाडं मरणपंथाला लागतात.पण ती सगळी या अवस्थेतही पुढल्या वर्षी सर्व शक्ती एकवटून फुलारतात.मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन झालेलं वर्ष इतकंच सांगून जातं की इथे गतवर्षी काय परिस्थिती होती.येणारा हिवाळा कसा असेल याचा अंदाज त्यावरून लागत नाही. पुढे येणाऱ्या पानझडीच्या ऋतूत या झाडांच्या कमकुवत सुरक्षा क्षमतेचा परिणाम त्यांच्या बीजातून दिसून येतो.लिफ मायनर कीटक बीच फुलाबरोबरच त्याच्या फळावरही ताव मारतात.त्यामुळे जरी बीचच्या दाण्याची टरफले दिसू लागली तरी आत दाणा तयार होत नाही.


जेव्हा झाडातून बीज जमिनीवर पडतं तेव्हा त्याने कधी रुजावं याची प्रत्येक प्रजातीची वेगळी चाल असते.ते कसं? जर बीज मऊ,ओलसर जमिनीवर पडलं तर सूर्यप्रकाश मिळून ते उबदार झालं की त्याला लगेच रुजावं लागतं,नाहीतर एखादं भुकेलं रानडुक्कर किंवा हरिण त्याला फस्त करून टाकेल.

बियांची कवचं जंगलात विखुरलेली असतात आणि काही काळाने कुजून जातातं.बिजांचं रूपांतर लगेच रोपात झालं तरच भक्षकांपासून बिया सुरक्षित राहतात.बीज रुजण्याची ही चाल बीच आणि ओकसारखी मोठी झाडं खेळतात.या मोठ्या झाडांकडे फक्त ही एकच चाल असते त्यामुळे सूक्ष्म किटाणू आणि बुरर्शीपासून संरक्षणासाठी त्यांच्याकडे काहीही दूरगामी उपाययोजना नसते.


पण इतर काही प्रजाती आपल्या बियांना रुजण्यासाठी एक-दोन वर्षंही देतात.या चालीत बिजाला खाऊन टाकलं जाण्याचा धोका असतोच,पण या चालीचे फायदेही

आहेत. उदाहरणार्थ,जर पाऊस झाला नाही तर रुजलेल्या बीचं रोपटं मरून जातं आणि झाडांची सगळी मेहनत वाया जाते किंवा एखादं हरिण परिसरात चरायला आलं असेल तर त्या बिजाचं कोवळं रोप चटकन त्याच्याकडून खाल्लं जाऊ शकतं.याउलट जर एखाद्या झाडाचं बीज एक-दोन वर्षं जमिनीवर न रुजता तसंच राहिलं तर त्याचा धोका थोडा कमी होतो आणि किमान काही बिया रुजून त्यांची रोपं तरी मोठी होऊ शकतात.बर्ड चेरीच्या झाडाच्या बिया पाच वर्षांपर्यंत जमिनीवर नुसत्याच पडून राहू शकतात.अनुकूल परिस्थितीची ते शांतपणे वाट बघतात.बर्ड चेरी आद्यप्रवर्तक प्रजातीचे झाड असल्यामुळे ही चाल त्यांच्या दृष्टीने सगळ्यात कमी जोखमीची असते. 


बीच आणि ओक वृक्षाच्या फळांचे दाणे आपल्या आईच्या छायेतच पडलेले असतात.तिथे त्यांना अपेक्षित हवामान आणि परिस्थिती मिळाल्यामुळे त्यांची रोपं तिथंच वाढतात.पण बर्ड चेरीच्या बिया मात्र कुठेही जाऊन पडतात. याची फळं पक्षी खातात आणि बियांना त्यांच्या विष्टेच्या रूपातील सेंद्रिय खताच्या पाकिटात बंद करून जमिनीवर सोडतात.या पाकिटांच्या नशिबात जर कोरडी हवा आणि कडकडीत ऊन असलं तरी काही वर्षं पाकिटातच बिया जिवंत राहू शकतात आणि अनुकूल परिस्थिती येताच त्यातील थोड्या तरी बिया पुनरुज्जीवित होऊ शकतात.


पण नुसतं रुजून काय उपयोग? त्यापैकी किती जण मोठे होतील आणि पुढची सुदृढ पिढी जंगलात उभी राहील,

याचा हिशोब तसा सोपा आहे.सांख्यिक भाषेत बोलायचं तर प्रत्येक झाडाला आपली जागा घेण्यासाठी एकतरी पिल्लू मोठं करायचं असतं.ज्यांना मोठं होता येत नाही त्या बियांची रोपटी काही वर्षं तग धरतील खरी,पण कालांतराने त्यांची ताकद संपेल.अनेक झाडांच्या पायथ्याशी अशी शेकडो रोपटी असतात जी काही वर्षं तग धरतात आणि कुजून पुन्हा मातीचा घटक होऊन जातात.

मोकळ्या जागेत येऊन पडलेली काही थोडीच नशीबवान रोपटी प्रौढत्वाला पोहोचतात.


आपण हा सांख्यिक खेळ जरा पुन्हा पाहू.एक बीच वृक्ष किमान तीस हजार दाणे तरी बनवतो (हवामान बदलामुळे सध्या दर दोन-तीन वर्षांनी असं होत आहे,पण त्याच्याबद्दल आत्ता बोलायला नको).साधारण वयाच्या ऐंशी ते दीडशे वर्षांच्या काळात त्याला प्रजोत्पादन शक्य असतं.वाढ होत असताना झाडाला किती सूर्यप्रकाश मिळाला,यावर हे अवलंबून असतं. समजा,एक झाड चारशे वर्षांपर्यंत जगलं तर किमान साठ वेळा फळाला येऊन सुमारे अठरा लाख बिया बनवेल.यातून फक्त एकच विशाल वृक्ष होणार असतो.जंगल परिसंस्थेच्या संदर्भात हा यशाचा दर उत्तमच आहे.म्हणजे त्या नशीबवान रोपट्याला लॉटरी लागण्यासारखंच आहे.इतर सर्व इच्छुक रोपटी भक्षकांकडून खाल्ली जातात किंवा सूक्ष्म किटाणूंनी त्यांना कुजवून टाकलेलं असते.अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही रोपट्याचं वृक्ष होण्याची शक्यता काय आहे,ते आता पाहू.यासाठी पॉपलर झाडाचं उदाहरण घेऊ.एक मोठा पॉपलर वृक्ष दरवर्षी साधारण साडेपाच कोटी बिया बनवतो.१७ त्यातून तयार झालेल्या इवल्याशा पॉपलर रोपट्यांना बीचच्या रोपट्यांची जागा घेण्याची नक्कीच इच्छा होत असेल.पण संख्याशास्त्रानुसार पॉपलरच्या रोपट्यांमधूनही फक्त एकच विशाल वृक्ष होऊ शकतो.


०३.०१.२४ या लेखातील पुढील लेख..

५/१/२४

एक गोष्ट राजर्षी शाहूंची.. One thing about Rajarshi Shahu..

आबालाल यांची कला जिवंत केली.


करवीरच्या या पावन भूमीत कला पेरण्याचे -उगविण्याचे - तिला फुलविण्याचे थोर कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केल्यामुळेच या नगरीला 'कलानगरी' असे संबोधले जाते. महाराजांच्या औदार्याने व कलाकारांच्या उत्साहाने सर्व प्रकारच्या कला बहरात येऊन त्यांनी अक्षय कीर्ती संपादन केली.नाटक,गायन, चित्रकला या इतक्या फुलल्या की या कलांनी कोल्हापुराचे नाव देशभरात पोहोचविले,तर कुस्तीने तर मुकुटच चढविला.महाराजांची नजर शोधक असल्यामुळे ते अचूक व योग्य माणसांची निवड करण्यात निष्णात होते.आबालाल रहेमान अर्थात पेंटर यांची निवड अशीच केली गेली.जन्मतःच आबालाल यांना चित्रकलेचे अल्लाने दान दिले असले तरी त्यांचे श्रेष्ठत्व पारखून,त्या कोहिनूर हिऱ्याला उजेडात आणण्याचे व मार्गी लावण्याचे काम राजर्षांनी केले म्हणूनच आबालाल रहिमान सर्वांना कळले.

आबालाल हे चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईला गेले होते.त्या ठिकाणी त्यांनी चित्रकलेत विशेष प्रावीण्य मिळविले. अशा या आबालाल यांच्यावर मुंबईत अन्याय झाला.चित्रकलेतील आपली सिद्धहस्तता जाणून त्यांचा विश्वास होता,की आपण परीक्षेत प्रथम येणार,पण प्रथम क्रमांक एका श्रीमंत व वशिल्याच्या मुलाला देण्यात आला व दुसरा क्रमांक आबालाल यांना देण्यात आला.या कृत्याने आबालाल यांचे मस्तक फिरले.यासाठी त्यांनी तत्कालीन परीक्षाप्रमुखांशी वादही घातला.त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही.


निराश,नाराज,घायाळ झालेले आबालाल कोल्हापूरला परतले.अन्यायाचा आबालाल यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला.ही घटना शाहू महाराजांना समजली.त्याच आबालालला आत्ताच आपण कार्यमग्न ठेवले तर कोल्हापूरचा हा चित्रकार या नगरीचे नाव लौकिकास नेईल, असा विचार करून त्याला बोलाविणे पाठविले.


"काय आबालाल, काय करतोस तरी काय?"


"जी, काही नाही."


"काही नाही म्हणून कसे चालेल ? अरे,तू उत्तम कलाकार आहेस.काहीतरी केलेच पाहिजे,मेरी बात सच है या नहीं? तुम्हारे जैसे कलाकार हमारे राज्य की शान है।"


प्रत्यक्ष छत्रपतींनी आपल्या कलेची प्रशंसा केल्याबद्दल त्यांच्यात विश्वासाचा अंकुर फुटला. नाराज चेहऱ्यावर हळूच हास्याची लकेर उमटली. त्या जाणत्या राजाने त्या लकेरीची क्षणात पहचान घेतली व जवळ जात आबालाल यांच्या पाठीवर थाप मारून आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न केला.आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे  मूळ आहे.वृक्षाची मुळे जो-जो भूमीत खोल जातात,तो-तो वादळाशी झुंज देण्यास तो समर्थ होतो,याची जाण महाराजांना असल्यामुळे त्यांनी शाब्दिक खतपाणी घालण्याचे काम चालू ठेवले.जसा तो फुलोरा फुलला हे महाराजांच्या ध्यानी आले,त्या वेळी त्यांनी आबालाल यांना सरकारी शाळेत चित्रकलेचा शिक्षक म्हणून काम करण्यास सांगितले.महाराजांची आज्ञा त्यांनी स्वीकारली.

आबालाल हे स्वतःच्या मनाचे राजे नव्हे तर सम्राटच होते.मनाला आले तर शाळेत काम करणार,नाही तर भ्रमंती करीत फिरणार याची जाण महाराजांना इतरांनी करून दिली होती. असे इतर लोक महाराजांना आबालाल यांना नोकरीतून काढून टाकण्यासंबंधीपण सुचवीत असत.महाराज अशा हुजऱ्या- मुजऱ्या- खूशमस्कऱ्यांवर कधीही विश्वास ठेवीत नसत. प्रत्येक बाबतीत अनुभवाला ते अधिक प्राधान्य देत.

'अनुभव राहाणीविण कायसे श्रवण। गर्भअन्ध नेणे रत्नाकरण।।" (ज्ञानदेव) असे त्यांचे मत होते.

जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही.जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासातही होत नाही,ते कटू असलेल्या अनुभवातच होते.


एक दिवस महाराजांनी आपल्या खडखड्यातून सकाळी साधारणपणे ११ वाजता सोनतळीहून बाहेर पडून कोल्हापूरकडे प्रयाण केले.खडखड्यातून जाता जाता महाराज विचार करू लागले.आबालाल यांच्यासारखा जन्मजात कलाकार वाया जात आहे,याला काय करावयाचे?संपूर्ण जगताकडे जरी उत्तरे नसली तरी महाराजांच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर होतेच.

खडखड्यातून जाताना अचानक रस्त्याच्या कडेने आपल्याच धुंदीत हा आबालाल कलाकार जात असलेला महाराजांनी पाहिला. खडखडा थांबविला.


"महाराज" आबालाल म्हणाले,


"अरेऽऽ आबालाल,कहाँ जा रहे हो? चलो, आओ,गाडी में बैठो।"


महाराजांच्या हुकमाचा धनी बनून आबालाल न बोलता खडखड्यात बसले.खडखडा आज वेगाने गाववेशीच्या बाहेर कोठेही न थांबता सुटला.महाराजांचा जाणारा खडखडा आज वेगाने कोठे चालला आहे?याचा जनतेला प्रश्न पडला.जनतेला तरी याचे उत्तर कोठून माहीत असणार? सरळ खडखडा आला तो ज्या ठिकाणी बाज,बहिरी,लगड,शिकारी पक्ष्यांना पक्षी व प्राणी यांची शिकार कशी करावयाची असते याचे ट्रेनिंग दिले जात होते या ठिकाणी येऊन खडखडा थांबला.


इथे आल्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून बहिरी या पक्ष्याला आकाशात खूप उंचीवर उडविण्यात आले.

त्या ठिकाणी तो स्थिर झाला.त्याने इतस्ततः पाहिले तर त्याला आपल्या खालून एक पक्षी जात असल्याचे दिसले.क्षणाचीही उसंत न घेता तीराप्रमाणे झेप घेऊन त्या बहिरी ससाण्याने पक्ष्याला जमिनीवर आणून लोळविले.बहिरी ससाण्याचा हा पराक्रम,ही झेप महाराजांनी अनेक वेळा पाहिली होती.


आबालाल यांना महाराज म्हणाले,"इस शिकार का तू क्या चित्र निकाल सकता है?"


क्षणात उत्तर दिले,"क्यों नहीं महाराज!"


महाराज एकदम प्रसन्न झाले.म्हणाले. "व्वा! व्वा! मला वाटलंच होतं,तू निश्चित चित्र निकालेगा! अभी निकालेगा?"


"जरूर निकाल सकता हूँ,पर मेरे पास कागज, पेन्सिल नहीं।"


"तुम बैठो यहाँ,तुला हवे ते सर्व आणून देतो."


महाराजांनी तिथे असलेल्या एका घोडेस्वाराला पाठवून हवे ते साहित्य मागवून घेतले.चित्र काढण्यासाठी आबालाल त्या ठिकाणी बसले. चित्र पूर्ण होण्यास बराच वेळ लागणार,हे जाणून त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करून महाराज निघून गेले.शाहूंच्या आठवणी,प्रा.नानासाहेब साळुंखे,वृषाली प्रकाशन,कोल्हापूर


आज आबालाल यांची अशी चित्रे जी पाहावयास मिळतात ती महाराजांनी अशा प्रकारे काढून घेतली.तसेच आबालाल यांची पंचगंगेच्या काठावरची देवळांची,

निसर्गसौंदर्याची चित्रे दिसतात तीही महाराजांनी प्रत्यक्ष नेऊन वरीलप्रमाणे काढावयास लावली.आबालाल यांच्यासारख्या महान कलाकार जो वाया चाललेला होता,त्याला त्यांनी उभा केला, फुलविला व त्यांच्या हसऱ्या कलेचे सौंदर्य पाहून आपण आजही म्हणतो,"व्वा! आबालाल,तुम कोल्हापूर की शान हो।'' पण या 'शान'च्या मागे शाहू महाराज होते ना.!

३/१/२४

स्नेह झाडांचा.. Love trees.. 🌳

झाडं आपलं जीवन संथपणे जगत असतात,हे त्यांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेकडे पाहूनही जाणवतं.

त्यांच्यामध्ये प्रजननाचे नियोजन सुमारे एक वर्ष आधी सुरू होतं.पण सर्वच झार्ड आपला प्रणय वसंत ऋतूत सुरू करीत नाहीत.हे कोणत्या ऋतूत होणार ते त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतं.


सूचीपर्णी वृक्ष दरवर्षी एकदा तरी बीजोत्पादन करतात,

पण पानझडी वृक्षांचं तसं नसतं.येत्या वसंतात फुलायचं का एखादा वर्ष धीर धरायचा, यावर पानझडी जंगलात एकमत झालेलं असतं. एकाच वेळी फुलणं जंगलातील वृक्षांना पसंत असतं, कारण अशा परिस्थितीत योग्य प्रकारे जनुकीय देवाणघेवाण होऊ शकते. याबाबतीत पानझडी आणि सूचीपर्णी वृक्षांत साम्य आहे. पण पानझडी वृक्षांना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो,ती म्हणजे रानडुक्कर आणि हरणांसारखे पाला भक्षक!


या दोन्ही प्राण्यांना बीचचे दाणे आणि ओक वृक्षाच्या बिया पसंत असतात कारण त्यांचे सेवन करून छान चरबी चढते.तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी चरबी उपयोगी पडते.या दाण्यांमध्ये पन्नास टक्के तेल आणि पिष्टमय पदार्थ असतात,जे इतर कोणत्याही खाद्यातल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.


त्यामुळे वसंत ऋतूत जंगलात पडलेल्या बिया जनावरां

कडून पूर्णपणे फस्त केल्या जातात आणि पुढल्या ऋतूत बीच किंवा ओकचं एकही रोपटं रुजत नाही.आणि म्हणून झाडं एकमताने आपल्या प्रजननाचे नियोजन आगाऊ करून ठेवतात.दरवर्षी न फुलण्याचा फायदा असा की त्यावर्षी शाकाहारी प्राण्यांचा अन्नपुरवठा कमी होतो,

ज्यामुळे गरोदर जनावरांना पोषण कमी मिळतं.अशा परिस्थिती प्राण्यांच्या पैदासावर अंकुश लागतो.पुढल्या वर्षी जेव्हा बीच आणि ओक वृक्ष फुलतात त्या वेळेस जनावरांची संख्या कमी असल्यामुळे काही बिया तरी शिल्लक राहतात आणि रुजून नवीन रोपटी जन्म घेऊ शकतात.ज्या वर्षी बीच आणि ओक वृक्षांना बिया धरतात त्या वर्षाला 'मास्ट वर्ष' म्हणतात


या काळात मुबलक अन्नपुरवठा असल्यामुळे रानडुकरांची पैदास तिप्पट होऊ शकते.याचा फायदा घेत पूर्वीचे युरोपियन शेतकरी रानडुकरांचेच नातेवाईक म्हणजे पाळीव डुकरांना जंगलात नेऊन त्यांना बियांवर ताव मारू देत असत.भरपूर बिया खाऊन लठ्ठ झालेल्या पाळीव डुकरांची मग कत्तल केली जात असे.मास्ट वर्षानंतरच्या वर्षात बीच आणि ओक वृक्ष फुलोत्पादनाला सुट्टी घेत असल्यामुळे रानडुकरांची संख्या कमी होत असे.पण जर का या वृक्षांनी सलग काही वर्षं प्रजनन प्रक्रियेला सुट्टी दिली तर मात्र कीटकांच्या,विशेषतः मधमाश्यांच्या संख्येवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.

भाकड वर्षात जे संकट रानडुकरावर येतं तेच मधमाशांवरही ओढवलं जातं.पण पानझडी जंगलात मधमाशा फार मोठ्या प्रमाणात प्रजनन करून ठेवत नाहीत, कारण उत्तम प्रतीच्या जंगलाला या चिमुकल्या मदतनीसांची फार गरज नसते,काही वर्ष फुलोत्पादन न झाल्यामुळे कमी संख्येने जिवंत असलेल्या मधमाशा परागीभवनात कितीशी मदत करणार? बीज किंवा ओक वृक्षांसाठी परागीभवनाची सशक्त आणि भरवशाचीच पद्धत हवी.मग यासाठी वाऱ्यापेक्षा अधिक योग्य काय असेल? सूक्ष्म परागकणांना वारा दूर-दूर घेऊन जातो.

तापमान सुमारे ५३ अंश फॅरनहाईट झालं की मधमाशा बाहेरही पडत नाहीत. पण या थंडीतही वारा परागी

भवनाचे काम करू शकतो,हा त्याचा मोठा फायदा आहे.

मगाशी म्हटल्याप्रमाणे सूचीपर्णी झाडं साधारण दरवर्षी फुलतात.मधमाशांना जर दरवर्षी खाद्य मिळालं तर त्या हमखास परागीभवन करत राहतात. सूचीपर्णी झाडं उत्तरेकडे जास्त आढळतात आणि तिथे मधमाशांना सहन न होणारी थंडी असते.आणि म्हणूनच बीच आणि ओकची झाडं वाऱ्यावरच विसंबून राहतात.बीच आणि ओक सारखे दरवर्षी न फुलण्याचे तंत्र सूचीपर्णी झाडांना आत्मसात करायची गरज नसते,कारण त्यांना रानडुकरं आणि हरणांकहून काही धोका नसतो.स्प्रूस वृक्षाच्या कोन मधल्या बारीक बिया मधमाशांना फार पोषण पुरवू शकत नाहीत.इथे रेड क्रॉसबिल सारखे काही पक्षी असतात जे आपल्या वाकड्या चोचीने स्प्रूसचा कोन अलगदपणे उघडून आतल्या बिया खाऊ शकतात.असं असलं तरी ह्या झाडांना पक्ष्यांचा तितकासा त्रास होत नाही.स्प्रूसच्या बियांना एक छोटा पंख असतो.सूचीपर्णी बिया थंडीसाठी साठवून ठेवून खाणारे कोणीच प्राणी इथे नाही त्यामुळे ही झाडं आपल्या बिया बिनधास्तपणे वाऱ्याबरोबर सोडून देतात.त्यांच्या फांद्यांवरून अलगदपणे या बिया खाली पडू लागतात तेव्हा हळूच एखाद्या वाऱ्याची झुळूक त्यांना दूरवर नेऊन सोडते.स्प्रूसचे वृक्ष प्रचंड संख्येत परागाचे उत्पादन करतात.जणू त्यांना पानझडी वृक्षांच्या स्पर्धेत बाजी मारायची असते.त्यामुळे थोडा जरी वारा आला की सूचीपर्णी जंगलातून परागाचे ढग निघाल्यासारखे दिसतात.झाडांच्या छत्री खाली आगीची धग असल्या

सारखे हे दृश्य दिसते.पण इथे प्रश्न उद्भवतो की अशा परिस्थितीत इनब्रीडिंग म्हणजे निषिद्ध प्रजनन कसं टाळता येईल? पृथ्वीच्या इतिहासात आजपर्यंत झाडांनी तग धरली आहे कारण त्यांनी आपली जनुकीय विविधता उत्तम रीतीने प्रगत केली आहे.

जंगलातून मोठ्या संख्येने एकाच वेळी पराग सोडले गेले की ते एकमेकांत मिसळून जातात.एका झाडाने सोडलेल्या परागकणांचे पुंजके झाडाजवळच जास्त प्रमाणात असल्याने ते स्वतःच्याच मादी फुलांना फलित करून घेण्याचा धोका असतो.पण झाडांना हे नको असतं,त्यामुळे असं होऊ नये यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या आहेत.


स्प्रूस सारख्या काही प्रजाती वेळेचा अचूक वापर करतात.

नर आणि मादी फुलं काही दिवसांच्या फरकाने उमलतात त्यामुळे मादी फुलांना इतर झाडांचे पराग मिळणं शक्य होतं.ही गोष्ट बर्ड चेरी वृक्षांना करता येत नाही कारण ते परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून असतात.

या झाडांमध्ये नर आणि मादी जननेंद्रिय एकाच फुलात असतात.जंगलात सापडणारी ही झाडं मधमाश्यांकडून परागीभवन करून घेतात.फुलात शिरताना मधमाश्या पराग उधळून लावतात.पण यातून निषिद्ध प्रजनन होऊ नये यासाठी बर्ड चेरी वृक्ष सावध असतात.ज्या वेळेस परागाचा कण स्टिग्मावर पडतो तेव्हा त्याचे जनूक कामाला लागतात आणि एक नाजूक नळकांड तयार होतं जे अंड्याच्या शोधात निघतं. हे चालू असताना झाड त्या परागाची जनुकीय चाचणी करतं.

आपल्या जनुकाशी ती जुळली तर नळी बंद केली जाते आणि थोड्या वेळाने पराग वाळून निकामी होतो.फक्त परकीय जनुकांना आत घेतलं जातं.पण बर्ड चेरीची झाडं 'माझं' आणि 'तुझं' कसं ओळखतात ? या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नाही,पण इतकं माहिती आहे की जनुकांना सक्रिय व्हावं लागतं आणि झाडाची चाचणी यशस्वीपणे पार करावी लागते. यासाठी झाड त्या जनुकांना अनुभवतं असं कदाचित म्हणता येईल.आपण माणसंसुद्धा प्रेमाने होणाऱ्या शारीरिक संबंधाच्या वेळी मज्जातंतूंमार्फत होणाऱ्या संवेदनांपलीकडचंही काही अनुभवत असतो,तसंच काहीसं झाडांच्या प्रजोत्पादनावेळीही होत असावं.झाडं संभोगाचा अनुभव कसा घेतात,याची आपल्याला अजून काही काळ फक्त कल्पनाच करावी लागेल.


काही प्रजातींमध्ये निषिद्ध प्रजनन टाळण्याची आणखी एक युक्ती असते.त्यांच्या प्रत्येक झाडाला एकाच लिंगाची फुलं असतात. उदाहरणार्थ,विलो वृक्ष केवळ नर किंवा मादी असतात.त्यामुळे स्वतःचं परागीभवन स्वतःमध्ये होऊ शकत नाही.पण असं म्हणतात की विलो हे खऱ्या अर्थाने जंगलातलं झाड नव्हे.जंगलाचं आच्छादन नसलेल्या भागातून त्यांचं प्रजनन होतं.इथे हजारो प्रकारच्या छोट्या वनस्पती असल्यामुळे कीटक आणि मधमाश्यांचं सारखं येणं- जाणं असतं.त्यांच्या सेवांचा फायदा बर्ड चेरीप्रमाणे विलो वृक्षही घेतात.पण या झाडांना सावधगिरीने राहावं लागतं,कारण परागीभवन करणारा किडा आधी नर विलो या फुलावरून मग मादी फुलावर जायला हवा.जर उलट झालं तर फलन होणारच नाही.पण जर नर आणि मादी विलो एकाच वेळी फुलले तर झाडांना हा अडथळा कसा पार करता येईल? शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की विलोचे वृक्ष मधमाश्यांना एका मोहक सुवासाने आकर्षित करतात.

एकदा का मधमाशी झाडाजवळ आली की दृश्य संकेताचा वापर नर विलोकडून केला जातो. आपली फुले गडद पिवळ्या रंगाची दिसावीत म्हणून नर विलो मेहनत घेतो आणि मधमाशीला आधी आपल्याकडे आकर्षित करतो.या फुलांच्या गोड मकरंदावर ताव मारला मग त्या मधमाशा मंद हिरव्या मादी फुलांकडे आकर्षित होतात.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज पी ट र वो ह्ल लेबेन,

अनुवाद-गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


सस्तन प्राण्यांच्यात रक्ताच्या नात्यामध्ये होणाऱ्या प्रजननाला निषिद्ध प्रजनन म्हटलं जातं. या प्रकारचे निषिद्ध प्रजनन झाडांच्या वरील तिन्ही युक्त्यांनी कधी कधी टळू शकत नाही.म्हणूनच वारा आणि मधमाश्यांची भूमिका महत्त्वाची असते.हे दोघेही झाडांचे पराग दूरवर नेऊन सोडतात त्यामुळे किमान काही जनुक तरी दूर जाऊ शकतात आणि जनुकीय वैविध्य टिकून राहू शकतं.पण एखादा अगदी एकटा पडलेला वृक्षांचा समूह असला तर मात्र बाहेरचे जनुक त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड होत जातं. कालांतराने जनुकीय वैविध्य कमी होत जात आणि समूह कमकुवत होत जातो.काही शतकांमध्येच हा समूह लुप्त होण्याची भीती निर्माण होते.

१/१/२४

रशिया सुधारणारा पीटर दि ग्रेट Peter the Great reformer of Russia

सतराव्या शतकात रशिया अत्यंत मागासलेला देश होता.इंग्लंड,फ्रान्स,जर्मनी वगैरे पश्चिमेकडील देश सुसंस्कृत रानटीपणाच्या दशेला जाऊन पोहोचले होते.पण रशियाचा रानटीपणा मात्र अजूनही ओबडधोबडच होता. त्याला पॉलिश मिळाले नव्हते.रशियातील स्लाव्ह लोक मूळचे मध्य आशियातले.ते तेथून युरोपात आले.

चेंगीझखानाने त्यांना एकदा जिंकले होते. कॉन्स्टॅटिनोपलच्या मिशनऱ्यांनी त्यांना रोमन कॅथॉलिक बनविले होते.असे हे स्लाव्ह शेकडो वर्षे अज्ञानी,दुबळे व दंतकथा आणि नाना रूढी यांनी भारलेले होते.


१४६३ साली तार्तर रशियातून घालविले गेले.पण त्यामुळे रशियनांची स्थिती सुधारली असे नाही.तार्तरहुकूमशहाच्या जागी स्लाव्ह हुकूमशहा आला.मॉस्कॉव्हाचा (मॉस्को) ग्रँड ड्यूक तिसरा इव्हान आपणास रशियाचा उद्धारकर्ता म्हणवीत असे.पण रशियनांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याप्रमाणे झाले. त्याच्या नातवाने प्रथम सीझर-झार- ही पदवी घेतली.त्याचेही नाव इव्हानच होते.त्याला 'भयंकर-इव्हान दि टेरिबल' म्हणत.त्याने तर अधिकच जुलूम केला व प्रजेला केवळ गुलाम केले.तार्तरांची हुकूमत होती,तोपर्यंत शेतकऱ्यांना थोडे तरी स्वातंत्र्य होते.पण झारांच्या सुलतानशाहीत त्यांची स्थिती केवळ गुरांढोरांप्रमाणे झाली.डुकरे,गाई,बैल शेतावर असतात.

तसेच हे शेतकरीही तिथे राहत व राबत. त्यांना कशाचीही सत्ता नव्हती.रशिया आता जणू एक जंगी वसाहतच बनला.लाखो मजूर व एकच धनी.झार जमीनदारांना व सरदारांना फटके मारी,जमीनदार व सरदार शेतकऱ्यांवर कोरडे उडवी आणि सर्वांच्या वर आकाशात भीषण असा परमेश्वर होता.झारविरुद्ध बंड करणाऱ्यांना व चर्चची अवज्ञा करणाऱ्यांना गाठाळ चाबकाने फोडून काढावयाला तो परमेश्वर बसलेला होता. जणू भीषण अशी कोसॅकचीच मूर्ती !


झारांच्या अहंकाराची बरोबरी त्यांचे अज्ञानच करू शके.अहंकार भरपूर व अज्ञानही भरपूर, ते केवळ निरक्षर टोणपे होते.ते व्यसनी,व्यभिचारी,विलासी होते.ते आपल्या प्रजेसमोर आपल्या वैभवाचे प्रदर्शन करीत. राजवाड्यात डुकरे पाळीत.मोठमोठ्या मेजवान्यांच्या वेळी ते खुशाल टेबलावरील कपड्यांवर नाक शिंकरीत व आपल्या पाटलोणीस बोटे पुशीत ! ते गणवेश करीत, तेव्हा त्यावर शेकडो पदके लावीत.पण त्यांच्या शरीरांना कित्येक दिवसांत स्नान माहीत नसे.प्रवासात असत तेव्हा ते एखाद्या खाणावळीत उतरत व एखाद्या मोलकरणी

जवळ चारचौघांत गैरवर्तन करीत.ते दैवी सामर्थ्याचा आव आणीत व भुतांची भाषा वापरीत.नवीनच मिळालेल्या सत्तेने ते जणू मत्त झाले होते.ते दारू प्यायलेल्या जंगली माणसांप्रमाणे वागत.त्यांना चालरीत माहीत नसे. सद् भिरुची ठाऊक नसे.रशियाची राजधानी मॉस्को येथे होती.झारमध्ये वैभव व वेडेपणा,सत्ता व पशुता यांचे मिश्रण होते. त्याचप्रमाणे मॉस्को राजधानी सौंदर्य व चिखल यांनी युक्त होती.मॉस्कोकडे येणारे रस्ते फक्त हिवाळ्यात जरा बरे असत.कारण त्या वेळी चिखल गोटून घट्ट असे.मॉस्कोभोवती दुर्गम जंगले होती.ते दुरून अरबी भाषेतील गोष्टींमधल्या एखाद्या शहराप्रमाणे दिसे.दुरून दोन हजार घुमट व क्रॉस दिसत.ते तांब्याने मढवलेले असत व सूर्यप्रकाशात लखलखत. लाल,हिरव्या व पांढऱ्या इमारतीच्या मस्तकांवर दोन हजार घुमटांचा व क्रॉसांचा जणू काही भव्य मुकुटच आहे असे दुरून भासे.पण राजधानीत पाऊल टाकताच ही माया नष्ट होई व मॉस्को एक प्रचंड व अस्ताव्यस्त बसलेले खेडेगावच आहे असे वाटे.रस्ते रुंद होते.पण त्यावरून जाणाऱ्यांना ढोपर-ढोपर चिखलातून जावे लागे. दारुडे व भिकारी यांची सर्वत्र मुंग्याप्रमाणे गर्दी असे,बुजबुजाट असे.

सार्वजनिक स्नानगृहांपाशी दिगंबर स्त्री-पुरुषांची ही गर्दी असे.एवढेच नव्हे,गलिच्छ गोष्टी बोलत.या राजधानीतील हवा जणू गुदमरून सोडी,धूर,दारूचा वास,घाणीची दुर्गंधी, खाद्यपेयांचा घमघमाट अशा संमिश्र वासाने भरलेली हवा नाकाने हूंगणे,आत घेणे हे मोठे दिव्यच असे.भटकणारी डुकरे,झिंगलेले शिपाई रस्त्यांतून लोळताना दिसत व त्यांना जरा कोणाचा अडथळा झाला,तर ते ताबडतोब ठोसे द्यायला तयार असत.आरंभीच्या झारांच्या काळात रशियाची अशी दुर्दशा होती.पण सतराव्या शतकाच्या अखेरीस झार पीटर अलेक्झीविच याने या प्रचंडकाय रशियन राक्षसाला आपल्या मजबूत हातांनी झोपेतून जागे केले व त्याला पश्चिम युरोपच्या सुधारणेकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहावयास लावले.झार फिओडोर हा पीटरचा भाऊ.तो स्पायनोझाच्या मरणानंतर पाच वर्षांनी म्हणजे १६८२ साली मरण पावला.तेव्हा पीटर दहा वर्षांचा होता.पीटरचा सोळा वर्षांचा इव्हान नावाचा एक दुबळा भाऊ होता.पीटर व इव्हान हे दोघे संयुक्त राजे निवडले गेले.पण दोघेही लहान असल्यामुळे त्यांची बहीण सोफिया राज्यकारभार पाही.ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळे तिने पीटरला मॉस्कोच्या उपनगरात पाठवले व सिंहासनाचा कब्जा घेतला.तिच्या मनात त्याला आपल्या मार्गातून कायमचे दूर करायचे होते. पण तिने त्याला तूर्त तात्पुरते दूर केले.पीटर पंधरा वर्षांचा होईतो त्याला लिहा-वाचावयासही येत नव्हते व बोटे मोडूनही दहापर्यंत आकडे मोजता येत नव्हते.पण त्याला मोडतोड करण्याचा नाद फार होता.हातांनी काही तरी करीत राहण्याची व खेळातील गलबते बांधण्याची त्याला आवड होती.

बालवीर जमवून तो लुटपुटीच्या लढायाही खेळे.हेच बालवीर पुढे रशियन सैन्याचा कणा बनले.यातून रशियन सेना उभी राहिली.


आरंभीच्या झारांच्या काळात परकीयांना मॉस्कोत राहण्यास बंदी होती.त्यांना मॉस्कोच्या उपनगरात राहावे लागे.पीटरची व या परकीयांची गाठ पडे व त्यांच्याविषयी त्याला प्रेम वाटे. त्याला त्या परकीयांनी जीवनाची एक नवीनच तऱ्हा दाखवली.ती त्याला अधिक रसमय वाटल्यामुळे त्याचे मन तिच्याकडे ओढले गेले.

डच गलबते बांधणारे,साहसी इंग्रज प्रवासी, इटालियन न्हावी,स्कॉच व्यापारी,पॅरिसमधील नबाब,जर्मन पंतोजी,

डॅनिश वेश्या या सर्वांशी तो परिचय करून घेऊ लागला.

पीटर सुशिक्षित नव्हता.पण या सर्वसंग्राहक वातावरणात त्याची दृष्टी मोठी होऊ लागली.तो जणू जगाचा नागरिक बनू लागला.त्याचे जिज्ञासू मन जे जे मिळे,ते ते घेई. त्याच्याशी संबंध आलेल्या परकीय स्त्री-पुरुषांचे काही गुण व बरेचसे दुर्गुणही त्याने घेतले. पश्चिम युरोपातील मोठमोठ्या राजांविषयी अनेक कथा त्याच्या कानी आल्या व आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे, असे त्याला वाटू लागले.सतराव्या वर्षी त्याने गोष्टी केल्या.

स्वतःचे लग्न व बहीण सोफिया हिची हकालपट्टी.

एवढ्याशा वयात आपण होऊन मुले या गोष्टी करीत नाहीत.त्याचा अर्धवट भाऊ इव्हान पुढे लवकरच मेला व पीटर रशियाचा एकमेव सत्ताधीश झाला.उपनगरातील विदेशी मित्रमंडळींच्या संगतीत राहण्यास गेला,तेव्हा सरदारांनी व दरबारी लोकांनी नाके मुरडली.पीटर

धष्टपुष्ट,रानवट व दांडगट होता.त्याचे शरीर खूप विकसित झाले होते.पण मन अविकसितच राहिले.तो रंगाने काळसर असून सहा फूट साडेसहा इंच उंच होता.त्याचे ओठ जाड होते. अशा या अगडबंब व धिप्पाड माणसाची वृत्ती उत्कट होती.त्याला स्वतःचे काहीही सोडू नये असे वाटे.जीवनात त्याला काहीच गंभीर वाटत नसे.सारे जग जणू त्याचे खेळणे झाले होते.त्याला गलबते बांधण्याची फार हौस होती. तो सांगे, 'मला पीटर दि कार्पेटर म्हणा.' राजदंड हाती मिरविण्यापेक्षा घण हातात घेऊन काम करणे त्याला अधिक आवडे.

लहानपणी त्याने अल्प प्रमाणावर सैन्य उभारले होते.

आता गलबते बांधून आरमाराचाही पाया घालावा,असे त्याच्या मनात आले.त्याची बालवृत्ती जन्मभर टिकली.

आरमार बांधण्यास प्रारंभ करतेवेळी त्याच्याजवळ फार मोठ्या योजना होत्या,असे नाही.त्याची ती गलबते म्हणजे त्याची करमणूक होती.आपल्या बालवीरांना नकली बंदुका देऊन त्याने खेळातील शिपाई बनवले होते.तद्वतच हेही.पण गलबते हवी असतील,तर समुद्र हवा हे लवकरच त्याच्या लक्षात आले.लहान मुलगा मनात येईल ते करू पाहतो तद्वत पीटर लगेच काळ्या समुद्राकडे आपले बुभुक्षित डोळे फेकू लागला.दक्षिणेकडे काळा समुद्र होता व पश्चिमेकडे बाल्टिक समुद्र होता.काळ्या समुद्रात प्रवेश मिळावा म्हणून सैन्य घेऊन त्याने तुर्कोंवर स्वारी केली.पण अझोव्ह येथे त्याचा पराजय झाला.तरी मॉस्कोला परत येऊन आपण मोठा जय मिळवला अशी बढाई तो प्रजेपुढे मारू लागला. त्याने दारूकाम सोडून विजयोत्सव केला. दारूकाम त्याला फार आवडे.त्याच्या करमणुकीचे प्रकार मुलांच्या करमणुकीच्या प्रकारांसारखेच असत.बाल्टिक किनारा मिळवण्यासाठी त्याने स्वीडनच्या बाराव्या चार्लस राजाशी लढाई सुरू केली.ती बरीच वर्षे चालली.

त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग त्यात गेला.पण दारूकाम सोडणे व इतर करमणुकी यांच्याआड हे युद्ध येत नव्हते आणि तिकडे रणांगणावर शिपाई मेले म्हणून त्याला त्याचे काय वाटणार होते? मरणाऱ्यांची जागा घेण्यास दुसरे भरपूर होते.पण लढाईचे काही झाले तरी, एक दिवसही दारूकाम सुटले नाही किंवा इतर करमणुकी झाल्या नाहीत,तर मात्र तो दिवस फुकट गेला असे त्याला वाटे.चार्लसशी युद्ध चालू असता त्याचे लक्ष दुसऱ्या एका गंमतीकडे गेले. आरमार व लष्कर निर्माण केल्यावर नवीन रशिया निर्माण करण्याचे त्याच्या मनाने घेतले. तो आपली निरनिराळी खेळणी घेई व पुन्हापुन्हा वेगवेगळ्या रीतींनी रची व मांडी.वस्तू असतील तशाच ठेवणे त्याला आवडत नसे.त्याने इतर खेळण्यांत फेरबदल केला तद्वत रशियालाही नवा आकार,नवे रंगरूप देण्याचे त्याच्या मनाने घेतले.मॉस्कोच्या उपनगरातील परकीयांविषयी त्याला आदर वाटे.म्हणून त्याने सारा रशिया परकीयांनी भरून टाकण्याचे ठरवले.


रशियाला युरोपच्या पातळीवर आणण्याच्या कामी पश्चिम युरोपचा अभ्यास करणे अवश्य होते.म्हणून तो हॉलंड,

फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड वगैरे देशांत गेला व पश्चिमेकडील संस्कृतीचे काही कपडे घेऊन आला.नवीन कपड्यांनी भरलेले एक कपाटही त्याने बरोबर आणले.आपण आणलेल्या कपड्यांसारखेच कपडे प्रजेने वापरावेत,

आपण शिकून आलेल्या चालीरितींसारख्या चालीरीती प्रजेने सुरू कराव्यात अशा उद्योगाला तो लागला.

शिपायांना कात्र्या देऊन रस्त्यांवरून जाणाऱ्या दाढाळ शेतकऱ्यांच्या दाढ्या त्याने कापायला अगर उपटायला सांगितले.त्याने स्वतः सरदारांचे व दरबारी लोकांचे कपडे फाडून टाकले व पश्चिमेकडचे फॅशनेबल कपडे त्यांनी वापरावेत, असा अट्टाहास चालवला.झारने चालवलेल्या या सुधारणा पाहून रशियन पोप रागावला. रशियातील धर्मगुरू स्वतःला जनतेचा बाप म्हणवीत असे.त्याच्या मताप्रमाणे मानव ईश्वराची प्रतिकृती असल्यामुळे त्यांनी ईश्वराप्रमाणे लांब दाढ्या ठेवल्याच पाहिजेत व लांब चुण्यांचे झगे घातलेच पाहिजेत. रशियन धर्मगुरूने त्यामुळे असे फर्मान काढले की,सर्व धार्मिक लोकांनी राजाचा हुकूम अमान्य करून दाढ्या,निदान हनुवटीवर तरी ठेवाव्यात. नाही तर एखाद्या पेटीत तरी आपली दाढी राखून ठेवावी.म्हणजे मरताना ती आपल्याबरोबर नेता येईल.दाढीवरील या धार्मिक चर्चेला गंभीर स्वरूप आले.पीटरने पोपविरुद्ध बंड केले.व तो स्वतःच धर्माचा मुख्य झाला.पण पीटरच्या इतर सुधारणा काही इतक्या पोरकट नव्हत्या.काही

तर खरोखरच महत्त्वाच्या होत्या.त्याने सीनेट नेमले,राज्याचे आठ भाग केले,रस्ते बांधले,कालवे खणले,शाळा काढल्या,विद्यापीठे स्थापिली,दवाखाने काढले,नाटकगृहे बांधली, नवीन धंदे निर्मिले.

नाटकगृहे तयार झाली की नाटकेही निर्माण होऊ लागतील असे त्याला वाटले.ज्या नाटकात त्याची स्तुती असे त्या नाटकांसाठी ही नाट्यगृहे होती.हे सारे अंतःस्फूर्तीने त्याच्या मनात येई म्हणून तो करीत असे.

जीवनाशी त्याच्या चाललेल्या खेळातलाच तो एक भाग होता.तो जे काही करी त्यात योजना नसे,पद्धत नसे,विचार नसे,योजनेशिवाय काम करणे हीच त्याची योजना.दुसऱ्या देशात पाहिलेले जे जे त्याला आवडे ते ते तो ताबडतोब आपल्या देशात आणी.त्याचे अशिक्षित पण जिज्ञासू मन सारखे प्रयोग करीत असे.हॉलंडमध्ये एक दंतवैद्य दात काढीत आहे असे आढळले,तेव्हा पीटरने रशियात परत येताच स्वतःच दात काढण्यास सुरुवात केली.एका शस्त्रक्रियातज्ज्ञाने केलेले ऑपरेशन त्याने पाहिले व लगेच स्वतःही तसेच एक ऑपरेशन करण्याची लहर त्याला आली. अर्थातच,त्याचा रोगी मेला हे काय सांगावयास पाहिजे ? कुटुंबीयांची नुकसानभरपाई त्या रोग्याच्या प्रेतयात्रेस स्वतः हजर राहून त्याने केली.त्याला गलबतांचा नाद नित्य असल्यामुळे शेवटी त्याने बाल्टिक समुद्रकाठाच्या दलदलीच्या प्रदेशात एक शहर बसवले व त्याला सेंट पीटर्सबर्ग असे जर्मन नाव दिले.आपल्या परसात असल्याप्रमाणे येथे आरमार राहील,असे त्याला वाटले.हे शहर सुंदर करण्यासाठी त्याने चौदाव्या लुईच्या दरबारातून काही कलावंत व कारागीर मागवून घेतले.पण हे शहर बांधता बांधता एक लक्ष तीस हजार लोक मेले.

आपला देश सुसंस्कृत करण्यासाठी तो जन्मभर धडपडला.पण स्वतः मात्र रानटीच राहिला.फ्रेंच दरबरातील रीतिरिवाज रशियात सुरू करावेत असा त्याचा हट्ट होता.त्याने आपल्या गुरूजींची पाठ वेताने फोडली.तो तत्त्वज्ञानी लोकांशी चर्चा करी व शेतकऱ्यांच्या अंगावर दारू ओतून त्यांना काडी लावून देई. त्याने अनाथांसाठी अनाथालये स्थापिली;पण स्वतःचा मुलगा अलेक्सिस याला आज्ञाभंगासाठी मरेपर्यंत झोडपले.

शरीररचनाशास्त्राचा तो अभ्यासक असल्यामुळे त्याने पुढील विक्षिप्त प्रकार केला.त्याच्या एका वेश्येने झारिनाची निंदा केल्याबद्दल त्याने तिला शिरच्छेदाची शिक्षा दिली.तिचा वध झाल्यावर तिचे डोके मागून घेऊन जमलेल्या लोकांना मानेमधील स्नायू व शिरा दाखवून त्याने शरीररचनेवर एक व्याख्यान झोडले! त्याला आपल्या प्रजेच्या मुंडक्यांशी खेळण्याचे वेडच होते.एकदा त्याने एकाच वेळेस बारा हजार बंडखोर सैनिकांची धडे शिरापासून वेगळी केली.मानवजातीची कथा-हेन्री थॉमस,

सानेगुरुजी,झारीना व्याभिचारिणी आहे हे कळल्यावर त्याने तिच्या प्रियकराचे डोके कापले व ते अल्कोहोलमध्ये बुडवून तिच्या टेबलावर जणू फ्लॉवरपॉट म्हणून ठेवले.तो झारिनाचाही शिरच्छेद करणार होता.पण इतक्यात स्वतःच आजारी पडून तो त्रेपन्नाव्या वर्षी (१७२५ साली) मेला.तेव्हा रस्त्यातील लोक एकमेकांना म्हणू लागले,"मांजर मेले,आता उंदीर त्याला पुरतील." फ्रेडरिक दि ग्रेट लिहितो,'हा पीटर म्हणजे एक शौर्यधैर्यसंपन्न पिशाच्चच होते.मानवजातीचे सारे दोष त्याच्या अंगी होते पण गुण मात्र फारच थोडे होते.

शांतताकाळी दुष्ट,युद्धकाळी दुबळा,परकीयांनी प्रशंसिलेला,प्रजेने तिरस्कारिलेला हा राजा मूर्ख;पण दैवशाली होता.सम्राटाला आपली नियंत्रित सत्ता जितकी चालविता येणे शक्य होते,तितकी त्याने चालविली.' मानवजातीची त्याला पर्वा नसे.तो जे काही करी, ते स्वत:च्या सुखासाठी म्हणून करी.पण त्याने केलेल्या अनेक खेळांत प्रजा साक्षर करणे हाही एक खेळ होता व त्यामुळे न कळत का होईना त्याने स्वतःचे डेथ-वॉरंटच लिहिले! कारण,ज्ञानाचा आरंभ म्हणजेच अनियंत्रित सत्तेचा अंत.सेंटपीटर्सबर्गचा हा हडेलहप्पी हुकूमशहाच पुढील रशियन राज्यक्रांतीचा आजोबा होय.

२८ नोव्हेंबर २३ या लेखमालेतील पुढील भाग..